मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली आहे. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
तुनिषा शर्मा हिने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडियोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचासहकलाकार मोहम्मद शिझान याला अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिझानने प्रेमसंबध तोडल्याने निराश झाल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी शिजान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिझान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शिझानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
तिने नेमकी आत्महत्या का केली तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का त्याचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली. ‘अलिबाबा:दास्तान ए काबुल’ या टीव्ही मालिकेत ती मुख्य भूमिका करत होती.