Phulvara Movie : मराठी लोककलेचा समृद्ध वारसा आणि लावणीचा पारंपरिक ठेका पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर (Movie) अनुभवता येणार आहे. झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक रवी जाधव ही जोडी तब्बल 16 वर्षांनी लावणीप्रधान चित्रपट घेऊन येत असून ‘फुलवरा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर 14 जानेवारी 2027 रोजी ‘फुलवरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये देवी अंबाबाईचा मुखवटा आणि ‘अस्सल मराठी लावणीला बळ द्या’ हा संदेश लक्ष वेधून घेतो.
‘नटरंग’नंतर रवी जाधव पुन्हा एकदा तमाशा आणि लावणीच्या विश्वाकडे वळले आहेत. मात्र, यावेळी कथानकाचा काळ वेगळा असून ‘फुलवरा’ची कथा 2015 च्या पार्श्वभूमीवर घडते. काळानुसार तमाशाच्या सादरीकरणात झालेले बदल, लोककला जपण्यासाठी कलावंतांची सुरू असलेली धडपड आणि बदलत्या काळात अस्सल मराठी लावणीसमोरील आव्हाने या विषयांकडे चित्रपटातून पाहिले जाणार आहे. चित्रपटाची कथा नेमकी कोणत्या दिशेने उलगडणार आणि त्यातील पात्रे कोणती असणार, याबाबतची माहिती मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
प्रेम, मैत्री अन् बदलत्या नात्यांची कहाणी; मैत्रेयाचा टीझर प्रदर्शित
‘द फोक आख्यान’शी संबंधित हर्ष-विजय ही संगीतकार जोडी ‘फुलवरा’च्या संगीताची जबाबदारी सांभाळत आहे. लेखक आणि सादरकर्ते ईश्वर ताराबाई अंधारे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत. लोकसंगीताचा पारंपरिक बाज आणि नव्या पिढीची लोककलेकडे पाहण्याची दृष्टी यांचा मेळ चित्रपटात साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लावणी केवळ मनोरंजनाचा प्रकार म्हणून न मांडता तिच्यामागील संस्कृती, परंपरा आणि कलावंतांचे जगणे यांना कथानकातून स्थान देण्यात आल्याचे चित्रपटाच्या संकल्पनेवरून दिसून येते.
‘फुलवरा’बाबत बोलताना रवी जाधव यांनी तमाशा हा महाराष्ट्राच्या लोककलेचा प्राण असून लावणी ही त्याची सम्राज्ञी असल्याचे म्हटले आहे. या समृद्ध परंपरेवर चित्रपट साकारणे ही मोठी जबाबदारी असून कलावंतांचा संघर्ष आणि त्यांची कला जपण्याची धडपड चित्रपटातून मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही ‘नटरंग’नंतर पुन्हा रवी जाधव यांच्यासोबत लावणीप्रधान चित्रपट साकारताना आनंद होत असल्याचे नमूद केले. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित ‘फुलवरा’ 14 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार असून कलाकारांची मांदियाळी आणि लावणीचा नेमका कोणता रंग या चित्रपटातून समोर येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
