7 consecutive performances of ‘Albatya-Galbatya’ : मराठी बालरंगभूमीवर आपल्या अनोख्या जादूने गेली पाच दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अद्वैत थिएटर निर्मित ‘अलबत्या-गलबत्या’ हे लोकप्रिय बालनाट्य आता आणखी एका शिखर विश्वविक्रमाच्या दिशेने झेपावले आहे. येत्या 15 ऑक्टोबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या नाटकाचे सलग 7 प्रयोग रंगणार असून, या अनोख्या उपक्रमातून पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील हजारो मुलांना आनंदाची अविस्मरणीय सफर घडणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सर्वस्य प्रोडक्शन आणि अद्वैत थिएटर यांच्या पुढाकाराने तसेच पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम साकारत आहे. बालरंगभूमीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणाऱ्या या शिखर विश्वविक्रमाकडे सध्या संपूर्ण रंगभूमीचे लक्ष लागले आहे.
अद्वैत थिएटर निर्मित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या-गलबत्या’ या नाटकाची सध्या हजाराव्या प्रयोगाकडे दमदार घोडदौड सुरू आहे. गमती-जमती, हशा, टाळ्या आणि शिट्ट्यांनी नाट्यगृह दणाणून सोडणारे हे बालनाट्य केवळ मुलांचेच नव्हे, तर त्यांच्या पालकांसह ज्येष्ठ आणि थोरामोठ्यांचेही भरभरून मनोरंजन करत आहे. दैनंदिन धावपळीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यातून काही क्षण मुक्त करत प्रेक्षकांना एका आनंदी, जादुई सफरीवर घेऊन जाण्याचे काम हे नाटक सातत्याने करत आहे.
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या जादुई लेखणीतून तब्बल पाच दशकांपूर्वी जन्माला आलेल्या ‘अलबत्या-गलबत्या’ची मोहिनी आजही कायम आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, मनोरंजनाची माध्यमे बदलली; मात्र या नाटकाची लोकप्रियता आणि त्यातील जादू आजही तितकीच ताजी आहे.या नाटकाने आतापर्यंत 365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचा विक्रम नोंदवला आहे. याशिवाय एका दिवसात सलग 4, 5 आणि 6 प्रयोग सादर करण्याचा विक्रमही या नाटकाच्या नावावर आहे. आता सलग 7 प्रयोगांच्या शिखर विश्वविक्रमाची भर पडणार आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीची एकत्र लढण्याची तयारी, एकाच जागेवर अडला तिढा
‘अलबत्या-गलबत्या’च्या लोकप्रियतेत नाटकातील गाण्यांचा मोठा वाटा आहे. रत्नाकर मतकरी, चिन्मय मांडलेकर, समृद्धी पांडे, संचित गायकवाड आणि संस्कारी यांनी शब्दबद्ध केलेली ही गाणी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांच्यासह बालदोस्तांनी आपल्या आवाजाने अधिक श्रवणीय आणि लोकप्रिय केली आहेत. दरम्यान, ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सोमवार, 28 सप्टेंबर रोजी ‘अलबत्या-गलबत्या’च्या संगीताचे अनावरण मोठ्या दिमाखात पार पडले. विशेष म्हणजे सकाळी 8 वाजताचा प्रयोग असूनही नाट्यगृह हाऊसफुल्ल होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादितचे प्रशासक विद्याधर अनास्कर, उद्यम विकास सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा लीनाताई अनास्कर आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांच्या हस्ते संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना विद्याधर अनास्कर यांनी पुण्यात होणाऱ्या शिखर विश्वविक्रमाची घोषणा केली. बालगंधर्व रंगमंदिरात 15 ऑक्टोबर रोजी ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग 7 प्रयोग सादर करून नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.
या उपक्रमामागे केवळ विश्वविक्रमाची नोंद करण्याचा हेतू नसून, पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो मुलांना दर्जेदार नाट्याचा आनंद देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा मानस आहे. सामूहिक प्रयत्न, हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि रंगभूमीवरील प्रेम यांच्या बळावर साकारला जाणारा हा आगळावेगळा सोहळा निश्चितच मराठी रंगभूमीच्या इतिहासात संस्मरणीय ठरणार आहे.
