पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीची एकत्र लढण्याची तयारी, एकाच जागेवर अडला तिढा
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये अजून देखील रस्सीखेच सुरू असल्याने या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
Mahayuti prepares to contest elections together : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्य माहितीनुसार, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीचा 3-1-1 असा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये अजून देखील रस्सीखेच सुरू असल्याने या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
संभाव्य फॉर्म्युल्यानुसार छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाकडे, तर नागपूर पदवीधर आणि पुणे पदवीधर या भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उर्वरित पुणे शिक्षक मतदारसंघांच्य जागेवरून महायुतीतील चर्चा अधिकच रंगल्या आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी शिंदेसेनेतील काही नेते विशेष आग्रही असल्याची चर्चा आहे. मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सानप तसेच आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी या जागेसाठी दावा मजबूत केल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपही या जागेसाठी इच्छुक असल्याने महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेत पुणे शिक्षक मतदारसंघ केंद्रस्थानी आला आहे.
मुंबईत मृत्यूनंतर चार वर्षे फ्रीझरमध्ये जतन केला मृतदेह, अमेरिकेत क्रायोनिक्ससाठी पाठवण्याचा कुटुंबाचा प्रयत्न
दरम्यान, महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, जागावाटपाचा अंतिम तिढा सुटल्याशिवाय उमेदवारांची घोषणा होणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा अखेर कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 29 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 6 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. 7 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल, तर 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे.
सेमीफायनलमध्ये भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानशी होणार लढत
यावेळी औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जात असून जागावाटप आणि उमेदवारीबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.