राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग! अमित शाह पुण्यात, सुनेत्रा आणि पार्थ पवारांची भेट घेणार?

दौऱ्यात अमित शाह यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याशी राजकीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 15T095528.236

Amit Shah’s visit to Pune reignites political discussions : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असून, त्यावरून राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम ठेवल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

अमित शाह पुणे दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाचाही त्यांच्या दौऱ्यात समावेश आहे. या कार्यक्रमात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. सुरुवातीला या कार्यक्रमासाठी अमित शाह केवळ 20 मिनिटे उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. मात्र, आता त्यांचा कार्यक्रमातील वेळ वाढवून 40 मिनिटे करण्यात आल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात अमित शाह यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याशी राजकीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भेटीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भवितव्याबाबत काही महत्त्वाची चर्चा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

SBI ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी! स्टेट बँकेच्या सर्व्हरवर हॅकर्सचा मोठा हल्ला, 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरीला

शनिवारी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी, अजित पवार हयात असतानाच दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता अजितदादा आपल्यात नाहीत, त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे, अशी भूमिका मांडली. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, आगामी राजकीय आणि संसदीय गणितांच्या पार्श्वभूमीवर भाजपला दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याचे महत्त्व असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आगामी हिवाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विधेयकांना मंजुरी मिळवण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपला अतिरिक्त खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असल्याचे राजकीय विश्लेषण केले जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेत आठ आणि राज्यसभेत एक खासदार आहे. त्यामुळे संसदेतील संख्याबळाच्या दृष्टीने या खासदारांचे महत्त्व वाढू शकते. याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत भाजपची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याची चर्चा आहे.

अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी चर्चा होते का, या भेटीत राष्ट्रवादीच्या राजकीय भवितव्याबाबत काही संकेत मिळतात का आणि दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विषय पुन्हा पुढे येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसरीकडे अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये भविष्यात काय घडणार, याचे उत्तर अमित शाह यांच्या या दौऱ्यानंतर अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

follow us