मतदारानंतर आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अपहरणाचा डाव, अमित देशमुखांचा खळबळजनक आरोप!
मंत्री बाबासाहेब पाटील यांना पळवून नेण्याचा विरोधकांचा प्लॅन होता, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केला आहे.
A plot to kidnap Cooperation Minister Babasaheb Patil : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील अपहरण प्रकरणाला आता नवं आणि धक्कादायक वळण मिळालं आहे. मतदाराच्या कथित अपहरणानंतर आता थेट राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाच पळवून नेण्याचा विरोधकांचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या मतदाराच्या अपहरणाचा प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना अमित देशमुख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अपहरणाचा कट रचण्यात आल्याचा दावा केला. बाबासाहेब पाटील हे आमच्या सहकार पॅनलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांना देखील पळवून नेण्याचा विरोधकांचा प्लॅन होता. मात्र, आम्ही असं कसं होऊ देणार, असा सवाल करत अमित देशमुख यांनी विरोधकांना इशारा दिला.
सुळे अन् सुनेत्रा पवारांची भूमिका, NCP विलीनीकरणाचा गेम संपला?; कुणाचे पत्ते कापले गेले?
दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील राजकीय घडामोडींचाही संदर्भ दिला. निवडणुकीत केवळ काठावरचं बहुमत मिळवून चालणार नाही, तर स्पष्ट बहुमत मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. एवढंच नाही, तर विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली.
केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही सहकारी संस्थांवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सहकाराची तत्त्वं जपली गेली पाहिजेत. कमळ, हात, घड्याळ किंवा धनुष्यबाण यापेक्षा सहकाराचं हित महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच, लातूरच्या हितासाठी होणारं मतदान हे केवळ जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता मुंबई आणि दिल्लीपर्यंत स्पष्ट संदेश देणारं असावं, असं आवाहनही अमित देशमुख यांनी मतदारांना केलं. एकीकडे मतदाराच्या अपहरणाचा आरोप आणि दुसरीकडे सहकार मंत्र्यांनाच पळवण्याचा कट रचल्याचा दावा, यामुळे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक आता अधिकच रंगतदार आणि संघर्षपूर्ण बनली आहे. मात्र, बाबासाहेब पाटील यांच्या अपहरणाच्या कथित कटाबाबत देशमुख यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
विलिनकरणाची चर्चा होती, तारीखही ठरली होती पण…, विलीनीकरणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
या आरोपांमुळे लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अमित देशमुख यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मतदारांच्या सुरक्षेचा आणि सहकार क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा या निवडणुकीत केंद्रस्थानी येण्याची चिन्हं दिसत आहेत.