अहिल्यानगरमध्ये रिलायन्स स्मार्ट बाजार घरफोडीचा गुन्हा उघडकीस ; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
Reliance Smart Bazaar : अहिल्यानगरमधील सावेडी येथील ‘रिलायन्स स्मार्ट बाजार’च्या सर्व्हर रूमची खिडकी आणि तिजोरी फोडून 4 लाख 66 हजार
Reliance Smart Bazaar : अहिल्यानगरमधील सावेडी येथील ‘रिलायन्स स्मार्ट बाजार’च्या सर्व्हर रूमची खिडकी आणि तिजोरी फोडून ४ लाख ६६ हजार ३९० रुपयांची रोकड लांबवणाऱ्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन सराईत आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडून ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी अज्ञात चोरांनी सावेडी येथील रिलायन्स स्मार्ट बाजारच्या सर्व्हर रूमचे खिडकीचे गज कापून आणि काच फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कॅश रूममधील तिजोरी तोडून ४,६६,३९०/- रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस पथकाची कारवाई आणि तपास
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि विशेष तपास पथकाची स्थापना केली.तपास पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून तपास केला असता, हा गुन्हा खालील दोन आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले.
विशाल अंशाबापू चेमटे (वय ३२, रा. मनोनिला नगर, बोल्हेगाव, अहिल्यानगर), सुधीर दिनकर घोडके (वय ३९, रा. मातोश्री अपार्टमेंट, पवननगर, भिस्तबाग, सावेडी, अहिल्यानगर) पोलिसांनी दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी विशाल चेमटे हा सुमारे दोन वर्षांपूर्वी रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये कामाला असल्यामुळे त्यास दुकानातील रोकड आणि तिजोरीची संपूर्ण माहिती असल्याचे समोर आले. आरोपींनी गुन्ह्यासाठी रेनॉल्ड कंपनीची क्विड कार आणि यामहा कंपनीची मोटारसायकलचा वापर केला होता.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपींकडून चोरीची रक्कम व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण ८,२४,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे: रोख रक्कम: ४,४४,०००/- रुपये तर रेनॉल्ड कंपनीची क्विड कार (किंमत:३,००,०००/- रुपये) यामहा मोटारसायकल(किंमत:८०,०००/- रुपये) ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना मुद्द्यामालासहित तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.
विलिनकरणाची चर्चा होती, तारीखही ठरली होती पण…, विलीनीकरणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया-
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि पोलीस अंमलदार संदीप पवार, शाहीद शेख, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख व प्रशांत राठोड यांच्या पथकाने पार पाडली आहे.