एसआयआर मोहिमेत 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा, राज्यात 99.94 टक्के मतदारांची नावं पुन्हा मतदार यादीत
कागदपत्रांचे पुरावे सादर केल्यानंतर तब्बल 99.94 टक्के मतदारांची नावं पुन्हा प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Major relief for voters in the SIR mission/campaign : राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणी अर्थात एसआयआर मोहिमेत नोटीस बजावण्यात आलेल्या लाखो मतदारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कागदपत्रांचे योग्य पुरावे सादर केल्यानंतर तब्बल 99.94 टक्के मतदारांची नावं पुन्हा प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नोटीस मिळालेल्या 1 कोटी 22 लाखांहून अधिक मतदारांचा मतदानाचा हक्क कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, SIR मोहिमेंतर्गत राज्यातील 1 कोटी 22 लाख 24 हजार 7 मतदारांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 1 कोटी 22 लाख 16 हजार 665 मतदारांनी आवश्यक कागदपत्रांचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे या मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत कायम ठेवण्यात येणार आहेत. म्हणजेच नोटीस बजावण्यात आलेल्या मतदारांपैकी 99.94 टक्के मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
मतदारानंतर आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अपहरणाचा डाव, अमित देशमुखांचा खळबळजनक आरोप!
दरम्यान, दुसरीकडे पुण्यात मतदारांचे पत्ते परस्पर बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर महिन्यात पुण्यातील काही मतदारांचे पत्ते अचानक ठाणे, नाशिक आणि इतर शहरांमध्ये बदलण्यात आल्याचं उघड झालं आहे. या प्रकारामुळे पुण्यात वास्तव्यास असलेल्या अनेक मतदारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता आलं नव्हतं.
भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे अजित गव्हाणे यांनी हा प्रकार निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर आयोगाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आठ ठिकाणांहून अहवाल मागवण्यात आल्यानंतर संबंधित मतदार पुण्यातच वास्तव्यास असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे, चार मोबाईल फोनच्या माध्यमातून मतदारांचे पत्ते बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हे मोबाईल नेमके कोणाचे आहेत आणि पत्ते बदलण्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सुळे अन् सुनेत्रा पवारांची भूमिका, NCP विलिनीकरणाचा गेम संपला?; कुणाचे पत्ते कापले गेले?
या प्रकरणी निवडणूक आयोगाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आयोगाकडूनही स्वतंत्र चौकशी सुरू आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलीस नेमकी काय कारवाई करतात आणि मतदारांचे पत्ते परस्पर बदलणाऱ्यांचा शोध कधी लागतो, याकडे लक्ष लागलं आहे.
एकीकडे एसआयआर मोहिमेत 1.22 कोटींहून अधिक मतदारांना दिलासा मिळत असताना दुसरीकडे पुण्यात मतदारांचे पत्ते परस्पर बदलल्याचा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. त्यामुळे मतदार यादीतील दुरुस्ती आणि गैरप्रकारांची चौकशी या दोन्ही बाबी आता महत्त्वाच्या ठरणार आहेत.