TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाला राजकीय वळण, एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल

मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 06T113459.575

Case also registered against MIM leader Imtiaz Jaleel : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित महिला अत्याचार, लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव देखील तपासात समोर आल्याची माहिती आहे. मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. यापूर्वी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरोधात देखील याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे नाशिकमधील या प्रकरणाची व्याप्ती आता अधिक वाढली आहे.

या प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. तपासादरम्यान मतीन पटेल यांच्या मोबाईलमध्ये काही महत्वाच्या रेकॉर्डिंग आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रेकॉर्डिंगच्या आधारे इम्तियाज जलील यांच्या कथित सहभागाबद्दल तपास यंत्रणेने न्यायालयाला माहिती दिल्याचे समजते. पोलिसांनी इम्तियाज जलील यांचा जबाब नोंदवला असून, त्यांचे व्हॉइस सॅम्पल देखील घेण्यात आल्याची माहिती आहे.

निदा खान हिला आश्रय देण्याच्या प्रकरणात इम्तियाज जलील यांची भूमिका काय होती, याचा तपास एसआयटीकडून केला जात आहे. या संदर्भातील पुरावे आणि मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग तपासाच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेत इम्तियाज जलील यांची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

बोगस क्रीडा प्रमाणपत्राचे रॅकेट उघड केले, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

या प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग महत्वाचा पुरावा ठरू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. या रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने इम्तियाज जलील यांचा जबाब नोंदवण्यात आला असून, व्हॉइस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया देखील पार पडल्याचे वृत्त आहे. एसआयटीने या प्रकरणातील त्यांच्या कथित सहभागाबद्दल न्यायालयाला माहिती दिल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात टीसीएस प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत निदा खानने इतर सहआरोपींसोबत मिळून पीडितेवर मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा उल्लेख केला होता. पीडितेचा विश्वास संपादन करून ‘हिंदू धर्म ठीक नाही’ असे सांगत तिची विचारसरणी बदलण्याचा तसेच धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप एफआयआरमध्ये नमूद आहे. लैंगिक छळ आणि कथित धर्मांतराशी संबंधित या प्रकरणात निदा खानची भूमिका महत्त्वाची असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

आता निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपातून इम्तियाज जलील यांचे नाव तपासात समोर आल्याने या प्रकरणाची राजकीय आणि कायदेशीर गुंतागुंत वाढली आहे. एसआयटीच्या पुढील तपासात आणखी कोणते पुरावे समोर येतात आणि न्यायालयीन प्रक्रियेत या प्रकरणाला काय वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us