बोगस क्रीडा प्रमाणपत्राचे रॅकेट उघड केले, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
बोगस प्रमाणपत्र रॅकेटविरोधात आवाज उठवला, धमक्यांचा इशाराही दिला; वैभव चव्हाणचा मृत्यू नेमका आत्महत्या की घातपात?
Vaibhav dies under suspicious circumstances : खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून पोलीस दलात नोकरी मिळवणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण या युवकाचा मृतदेह इमामपूर शिवारात आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुरुवारी एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. मात्र, शवविच्छेदनादरम्यान त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आणि पायाला जखमा आढळल्याचे दावा नातेवाईकांनी केला आहे.
वैभव चव्हाण हा दोन वर्षांपूर्वी धाराशिव पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. त्याच्याइतकेच गुण असताना देखील त्याच्या पुढील उमेदवाराने खेळाडू असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याने वैभवाची संधी हुकली होती. या प्रकारानंतर वैभवने हार न मानता संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला. क्रीडा आयुक्तालय, बालेवाडी, पुणे येथे तक्रार दाखल करून त्याने बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
या तक्रारीच्या आधारे राज्यातील 14 पोलीस कर्मचाऱ्यांसह काही क्रीडा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात करण्यात आली होती. तसेच बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिवांसह संबंधित पदाधिकाऱ्यानावर गुन्हे दाखल झाले होते. सप्टेंबर 2026 मध्ये पुणे गुन्हे शाखेने असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिवांना अटक केली होती.
भाजप एक अजब पक्ष, सत्तेत असूनही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे; राज ठाकरेंचा हल्लाबोल
या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर वैभवला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात त्याने आपल्या मित्राला व्हॉइस मेसेज पाठवले होते. माझा मृत्यू कोणत्याही परिस्थितीत झाला, तरी त्याला कुराश संघटना जबाबदार असेल, असे त्याने या रेकॉर्डिंगमध्ये म्हटल्याचा दावा केला जात आहे. वैभवने स्वतःच्या तसेच मित्राच्या जीविताला धोका असल्याचं देखील व्यक्त केले होते.
दरम्यान, गुरुवारी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमामपूर शिवारात वैभवचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी शरीरावर मारहाणीच्या खुणा आणि पायाला जखमा आढळल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या परिस्थितीमुळे मृत्यूबाबत संशय अधिक गडद झाला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी तब्बल बारा तास ठिय्या आंदोलन केले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तसेच नातेवाईकांशी चर्चा करून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले. रात्री उशिरा नवगण राजुरी येथे वैभववर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैभव चव्हाण हा कराटे स्पर्धांमधील उत्कृष्ट खेळाडू होता. त्याच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची प्रमाणपत्रे होती. 2024-25 मध्ये त्याने धाराशिव पोलीस भरतीसाठी खेळाडू प्रवर्गातून अर्ज केला होता. प्रतीक्षा यादीत असताना त्याच्या पुढील उमेदवाराने कथितरीत्या बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यानंतर त्याने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत मोठे रॅकेट उघडकीस आणले.
10 तारखेनंतर राज्यात राजकीय भूकंप? एकत्र बसण्याचे प्रफुल पटेलांना शरद पवारांच्या सूचना
मात्र, याच प्रकरणानंतर वैभवच्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली जात होती. त्याने याबाबत केलेली रेकॉर्डिंगही समोर आल्याचे सांगितले जात आहे. आता वैभवच्या संशयास्पद मृत्यूमुळे बोगस प्रमाणपत्र रॅकेटमधील संबंधितांची भूमिका, त्याला मिळालेल्या धमक्या आणि मृत्यूमागील नेमके कारण यांचा तपास करण्याची मागणी जोर धरत आहे. वैभव चव्हाणच्या मृत्यूचे नेमके कारण काय, हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात, याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातूनच होणार आहे.