Download App

गुरूदत्त : अश्वत्थाम्याची भळभळती जखम…

अमित भंडारी (सीईओ, लेट्सअप मराठी)

खुशियों की मंज़िल ढूँढी तो
ग़म की गर्द मिली
चाहत के नग़मे चाहे तो
आँहें सर्द मिली
दिल के बोझ को दूना कर गया जो ग़मखार मिला
हमने तो जब
कलियाँ मांगी काँटों का हार मिला

साहिरच्या या ओळी जेव्हा कानावर पडतात ते डोळ्यासमोर येणार आहे चेहरा म्हणजे शेर जेव्हा पहिल्यांदा वाचला, तेव्हा लगेचच आठवला तो… त्याची ती नजर. नेहमी कुठल्यातरी अज्ञाताचा शोध घेत असलेली… सगळ्याच्या पलीकडे काहीतरी पाहू पाहणारी. त्या नजरेतला तो न संपणारा दर्द… त्याच्या असामान्य प्रतिभेचा, दैदिप्यमान कारकिर्दीचा आणि त्याच्याभोवती सतत गुंफून राहिलेल्या वेदनेचा व्यामिश्र गुंता आहे. एक अशी वेदना, जी अखेर कलावंताच्या अस्तित्वाला कर्णाच्या कवचकुंडलासारखी जन्मजात राहिली… आणि अश्वत्थाम्याच्या भडबडत्या जखमेसारखी सतत ठसठसत राहिली.

अन् मागे राहिले काही अनुत्तरित प्रश्न…

काहीच कळत नव्हतं तेव्हाही, त्याच्या फोटोतली ती नजर आणि त्याच्या सिनेमांमधून जाणवणारी प्रतिभा मनाला भुरळ घालून गेली होती… आणि आजही ती जादू तशीच आहे.

गुरुदत्त – भारतीय सिनेसृष्टीच्या कल्पनेतून उमललेलं एक स्वप्न. एक असामान्य सौंदर्य आणि प्रतिभा, ज्याला नियतीने बहुदा शाप दिला होता. ज्यलासं उशा:प नव्हता… एखादा तारा क्षितिजावर चमकतो आणि आपल्या तेजाने सारं काही व्यापून टाकतो, उजळून टाकतो… तसाच तो चमकला… आणि अचानक अवेळी निखळून गेला…

आज, ९ जुलै २०२५.

एक शतक पूर्ण होतंय त्या कलाकृतीच्या जन्माला, ज्याची पडद्यावरची प्रत्येक फ्रेम, प्रत्येक नजर, आणि प्रत्येक संथ हालचाल काळाच्या सीमा ओलांडून आपल्या मनाला आजही स्पर्शते.

गुरुदत्त.

एक असं नाव, जे उच्चारलं की एक उदास कविता, एक जिवंत चित्रपट आणि एक सल ओथंबलेला…अन् स्मृतींमध्ये दरवळू लागणारा अनामिक गंध…

प्रवासाचा पहिला पडदा

१९२५ साली बंगळुरूच्या एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेला वसंतकुमार शिवशंकर पदुकोण. लहानपणापासून नाट्य, संगीत, साहित्य यांच्या लहरींनी त्यांना पछाडलं होतं. पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून आलेला हा तरुण, पुढे हिंदी सिनेमाची परिभाषा बदलून टाकेल, असं कोणाला वाटलंही नव्हतं.

१९५१ मध्ये “बाजी” या चित्रपटातून त्यांचं दिग्दर्शक म्हणून पदार्पण झालं आणि त्याक्षणी भारतीय सिनेमाच्या अंगणात एका नव्या प्रकाशाचा उदय झाला.

सिनेमातल्या कविता

गुरुदत्त हे केवळ दिग्दर्शक नव्हते, तर त्यांनी आपल्या फिल्ममधून माणसाच्या मनातल्या कोपऱ्यातल्या व्यथा, आकांक्षा, आणि विफफलतेचं गाणं चितारलं…त्यांची कारकीर्द म्हणजे सिनेमाच्या माध्यमातून जगण्यातलं अपरिहार्य दु:ख स्वीकारण्याचा एक सृजनशील प्रयत्न.

“प्यासा” – एका कविची कहाणी ज्याला जगाने दुर्लक्षित केलं, पण ज्याच्या शब्दांनी काळजाला ठणकावलं. साहिर लुधियानवींच्या अस्सल कविता आणि एस.डी. बर्मन यांच्या सुरांनी या चित्रपटाला अमरत्व दिलं. “जिन्हें नाज है हिंद पर, वो कहाँ हैं…” या एका ओळीत किती अनंत वेदना दडलेल्या आहेत.

“कागज के फूल” – भारतीय सिनेमातील पहिला सिनेमास्कोप प्रयोग आणि कदाचित सर्वात हळवा चित्रपट. एका दिग्दर्शकाच्या विलक्षण उत्कर्षाची आणि त्याच तितक्याच वेगाने झालेल्या अपमानाची शोकांतिका. पडद्यावरची ती उजेडात हरवलेली आकृती, जणू गुरुदत्त यांच्याच आयुष्याची प्रतिमा होती.

“साहिब बीबी और गुलाम” – एक तडफडणारी स्त्री, तिचं एकाकी मन, आणि तिच्या आयुष्याची पडझड. हा चित्रपट पाहताना माणसाच्या असुरक्षिततेला आणि प्रेमाच्या व्याकुळतेला नव्याने ओळख मिळते.

वेदनेचा अंधुक झुला

गुरुदत्त यांचं आयुष्य हे एका गूढ दुःखाच्या झुल्यावर झुलत होतं. जवळच्या नात्यांमधलं कोलमडणं, अपूर्णतेचा सल, कायम अस्वस्थ असलेलं मन…
पत्नी गीता दत्त यांच्याशी ताणलेलं नातं आणि वहीदा रहमानसोबतचं आकर्षण – या सगळ्या विसंगतींचा ओलावा त्यांच्या प्रत्येक सिनेमाच्या तळाला रेंगाळताना जाणवतो.

१९६४ मध्ये, वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी, त्यांनी जगाचा निरोप घेतला. हा अपघात होता की आत्महत्या, हे अज्ञातच राहिलं. पण त्यांच्या जाण्याने सिनेमा एका अपूर्ण कवितेसारखा काळजात रुतला…

गुरुदत्त : भारतीय सिनेमाला आत्म्याचा साज चढवणारा कलावंत

१९५०-६० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीवर एक असा कलावंत उदयाला आला, ज्याने केवळ मनोरंजनाची चौकट मोडली नाही, तर सिनेमा या माध्यमालाच एक विलक्षण आत्मा दिला. तो होता – गुरुदत्त. निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी जबाबदाऱ्या पेलताना त्याने जे काही निर्माण केले, ते आजही असंख्य रसिकांच्या मनावर कोरले गेले आहे.

गुरुदत्त यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या चित्रपटांची दु:खगर्भित सौंदर्यपूर्णता. ‘प्यासा’, ‘कागज़ के फूल’, ‘साहिब बीबी और गुलाम’ अशा कलाकृतींमध्ये एक हळव्या भावनांचा झरा सतत वाहताना दिसतो. ही केवळ गोष्ट नव्हती – तो एक काळजात झिरपणारा अनुभव होता. त्याच्या दृष्टीला एक असाधारण संवेदनशीलतेचा स्पर्श होता. उदाहरणार्थ, प्यासामधील विजय हा केवळ एका कवीची कथा नाही – तो समाजाच्या बेगडीपणावरची करुणा-अश्रुंची प्रतिक्रिया आहे. “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है” ही साहिर लुधियानवींची वेदनादायी कविता, गुरुदत्तच्या चेहऱ्यावरील निराशेच्या छायेत जेव्हा साकार होते, तेव्हा तो एक काळानंही न पुसता येईल असा क्षण बनून जातो.

त्याने कॅमेऱ्याला केवळ दृश्य टिपण्याचे साधन मानले नाही. व्हिज्युअल पोएट्रीची जाणीव त्याला होती. कागज़ के फूलमधील आलोक-छाया (लाइट अँड शॅडो)चा वापर, फ्रेममधील पोकळी, माणसांचा एकाकीपणा – हे सर्व सिनेमाला एका अगम्य शोकात्मतेची खोली देतात. हा सिनेमा तिकीट खिडकीवर अपयशी ठरला, पण काळाच्या झरोक्यात तो भारतीय सिनेमाचा सर्वात सुंदर अलंकार ठरला.

गुरुदत्तच्या कथांमध्ये स्त्री–पुरुष नात्याची एक हळवी, जिव्हाळ्याची पण दु:खाने व्यापलेली किनार असते. ‘साहिब बीबी और गुलाम’मध्ये छोटी बहूची तळमळ – “कौन आयेगा” हे तिचे शब्द – मानवी एकाकीपणाचा इतका अस्फुट स्वर कधी मांडला गेला होता का?

भारतीय सिनेमाला ‘मास अपील’पासून ‘कलात्मकतेकडे नेण्याचा जो प्रवास आहे, त्यात गुरुदत्त हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्यांनी दाखवून दिलं की, प्रेक्षकांना केवळ गाणे-नाच नव्हे, तर आत्म्याला भिडणारी गोष्टदेखील हवी असते. दुर्दैवाने, त्यांचे स्वतःचे आयुष्य मात्र त्यांच्या सिनेमांप्रमाणेच असह्य दु:खांनी व्यापले गेले. अपूर्णतेची, स्वीकार न मिळाल्याची, अस्वस्थतेची ती सल त्यांच्या मृत्यूनेही कायमच गूढ राहिली. पण त्यांच्या कलाकृतींनी मात्र भारतीय सिनेमाला अमरत्व मिळवून दिले.

आज कितीही तांत्रिक प्रगती झाली असली, तरी गुरुदत्तच्या चित्रपटांतील ती काळजात घुसणारी नजाकत, तो सौंदर्यदृष्ट्या सधन दृष्टिकोन आणि मानवी भावनांचा आविष्कार – अजूनही अढळ आहेत. त्यांनी भारतीय सिनेमाला कलात्मकतेची उंची दिली आणि एका कवीच्या हळव्या स्वप्नांची सजीव प्रतिमा मोठ्या पडद्यावर उभी केली.

गुरुदत्त म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या मनातली एक न संपणारी हुरहूर… आणि एक अजोड शोकगाथा. त्यांच्या पडद्यावरच्या ‘दर्द’ला जितकी नजरांनी दाद मिळाली, तितकीच ती आजही हृदयांनी जपली जाते – काळापलीकडे. असं म्हटलं जातं अखेरच्या क्षणांमध्ये रात्री गुरुदत्त यांनी त्यांच्या अत्यंत दोन जिवलग मित्रांना फोन केला होता ते दोन मित्र म्हणजे राज कपूर आणि देवानंद…

राजकपूर कुठल्यातरी पार्टीमध्ये व्यस्त होते आणि देवानंद ज्या क्षणी फोन आला त्यावेळी घरी हजर नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी गुरुदत्त आपल्यात नसल्याची बातमी आली आणि काल त्यांनी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला… त्यावेळी नेमकं त्याला काय बोलायचं असेल? त्याच्या मनात काय विचारांचे तरंग उठले असतील आपण त्या क्षणी त्या फोनवर का हजर नव्हतो अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांना ठेवून गुरुदत्त तर त्याच्यापलीकडे निघून गेले होते मात्र, जन्मभर त्या प्रश्नांचं मोहोळ घेऊन राज कपूर आणि देवानंद जगत राहिले अशी फिल्मी वर्तुळात एक दंतकथा आहे…

काळाच्या पलिकडचा कलावंत

आज शंभर वर्षांनंतरही गुरुदत्त आपल्या मनात आढळतात निर्माण करून आहेत. कारण त्यांनी सिनेमाला फक्त करमणूक न ठेवता, त्याला मानवी मनाचा आरसा असल्याची जाणीव त्या काळात प्रकर्षाने करून दिली. त्यांच्या प्रत्येक फ्रेममध्ये कविता आणि वास्तव यांचा नितांत सुंदर मिलाफ आपल्याला बघायला अनुभवायला मिळतो. त्यांनी प्रेम, एकाकीपण, आकांक्षा, आणि अपूर्णतेचं संचित आपल्या कलाकृतीत उतरवले. गुरुदत्त हे वास्तवाचे भान असलेला तरीही स्वप्नं पाहणारा ते प्रत्यक्षात आणणारा हळव्या मनाचा कलावंत होता.

दाटून आलेल्या सायंकाळी अवचित सोनेरी ऊन पडावं… हाती मोकाशी, ग्रेस किंवा जीए चे पुस्तक असावं…आणि सारे अंधारून यावं… असं काहीसे गुरुदत्त यांचं जगणं पाहताना होतं..

मनात खोल डोकावताना अपूर्ण राहिलेल्या कवितेत प्रत्येकाला आपलं काही ना काही सापडतंच – उदासी, करुणा, आणि एखादी शांत झालेली सल टोचत राहू शकते तसेच काही धागे जोडले आहेत गुरुदत्त यांच्या सृजनशील कलाकृतींशी…

– अमित भंडारी

follow us