Actor Ranveer Singh receives threat on WhatsApp : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी धुरंधर 2 चित्रपटामुळे चर्चेत असतानाच त्याला गंभीर धमकीचा सामना करावा लागला आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, रणवीरला व्हाट्सअँपवर व्हॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. धमकी मिळताच रणवीरने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, एका अज्ञात व्यक्तीने रणवीरला व्हॉइस न पाठवून मोठ्या रकमेची मागणी केली. ही घटना चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर अलीकडेच झालेल्या फायरिंगनंतर घडल्यामुळे या दोन घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचाही तपस सुरू आहे. धमकीची गंभीरता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तातडीने रणवीरच्या घराबाहेर अतिरिक्त सशस्त्र सुरक्षा तैनात केली आहे. गुन्हे शाखा आणि सायबर सेल संयुक्तपणे तपस करत असून, व्हाट्सअँप संदेशाचा स्रोत शोधण्यासाठी डिजिटल पुरावे, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक माहिती गोळा केली जात आहे.
टी-20 वर्ल्ड कप 2026 – दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल
पीटीआयच्या वृत्तानुसार, या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. खंडणी उकळण्याच्या हेतूने ही धमकी दिली असावी, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. रणवीर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ज्या सोसायटीत राहतात, तेथे वाढीव सुरक्षेमुळे रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर सशस्त्र पोलीस तैनात असल्याने काही रहिवाशांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे. सोसायटी प्रशासनानेही पोलिसांशी पत्रव्यवहार करून आपली भूमिका मांडली आहे.
या घटनेमुळे मुंबईतील नामवंत कलाकारांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही अनेक कलाकारांना धमक्या मिळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, रणवीर आणि त्याच्या कुटुंबीयांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्याने राखली जात आहे. दरम्यान, धमकी देणाऱ्याचा लवकरच माग काढण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. डिजिटल माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या धमक्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर सेल अधिक सक्रिय करण्यात आला आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमधील सुरक्षा व्यवस्थेबाबतची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
