Aga Aai Aaho Aai Web series Review: मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये सासू-सुनेचं नातं म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते कटकारस्थान, मत्सर, स्वयंपाकघरातील राजकारण आणि अखंड संघर्ष. अनेक दशकं या नात्याचं चित्रण नकारात्मक छटांमध्ये होत राहिलं. त्यामुळे “सासू-सून” हा शब्द ऐकला की प्रेक्षकांनाही पुढे काय घडणार याचा अंदाज येतो. मात्र ZEE5 मराठीवरील ‘अगं आई, अहो आई’ (Aga Aai Aaho Aai Web series) ही वेब सीरिज त्या चौकटीला पूर्णपणे मोडून काढते. ही केवळ सासू-सुनेची कथा नाही, तर दोन कुटुंबांच्या भावविश्वाची, विश्वासाची आणि मैत्रीची गोष्ट आहे.
दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी नात्यांमधील सूक्ष्म भावना टिपताना कोणताही कृत्रिम गोडवा किंवा अनावश्यक नाट्य निर्माण केलेलं नाही. त्यामुळे ही कथा पडद्यावर घडत नाही, तर आपल्या घरात घडतेय, अशी सहज भावना निर्माण होते.
लग्न दोन व्यक्तींचं नव्हे, दोन कुटुंबांचं…
कथेचा केंद्रबिंदू आहे श्रेया (हृता दुर्गुळे) आणि अनिश (सुयोग गोरे) यांचं लग्न. पण ही कथा त्यांच्या प्रेमकथेपेक्षा त्यांच्या लग्नानंतर तयार होणाऱ्या नात्यांची आहे. श्रेया प्रथमच अनिशच्या एकत्र कुटुंबाला भेटायला येते. अनेक नव्या चेहऱ्यांमध्ये ती थोडी गोंधळलेली असते. अशावेळी तिचा हात धरून तिला घरात घेऊन जाणाऱ्या सुनिताताई (निर्मिती सावंत) या एका दृश्यातूनच संपूर्ण मालिकेचा भावार्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. “सासू” आणि “आई” यांच्यातील अंतर इथूनच कमी व्हायला सुरुवात होते. मालिका पुढे जाताना श्रेया ही सुनेपेक्षा घरातील लेक बनते. त्याचवेळी जावई हा केवळ पाहुणा राहत नाही, तर सासूचा मुलगाच बनत जातो. या दोन्ही समांतर प्रवासाचं चित्रण अतिशय नाजूक आणि वास्तववादी आहे.
नात्यांमधील असुरक्षिततेचा अत्यंत प्रामाणिक वेध
‘अगं आई, अहो आई’चं सर्वात मोठं यश म्हणजे ही मालिका नात्यांमध्ये फक्त प्रेमच दाखवत नाही, तर त्या प्रेमासोबत येणाऱ्या असुरक्षिततेलाही तेवढ्याच प्रामाणिकपणे स्वीकारते. लेक सासूकडे अधिक जवळ जात असल्याचं पाहून तिच्या आईच्या मनात निर्माण होणारी पोकळी…आईला जावई मुलीपेक्षा अधिक जवळचा वाटतोय, अशी मुलीच्या मनातील हुरहूर… नवरा आईच्या अधिक जवळ आहे, असं वाटल्यावर पत्नीच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता… ही प्रत्येक भावना दिग्दर्शकाने कोणताही मेलोड्रामा न करता अत्यंत संयमाने मांडली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंग कृत्रिम वाटत नाही, तर अनुभवलेला वाटतो.
‘सासू’ नव्हे, तर मुलीचं मन समजणारी दुसरी आई…
मराठी पडद्यावर अनेकदा आईला मुलाच्या मनातील भावना लगेच कळतात, असं दाखवलं जातं, पण या मालिकेत वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळतो.
इथे सासूला सूनेच्या मनात काय सुरू आहे, हे तिच्या न बोललेल्या भावनांतून समजतं. ती समजून घेते, तिच्यावर निर्णय लादत नाही. ही बाब मालिकेला वेगळं स्थान मिळवून देते…त्याचप्रमाणे माहेर आणि सासर यांच्यातील हस्तक्षेप हा वादाचा विषय न बनता समजूतदार संवादाचा भाग बनतो. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक नातं अधिक विश्वासार्ह वाटतं.
पटकथेची मांडणी… साधेपणातलं सौंदर्य
प्रत्येक भागाची सुरुवात श्रेया आणि अनिश यांच्या लग्नापूर्वीच्या एखाद्या आठवणीने होते आणि त्यानंतर वर्तमानातील घटना उलगडत जातात. ही पटकथेची रचना मालिकेला वेगळी लय देते. फ्लॅशबॅकचा वापर केवळ तांत्रिक प्रयोग म्हणून… डिव्हाईस नाही, तर व्यक्तिरेखांच्या भावनिक प्रवासाला अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी करण्यात आला आहे… ही जमेची बाजू…
विशेष म्हणजे, कथा कुठेही अनावश्यक वळण घेत नाही. प्रेक्षकांना धक्का देण्यासाठी कृत्रिम ट्विस्ट किंवा नाट्यमय प्रसंग घालण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला आहे. त्यामुळे मालिकेचं वास्तव टिकून राहतं.
दिग्दर्शन : नात्यांवर विश्वास ठेवणारा संवेदनशील दृष्टिकोन
वरुण नार्वेकर यांचं दिग्दर्शन ही या मालिकेची खरी ताकद आहे. कोणत्याही पात्राला काळं किंवा पांढरं न दाखवता त्यांनी प्रत्येक व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्वीकारलं आहे. प्रसंग भावनिक आहेत; पण ते कधीच भावनांचा अतिरेक करत नाहीत. विनोद आहे; पण तो परिस्थितीतून निर्माण होतो. संघर्ष आहे; पण तो नातं तोडण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत करण्यासाठी आहे. याच संतुलनामुळे ‘अगं आई, अहो आई’ ही केवळ मनोरंजन करणारी मालिका राहत नाही, तर नात्यांवर नव्याने विचार करायला भाग पाडणारा अनुभव ठरते.
प्रत्येक कलाकाराने नात्यांना दिलाय जिवंतपणा
निर्मिती सावंत या मालिकेचं सर्वात मोठं बळ आहेत. सासू, आई आणि विहीण या तिन्ही भूमिका त्यांनी इतक्या सहजतेने उभ्या केल्या आहेत की, त्यांच्याकडे पाहताना अभिनय दिसत नाही, तर घरातील एखादी व्यक्ती दिसते… हा सहज स्वभाविकपणा त्यांच्या अभिनयाचे शक्तिस्थान आहे. जाणिव संपन्न अभिनेत्री असल्याचे चुणूक त्यांनी दाखवून दिलीय.
रेणुका शहाणे यांनी प्रत्येक मुलीच्या आईचं भावविश्व अप्रतिम उलगडलं आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर आईच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना… घालमेल त्यांनी अत्यंत संयत अभिनयातून साकारल्या आहेत. अत्यंत समंजसपणा हा त्यांच्या अभिनयाचे शक्तिस्थान आहे.
हृता दुर्गुळे ही संपूर्ण मालिकेचा भावनिक केंद्रबिंदू आहे. लेक, पत्नी आणि सून या तिन्ही भूमिका सांभाळताना तिच्या चेहऱ्यावर उमटणारे सूक्ष्म भाव, तिची घालमेल आणि आनंद ती प्रभावीपणे व्यक्त करते. त्यामुळे अनेक तरुण मुलींना श्रेया स्वतःसारखी वाटते.
सुयोग गोरे यांनी मुलगा, नवरा आणि जावई या तिन्ही भूमिकांमध्ये उत्कृष्ट समतोल साधला आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेत कोणताही कृत्रिम हिरोपणा नाही; म्हणूनच ती अधिक खरी वाटते. इतर सर्व कलाकारांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला असून, मालिकेचा एकसंधपणा कायम ठेवला आहे.
तांत्रिक बाजू
मालिकेचं छायांकन साधं, उबदार आणि घरगुती वातावरण जपणारं आहे. पार्श्वसंगीत प्रसंगांना पूरक ठरतं; ते भावनांवर वर्चस्व गाजवत नाही. संपादनही संथ न वाटता कथेला आवश्यक ती गती देतं.
आजच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण जीवनात प्रेक्षकांना केवळ थरार किंवा कटकारस्थानांचीच गरज नसते; कधी कधी मनाला शांत करणाऱ्या, नात्यांवर विश्वास ठेवायला शिकवणाऱ्या कथा अधिक आवश्यक असतात.
‘अगं आई, अहो आई’ ही अशीच एक वेब सीरिज आहे. ती सासू-सुनेच्या नात्यातील नवे कंगोरे अधोरेखित करते. नात्यांमध्ये जिंकणं-हरणं नसतं, समजून घेणं असतं, हा साधा पण महत्त्वाचा संदेश ती अत्यंत सुंदर पद्धतीने देते.
ही मालिका संपल्यावर पात्रं मनात रेंगाळतात आणि नकळत एकच विचार मनात येतो—या कुटुंबाचा प्रवास इथेच थांबू नये; ‘अगं आई, अहो आई’चा दुसरा सीझन नक्की यावा.
अमित भंडारी, समीक्षक
का पाहावी ? कटकारस्थानांवर नव्हे, तर विश्वास, मैत्री आणि प्रेमावर उभ्या असलेल्या नात्यांचा उत्सव साजरा करणारी वेब सीरिज
का टाळावी ? सारे काही स्वप्नवत वाटते
थोडक्यात काय ? संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावी अशी मनाला उब देणारी वेब सीरिज.
दिग्दर्शक: वरुण नार्वेकर
लेखन: कल्याणी पंडित
कलाकार: निर्मिती सावंत, रेणुका शहाणे, हृता दुर्गुळे, सुयोग गोहे
ओटीटी: ZEE5 मराठी
रेटिंग : ⭐⭐⭐1/2⭐ (3.5/5)
