‘अल्फा’ Review | YRF Spy Universe ला नवी ‘लेडी सुपरस्पाय’ मिळाली… पण ‘अल्फा’ खरंच Alpha ठरतो का?
रेटिंग : ⭐⭐⭐ (3/5)
YRF Spy Universe म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर मोठ्या प्रमाणावर अॅक्शन, थरार, हाय-ऑक्टेन स्टंट्स, आंतरराष्ट्रीय मिशन्स आणि सीटच्या टोकावर बसवणारा स्पाय ड्रामा उभा राहतो. एक था टायगर, वॉर, पठाण आणि टायगर 3 नंतर आता या विश्वात पहिल्यांदाच दोन महिला सुपरस्पाय केंद्रस्थानी असलेला ‘अल्फा’ दाखल झाला आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून एकच प्रश्न होता…आलिया भट्ट YRF Spy Universe ची पुढची मोठी अॅक्शन स्टार ठरेल का?
या प्रश्नाचं उत्तर बर्याच अंशी “हो” असं मिळतं. पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो…’अल्फा’ हा एक दमदार स्पाय थ्रिलर आहे का? आणि इथेच चित्रपट थोडासा डगमगतो.
कथा
लहानपणीच अपहरण झालेल्या सीताला (आलिया भट्ट) कर्नल लखावत (बॉबी देओल) आपल्या गुप्त ‘अल्फा’ प्रोग्रामअंतर्गत प्रशिक्षित करून एक घातक असॅसिन बनवतो. पण काळ बदलतो आणि सीताच तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांविरुद्ध उभी राहते. सूड, देशभक्ती, कुटुंब, विश्वासघात आणि गुप्त मिशन्स यांच्या गुंतागुंतीत तिचा प्रवास पुढे सरकतो.
कथेत अनेक ट्विस्ट आहेत. काही धक्कादायक वाटतात, काही प्रभावी ठरतात; पण अनेक ट्विस्ट इतक्या वारंवार येतात की पुढे ते आश्चर्य वाटण्याऐवजी थकवू लागतात.
आलिया… चित्रपटाची सर्वात मोठी ताकद
या चित्रपटाचं सर्वात मोठं यश म्हणजे आलिया भट्ट.
अॅक्शन सीक्वेन्समध्ये ती अतिशय आत्मविश्वासाने वावरते. तिची बॉडी लँग्वेज, स्टंट्स, फाईट कोरिओग्राफी आणि स्क्रीन प्रेझेन्स प्रभावी आहे. आतापर्यंत रोमँटिक, ड्रामा किंवा इमोशनल भूमिकांमध्ये चमकलेली आलिया इथे पूर्णपणे एका अॅक्शन स्टारच्या भूमिकेत विश्वासार्ह वाटते.
विशेष म्हणजे, ती हा चित्रपट पूर्णपणे तिच्या खांद्यावर पेलताना ती याचं ओझं समर्थपणे पेलते.
मात्र ज्या क्षणी अॅक्शन थांबते आणि चित्रपट भावनिक ट्रॅकवर जातो, तिथे त्याचा वेग मंदावतो…
स्पाय थ्रिलर की कौटुंबिक मेलोड्रामा?
‘अल्फा’ची सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्याचा टोन.
एका क्षणी हा चित्रपट आंतरराष्ट्रीय गुप्त मोहिमेवर असतो, तर दुसऱ्याच क्षणी तो आई-वडिलांचं दुःख, बालपणीचं आघात, हरवलेलं कुटुंब, बहिणीचं नातं आणि अपराधीपणाच्या भावनांमध्ये अडकतो.
भावनिक प्रसंग वाईट नाहीत; पण त्यांचं प्रमाण इतकं वाढतं की स्पाय थ्रिलरचा थरार मागे पडतो.
YRF Spy Universe ची ओळख म्हणजे वेग, स्टाईल आणि अॅक्शन. ‘अल्फा’ मात्र अनेकदा टीव्हीवरील कौटुंबिक नाट्याकडे झुकतो.
शर्वरी वाघ चमकदार
शर्वरीचे आलिया सोबतच ॲक्शन सिक्वेन्स, तिचे इमोशनल सीन्स आणि अनिल कपूर सोबतच्या केमिस्ट्री टीकेचं बहारदार आहे. काही दमदारपणे टक्कर देते. परफॉर्मन्स आणि लूक्स मध्ये काही अधिक उजवी ठरते.
खलनायक आणि सहाय्यक कलाकार
बॉबी देओलचा लुक प्रभावी आहे. त्याची स्क्रीन प्रेझेन्सही चांगली आहे; पण त्याच्या पात्राला पुरेसा गहिरेपणाचा लेखन पातळीवर आधार मिळत नाही.
अनिल कपूर RAW प्रमुखाच्या भूमिकेत फारसा प्रभाव पाडत नाही. त्याच्या वाट्याला आलेले संवाद आणि व्यक्तिरेखा अपेक्षित उंची गाठत नाही.
दिया मिर्झा आणि इतर सहाय्यक कलाकार कथेला भावनिक बाजू देण्याचा प्रयत्न करतात; पण त्यामुळे चित्रपटाचा वेग अधिकच मंदावतो.
हृतिक रोशन चा कॅमिओ
कबीरच्या भूमिकेत हृतिक रोशनची एन्ट्री थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या मिळवते.
पण कथा संपल्यानंतर स्वतःलाच प्रश्न पडतो…त्याची या चित्रपटात खरंच गरज होती का?
हा प्रसंग कथेला पुढे नेण्यापेक्षा Spy Universe चा विस्तार दाखवण्यासाठी घातल्यासारखा वाटतो.
दिग्दर्शन
दिग्दर्शक शिव रवैल यांनी अॅक्शन सीक्वेन्स प्रभावी उभे केले आहेत. अनेक दृश्यांमध्ये मोठेपणा जाणवतो.
मात्र पटकथेची विस्कळीत रचना आणि भावनिक भागांवर दिलेला जास्त भर यामुळे दिग्दर्शनाची ताकद पूर्णपणे ठाशीवपणे समोर येत नाही.
तरीही War 2 च्या तुलनेत ‘अल्फा’ अधिक सुसंगत आणि नियंत्रित वाटतो.
तांत्रिक बाजू
चित्रपटाचं छायांकन आकर्षक आहे. लोकेशन्स भव्य आहेत.
अॅक्शन कोरिओग्राफी, बॅकग्राऊंड स्कोर आणि VFX अनेक ठिकाणी प्रभावी ठरतात.
मात्र एडिटिंग अधिक धारदार असायला हवं होतं. काही भावनिक प्रसंग सहज कापता आले असते आणि त्यामुळे चित्रपट अधिक वेगवान झाला असता.
विशेष उल्लेख
चित्रपट पाकिस्तानचा उल्लेख थेट करतो. ‘दुश्मन मुल्क’सारख्या अस्पष्ट शब्दांमागे लपण्याचा प्रयत्न करत नाही. हा बदल वेगळा वाटतो. मात्र या राजकीय पार्श्वभूमीचा अधिक सखोल वापर करता आला असता.
‘अल्फा’ हा वाईट चित्रपट नक्कीच नाही, पण तो जितका मोठा आणि दमदार बनू शकला असता, तितका मोठा होत नाही.
आलिया भट्टचा दमदार अॅक्शन अवतार, काही उत्कृष्ट स्टंट सीक्वेन्स, भव्य निर्मितीमूल्य आणि स्त्री केंद्रित कथा हे चित्रपटाची शक्तिस्थाने आहेत.
…पण वारंवार येणारे काही प्रमाणात लांबलेले भावनिक प्रसंग, अनावश्यक ट्विस्ट, विस्कळीत कथन यामुळे चित्रपट अपेक्षित उंची गाठत नाही.
YRF Spy Universe ला एक सक्षम महिला सुपरस्पाय नक्की मिळाली आहे; मात्र या विश्वाला पुन्हा एकदा War किंवा Pathaanसारखा संस्मरणीय स्पाय थ्रिलर अजूनही मिळालेला नाही.
जर तुम्ही फक्त वेगवान, थरारक आणि बुद्धिमान स्पाय थ्रिलरची अपेक्षा करत असाल, तर हा चित्रपट त्या अपेक्षेच्या निकषांवर खरा उतरत नाही.
जर तुम्ही आलिया भट्टचे चाहते असाल, दमदार अॅक्शनसाठी थिएटरमध्ये जात असाल, तर ‘अल्फा’ एकदा नक्की पाहू शकता.
अल्फा –
का पाहावा – भन्नाट ॲक्शन, शर्वरी वाघ आलियाचा किलर परफॉर्मन्स, बॉबी देवल अनिल कपूरच्या मॅच्युअर्ड अंदाजासाठी
का टाळावा – शक्तीस्थान कधी कधी मर्यादा ठरतात यासाठी
थोडक्यात काय – ॲक्शन अन् इमोशन्सची ‘अल्फा’ आणि बाकी फिल्मी भेळ ‘बीटा’
कलाकार – आलिया भट, शर्वरी वाघ, अनिल कपूर, बॉबी देओल
दिग्दर्शक – शिव रवेल
पटकथा- सौमिल शुक्ला श्रीधर राघवन
संवाद -इशिता मोईत्रा
कथा, उदय चोप्रा,
निर्माता – आदित्य चोप्रा (यशराज फिल्म्स)
रेटिंग : ⭐⭐⭐ (3/5)
