Another setback for Rajpal Yadav : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात नुकतेच न्यायालयाकडून दोषी ठरवल्यानंतर आता त्यांच्या दोन मालमत्तांचा लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 16 कोटी रुपयांहून अधिक थकीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ही कारवाई सुरू केली असून, संबंधित मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादव यांनी पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी यादव यांच्या नावावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेकडून सुमारे 16.61 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र निर्धारित कालावधीत कर्जाची परतफेड करण्यात अपयश आल्याने बँकेने संबंधित मालमत्तांवर ताबा मिळवला आहे. आता या मालमत्तांचा लिलाव 9 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या दोन मालमत्तांपैकी एक मालमत्ता उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील कचेरी रोड परिसरात आहे, तर दुसरी मालमत्ता मुंबईतील वांद्रे आणि वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही मालमत्ता कर्जासाठी गहाण ठेवण्यात आल्या होत्या. हे संपूर्ण प्रकरण 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लापता’ या चित्रपटाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः राजपाल यादव यांनी केले होते. चित्रपटाच्या निर्मितीसाठी बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते.
धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढील आठवड्यात; संघटनात्मक बहुमताचा ठाकरे गटाचा दावा
मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. परिणामी कर्जाची परतफेड रखडली आणि कालांतराने त्यावरील व्याज वाढत गेले. त्यामुळे थकीत रकमेचा आकडा 16 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला. दरम्यान, 10 जुलै रोजी चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना दोषी ठरवत कारावासाची शिक्षा कायम ठेवली होती. यापूर्वीही या प्रकरणात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. न्यायालयीन आदेशानंतर आता मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
मात्र या संपूर्ण प्रकरणावर राजपाल यादव यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, त्यांचे मोठे बंधू श्रीपाल यादव यांनी हे प्रकरण जुने असल्याचे सांगत बँकेसोबत तडजोडीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती दिली आहे. एकेकाळी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे राजपाल यादव आता आर्थिक आणि कायदेशीर अडचणींच्या भोवऱ्यात अडकले आहेत. न्यायालयीन कारवाई, थकीत कर्ज आणि मालमत्तांच्या लिलावामुळे त्यांच्या समोरील संकटे अधिकच गडद झाली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी कोणती घडामोड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
