Anupama TV Show News : स्टार प्लस वाहिनीवरील प्रमुख मालिका अनुपमाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या शोचं वैशिष्ट्य म्हणजे याचं दमदार कथानक, भावनिक संबंध आणि जोडणारं कौटुंबिक नातं. गेल्या काही वर्षांपासून हा शो भावनिक क्षणांना उच्च नाटकासह एकत्रित करून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये मालिकेच्या स्टोरीत मोठे वळण आले आहे. सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या नृत्य स्पर्धेची सुरुवात झाली आहे. यावेळी हा फक्त परफॉर्मन्स नाही तर आई आणि मुलगी यांच्यातील टक्कर आहे. अनुपमा तिची मुलगी राहीशी स्पर्धा करताना दिसणार आहे.
Anupama मध्ये अनुज बनलेल्या गौरव खन्नाला ओळखणेही कठीण; केला चकीत करणारा लूक!
अनुपमाची टीम ‘डान्स राणी’ आणि राहीची टीम ‘अनुज डान्स अॅकेडमी’ आहे. दोन्ही टीम (Anupama TV Show) कठोर परिश्रम घेऊन तयारी करत आहेत. ही स्पर्धा शानदार परफॉर्मन्ससह भावना आणि जबरदस्त ड्रामा घेऊन येणार आहे. कारण दोन्ही टीम जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आद्रिजा रॉय या मालिकेत राहीच्या भूमिकेत आहे. तिने आगामी एपिसोड्सबाबत आपला अनुभव शेअर केला आहे. राहीच्या रुपात हा माझ्यासाठी खूप खास आणि भावनिक क्षण आहे. कारण ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो तो दिवस अखेर आला आहे. माझी आई अनुपमासोबत एका स्टेजवर उभं राहून तिच्याच विरुद्ध नृत्यस्पर्धेत उतरणं या गोष्टीची मी कधीच कल्पना केली नव्हती.
आम्ही दोघींनीही या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत केली आहे. दोन्ही टीमची तयारीही खूप इंटेन्स राहिली आहे. एनर्जी पॅशन आणि इमोशन्स आता शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे नृत्यस्पर्धा आमच्यासाठी फक्त स्पर्धा राहिलेली नाही तर आमच्या प्रवासाचा टर्निंग पॉइंट ठरला आहे. माझ्यासाठी पराभव किंवा विजय महत्वाचा नसून माझ्या आईसोबत स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे.
आता स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू आहे. यात कोण बाजी मारणार हाच मोठा सवाल आहे. टीम डान्स राणी आणि अनुज डान्स अकॅडमी या दोन टीममधून कोण विजयी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच आहे. तर मग हा उत्साह, उत्कटता, जिंकण्याची जिद्द, जिंकल्यानंतरचा आनंद या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी मालिका विसरू नका. या स्पर्धेचा हायहोल्टेज एपिसोड या रविवारी रात्री 10 वाजता स्टार प्लस या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.