Aryans Navadurga Samman Award : राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा दुसरा पुरस्कार सोहळा असा मनोरंजन विश्वात नावलौकीक मिळवलेल्या ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ पुरस्कार सोहळ्याची नामांकने लवकरच घोषित होणार आहेत. याच सोहळ्यात ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ वितरीत करण्यात येणार आहेत. ‘मराठी कलांचा, गुणांचा प्रतिभा प्रशंसा सोहळा’ अशी बिरुदावली मिरवणारा ‘आर्यन्स सन्मान’ पुरस्कार (Award ) सोहळा घोषणेपासूनच मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरल्याचं पाहायला मिळालं.
बुधवार २७ नोव्हेंबर रोजी या पुरस्कार सोहळ्याची नामांकने घोषित केली जाणार आहेत. दुसऱ्या वर्षात पदार्पण केलेला ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ नामांकन सोहळा यंदा बुधवार २७ नोव्हेंबर रोजी केशव बाग, डी. पी. रोड, कर्वे नगर, पुणे येथे सायंकाळी ६.३० वाजता भव्य-दिव्य स्वरूपात पार पडणार आहे. ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण २३ विभागांमध्ये मराठी चित्रपटांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
Rajveer Movies : अॅक्शनपॅक्डराजवीर; चित्रपटाचा ट्रेलर लाँच; सुहास खामकरची प्रमुख भूमिका
नाट्य विभागात १६ पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांची एकूण रक्कम १३ लाख रुपये असून ही रक्कम ओमा फाऊंडेशन कडून वितरित करण्यात येणार आहे. (दि १ जून २०२३) ते (दि. ३१ मे २०२४) या कालावधीत प्रदर्शित किंवा सेन्सॉर झालेल्या मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना तसेच चित्रपटांना पुरस्कार सोहळ्यात प्रवेश देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याची नामांकने उत्सुकता वाढवणारी ठरणार आहेत.
याच सोहळ्यात आपल्या असामान्य अशा कर्तृत्वाच्या बळावर समाजाला नवी दिशा देण्याचे काम करणाऱ्या नवदुर्गांचा ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कारा’चे स्वरूप रुपये २१००० रोख आणि सन्मान चिन्ह असे असून ही रक्कम ओमा फाऊंडेशन कडून वितरित करण्यात येणार आहे.
‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ अंतिम पुरस्कार सोहळा हा गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे होणार असून लवकरच याची तारीख घोषित करण्यात येणार आहे. पुण्यामधून आर्यन्स ग्रुप लवकरच मराठी वृत्तवाहिनी, मनोरंजन वाहिनी, क्रीडा वाहिनी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे मिडीया आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. यामुळे पुणे परिसरातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते यांनाही आर्यन्स परिवारात सामावून घेता येणार आहे.