Asambhava : सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव’ या चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वी झळकलेल्या पोस्टर्सनी प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण केले होते. रहस्याची चाहूल देणारं ते पोस्टर पाहून सगळेच ‘नेमकं काय?’ या विचारात पडले होते. आणि आता त्याच कुतूहलाला आणखी उंची देत, चित्रपटाचा थरारक टीझर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या नजरेतच जाणवतं, हा फक्त एक चित्रपट नसून मन हेलावून टाकणारा एक अनुभव आहे. टीझरमध्ये मुक्ता बर्वेसोबत काहीतरी अघटित घडताना दिसतंय. तिची घाबरलेली नजर, हवेलीतील गूढ शांतता आणि अचानक घडणाऱ्या घटनांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची वाढली आहे.
मुक्ता बर्वे (Mukta Barve) दुहेरी भूमिकेत आहे का? हा प्रश्नही सतत मनात घोळतो. दुसरीकडे प्रिया बापटही एका गूढ भूमिकेत झळकतेय, तिचं पात्र काहीतरी लपवतंय असं जाणवतं. हवेलीत काही गुपितं दडलेली आहेत, कुणाचा तरी खून होताना दिसतो, पण कोणाचा आणि का? सचित पाटील स्वतः या गूढाच्या शोधात आहे, तर संदीप कुलकर्णीचा या सगळ्याशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले असून सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘असंभव’ पाहिल्यावर मिळणार आहेत.
या टीझरमधून स्पष्ट होतंय की ‘असंभव’ रहस्यपट असून भावना, थरार आणि अप्रत्यक्षित घटनांनी भरलेला एक मनोवैज्ञानिक प्रवास आहे. या सिनेमात काहीतरी वेगळं, नवं आणि विचार करायला लावणारं आहे, हे काही सेकंदांतच जाणवतं. प्रेक्षकांना कधीही न पाहिलेला सिनेमॅटिक अनुभव देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, नैनितालमधील निसर्गरम्य ठिकाणांवर झालेलं चित्रीकरण, आणि तांत्रिक बाजूंची भव्यता हे सगळंच अप्रतिम दिसतेय.
दिग्दर्शक, निर्माते सचित पाटील म्हणाले, ” ‘असंभव‘ हा माझ्यासाठी केवळ रहस्यपट नाही, तर मानवी मनाच्या गाभ्यात डोकावण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक पात्रात एक गूढ आहे आणि ते उलगडत जाताना प्रेक्षकांचं मन हादरणार आहे. टीमने पूर्ण समर्पणाने काम केलं असून हा चित्रपट केवळ पाहाण्याचा नसून अनुभवण्याचा आहे.”
निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, ”या चित्रपटात आम्ही पारंपरिक रहस्यपटाच्या चौकटीतून बाहेर जाऊन काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पटकथा आणि दृश्यांची मांडणी इतकी गुंतवून ठेवणारी आहे की, शेवटपर्यंत तुम्ही ‘गेस’ करू शकणार नाही. ‘असंभव’ हा मराठी सिनेमातील एक नवा प्रयोग ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर म्हणाले, “या प्रकल्पात तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्टता साधणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट होतं. चित्रीकरण नैनितालसारख्या निसर्गरम्य ठिकाणी झालं आणि त्याने चित्रपटाला एक वेगळी ओळख मिळाली. प्रत्येक फ्रेम सिनेमॅटिक दृष्टिकोनातून विचारपूर्वक घडवली आहे. ‘असंभव’ प्रेक्षकांना थरार आणि सौंदर्याचा संगम अनुभवायला देईल.”
मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटू ठार, मालिका रद्द
या चित्रपटाचं सहदिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केलं असून, प्रमुख भूमिकेत सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी आहेत. ‘असंभव’ची निर्मिती मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी केली आहे. तर सह-निर्मिती एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर तसेच संजय पोतदार यांनी केली आहे.