मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र; ‘असंभव’मधून रंगणार रहस्यमय कथा
या चित्रपटाबद्दल प्रिया बापट म्हणते, '' 'आम्ही दोघी' करताना आम्ही ज्या भावनिक प्रवासातून गेलो, तो अनुभव आमच्यासाठी अत्यंत खास होता.
मराठी चित्रपटसृष्टीतील दोन बहुप्रतिभावान अभिनेत्री (Mukta) पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि यावेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना एका थरारक कथेत पाहायला मिळणार आहे. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या दोन्ही अभिनेत्रींचा आगामी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट ‘असंभव’ २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर आणि पोस्टरमुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कथानक, कलाकारांची जोडी आणि टिझर, ट्रेलरमधून निर्माण झालेलं रहस्य यामुळे ‘असंभव’ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा ठरला आहे.
या चित्रपटाबद्दल प्रिया बापट म्हणते, ” ‘आम्ही दोघी’ करताना आम्ही ज्या भावनिक प्रवासातून गेलो, तो अनुभव आमच्यासाठी अत्यंत खास होता. तो जिव्हाळ्याचा बंध प्रेक्षकांनी देखील अनुभवला. ‘असंभव’मध्ये आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत, मात्र यावेळी तोच बंध एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल. मुक्ता सोबत काम करताना नेहमीच एक उत्साह असतो. तिची काम करण्याची पद्धत कमाल आहे. ती त्या भूमिकेत स्वतःला झोकून देते आणि त्यामुळेच समोरचाही तितक्याच उत्साहाने तिच्यासोबत काम करू शकतो. यात आमच्या नात्याची नवी बाजू तर दिसेलच, परंतु त्याचसोबत अनेक प्रश्न आणि आश्चर्याचे क्षणही अनुभवायला मिळतील.
नतमस्तक; या मराठी चित्रपटाची पोस्टर लाँचद्वारे घोषणा
मुक्ता बर्वे या अनुभवाबद्दल सांगते, “प्रिया सोबत काम करणं नेहमीच एक वेगळा आनंद देणारं असतं. तिच्यासोबत असताना संवाद सहज साधला जातो आणि एकमेकांवरील विश्वास आपोआप वाढतो. ‘आम्ही दोघी’मध्ये आम्ही नात्याची ऊब अनुभवली होती, तर ‘असंभव’मध्ये त्या नात्याभोवती थरार, रहस्य आणि भीतीचं वलय आहे. त्यामुळे काम अधिक रोचक झालं आहे आणि प्रेक्षकांसाठी हा एक नवा व अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. ‘आम्ही दोघी’ चित्रपटानंतर आता या दोघी पुन्हा एकत्र आल्या आहेत, मात्र यावेळी त्यांची केमिस्ट्री पूर्णपणे वेगळ्या वातावरणात, गूढता आणि थराराने व्यापलेल्या कथेत रंगताना दिसणार आहे.
‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी तर सह दिग्दर्शन पुष्कर सुधाकर श्रोत्री यांनी केले आहे. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, याच निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकले आहे. सह-निर्मात्यांमध्ये एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई तसेच पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार यांचा समावेश आहे.
