Ata Thambaycha Naay Movie Review: भाकरीचा चंद्र शोधता शोधता जिंदगी बरबाद झाली… असं म्हणणाऱ्या शोषित आणि कामगार वर्गाच्या व्यथांकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना भोवतालची परिस्थिती बदलण्यासाठी मेहनतीला ज्ञानाची कास देण्याची आवश्यकता आहे, अशी दृष्टी देणारा सिनेमा इथपर्यंत ‘आता थांबायचं नाय..!’ मर्यादित राहत नाही… जगण्याच्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहताना उत्तर शोधलं की जगणं बदलतं… याची जाणीव करून देणारा शिवराज वायचळचा पहिला वहिला प्रयत्न म्हणून खूपच उजवा आहे. समाजातील दुर्लक्षित असलेल्या घटकांच्या प्रश्नांना… जाणिवांच्या परिघावर एक्स-रे टाकताना केवळ काठावर उभे राहून पाहण्याचा फील देत नाही तर आपण पोहत असताना नाकातोंडातही पाणी गेल्याचा अनुभव हा सिनेमा देतो. ‘आता थांबायचं नाय..!’ हा केवळ चतुर्थश्रेणी कामगारांचा रात्र शाळेत शिकून मॅट्रिक होण्याचा प्रवास नाही तर जगण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करत आपली लढाई लढण्यासाठी ऊर्जा देणारा… बळ देणारा… आपल्या प्रश्नांवर इतर कोणीतरी उत्तर शोधण्यापेक्षा आपल्या जगणं आपल्यालाच बदलावं लागणार, याची जाणीव करून देणारा सिनेमा आहे. जयंत पवार यांच्या अधांतरमध्ये सापडलेला भरत जाधव याच्यावर कालांतराने स्टारपणाची झूल चढत गेली… रूढार्थाने मराठीत असेच सिनेमे चालतात. त्यामुळे त्याच्या वाटेला आलेले सिनेमे आणि टाईपकास्ट होण्याच्या चक्रात अडकत असताना आता, थांबायचं नाय..!’ ही संजीवनी नवा श्वास भरून पुढचा प्रवास तितक्याच दिमाखात डौलात करायला लावणारा एक मैलाचा दगड आहे.
सशक्त व्यक्तिरेखा अंगीभूत कलागुणांनी समंजसपणे तितक्याच नाजूक आणि तरल भावनांच्या हिंदोळ्यावर साकारता येते, याची जाणीव आहे. भरत जाधव यांनी साकारलेला सखाराम मंचेकर अलवारपणे डोळ्याच्या कडा ओलावतो… नातू त्यांच्याकडे बॉल फिरवतो आणि गटार साफ करणाऱ्या आजोबांना तुम्ही गिफ्ट दिलेल्या नव्या बॉलला देखील वास येतो… त्यावेळी तू बॉल उचलून वास घेण्याचा सीन असेल किंवा सुनेसोबतचे सिद्धार्थ आणि इतर टीम सोबतचे सिक्वेन्सेस आपलं नाणं खणखणीत वाजवताना एखांदा अलगदपणे उचलून घेण्याचे पकडलेले बेअरिंग सखारामचं अस्तित्व अधोरेखित करतात.
कर्जाचे हफ्ते… तुटपुंजा पगार आणि मुलीच्या डोळ्यातील स्वप्न यामध्ये ससेहोलपट होणारा मारुती कदम सिद्धार्थ जाधवने फार सशक्तपणे साकारला आहे. रात्रीची शाळा आणि टॅक्सी चालवणं यामध्ये होणारी कृष्ण मुलीच्या शाळेत व्यासपीठावरून भाषण करत असताना तोंडातून शब्द न फोटो पाहणार आणि डोळ्यातून बोलणारा मारुती साकारताना सिद्धार्थ not for sale आणि beyond the lad of hatattamal & scandal fairyland वर बेतलेली त्या तिथे पलीकडे या एकांकिकांमधला प्रामाणिकपणे काम करणारा सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा गवसला… असे वाटून गेले.
दीपक शिर्के यांच्यासोबतचे सिक्वेन्सेस, इतर कामगारांना उद्देशून केलेलं भाषण ओम भुतकरसोबतचे काही सीन्स यामधला त्याचा सहज वापर रंग भरतो. कचरा वेचणाऱ्या प्राजक्ता हनमघर आणि किरण खोजे यांनी जोरदार बॅटिंग केली आहे. अप्सराच्या नवऱ्यासोबतचा सिक्वेन्स आणि ओला आणि सुका कचरा वेगळा करताना इंग्रजीत कान उघडणी मानसन्मानसाठी शिकण्याबद्दलची उपरती आणि जाणीव फार सघनतेने दाखवली आहे.
ओम भुतकर यांनी साकारलेल्या निलेश माळी रात्र शाळेचा शिक्षक हा इतक्याच सहजपणे व्यक्तिरेखित रंग भरतो. हताशपणे आशुतोष गोवारीकरांबरोबरच सिक्वेन्स, रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर यांच्या सोबतचा सीन… पर्ण पेठे बरोबरचे काही सिक्वेन्सेस यामध्ये ओम काय ताकदीचा अभिनेता आहे, हे त्यांने दाखवून दिले आहे. पर्णाने तिच्या वाट्याला आलेले सीन्स चोखपणे वठविलेले आहेत. आपला अनुभव मोजक्या सीन्समध्ये भेटलेले दीपक शिर्के सादरीकरणात अधोरेखित करतात.
या सगळ्यांची मोट बांधणारा उदय शिरूरकर हा प्रशासकीय अधिकारी आशुतोष गोवारीकर यांनी लीलया साकारला आहे. सिस्टीममध्ये निबर झालेल्या मुरलेल्या कामगारांकडून कामापेक्षा वेगळी गोष्ट सफाईने करून घेत असताना आदरयुक्त भीती आणि वचक याची धूसर सीमारेषा ओलांडू दिलेली नाही, हे या अभिनेत्याचे शक्तिस्थान. अनुभवाच्या आणि वयाच्या या टप्प्यावर शिवराजच्या पहिल्या प्रयत्नासाठी त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं दाखवलेलं बळ हे त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदाना इतकच किंबहुना त्यापेक्षा निश्चितच मोठं आहे.
अर्जुन नावाच्या शॉर्ट फिल्ममध्येच आपले वेगळेपण सिद्ध करणारे श्रीकांतसारख्या बॉलिवूडमधील वेगळ्या प्रयत्नाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणारा शिवराज त्याच्या पहिल्या प्रयत्नात स्वतःच वेगळेपण अधोरेखित करतो. विषयाची व्याप्ती त्याची मांडणी आणि सिनेमा उलगडून दाखवत असताना इमोशनचे केलेले कॅल्क्युलेशन त्याची पेरणी याचं गणित अचूकपणे मांडतो. अनुभवाने समृद्ध असलेल्या माणसांकडून आपल्याला अपेक्षित असलेले काम काढून घेणे यामध्ये तो सरस ठरला आहे हे कलाकृती पाहताना जाणवते. 2016 साली मुंबई महापालिकेत घडलेल्या एका घटनेवरून प्रेरित होऊन हा सिनेमा करण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्टा करतो आणि ते स्वप्न पूर्ण करतो ही महत्त्वाची बाब वाटते. शिवराज वायचळसोबत ओंकार गोखले आणि अरविंद जगताप या त्रयीने लिहिलेल्या या सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेले आहे ते अभिनय आणि संजय सांकलाच्या एडिटिंगने…पटकथेत निसटलेले दुवे सफाईने हाताळलेले इथे दिसतात.
झी स्टुडिओजसारख्या एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसने नव्या दिग्दर्शकाच्या पाठीशी उभं राहणं त्याच्या संकल्पनेवर विश्वास ठेवून सिनेमाची निर्मिती करणे ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी तुषार आणि निधी हिरानंदानीसोबत उमेश कुमार बंसल, धरम वालिया आणि बवेश जानवलेकर यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
सांग सांग भोलानाथ… आता थांबायचं नाय टायटल हा ट्रॅक आणि उदयाचा सूर्य तू… ही गुलराज सिंगने संगीतबद्ध केलेली गाणी ही स्वतःच वेगळं अस्तित्व अधोरेखित करतात. सारं काही अंधारून येत तेव्हा अंधाराची गाणी असतात असं ब्रेख्त म्हणतो… ही अंधाराची गाणी अनुभवायची असतील त्याची धून जाणून घ्यायची असेल…तर आता थांबायचं नाय अनुभवायला हवा.
का पाहावा ?
भरत आणि सिद्धार्थ जाधवच्या अभिनयासाठी, शिवराजच्या दिग्दर्शनासाठी आणि मनाला प्रेरणा आणि उभारी देणारा सिनेमा म्हणून
का टाळावा ?
जगण्याचा तुकडा कापून देणाऱ्यांचे… कष्टकऱ्यांचे प्रश्न आणि जगणं बदलणं हा स्ट्रगल… बघायची इच्छा नसेल तर…
थोडक्यात काय : मनाला उभारी ची गरज असेल रुटीनच्या चक्रव्यूहात अडकताना वेगळं काही करायचं असेल तर
सिनेमाला मी देतोय चार स्टार्स.
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक