‘कढीपत्ता’चा उत्कंठावर्धक ट्रेलर भेटीला! 7 नोव्हेंबरला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
अभिनेत्री रिद्धी कुमारची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री होणार असल्याने 'कढीपत्ता' या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

Kadhipatta Trailer Release : दक्षिणेकडील बहुचर्चित चित्रपटांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री रिद्धी कुमारची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री होणार असल्याने ‘कढीपत्ता’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. रिद्धीची जोडी मराठमोळा अभिनेता भूषण पाटीलसोबत जमल्याने एक कमालीचे कॅाम्बिनेशन या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या आणि बऱ्याच वैशिष्ट्यांच्या बळावर टिझरपासून पुढे सुरू असलेल्या आजवरच्या प्रवासात ‘कढीपत्ता’ने क्षणोक्षणी रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्याचे काम केले आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या दिमाखात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या मराठी सिनेसृष्टीत पसरलेल्या ‘कढीपत्त्या’चा सुगंध 7 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात दरवळणार आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
युवान प्रोडक्शन प्रस्तुत ‘कढीपत्ता’ चित्रपटाची (Kadhipatta) निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली असून चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन विश्वा यांनी केले आहे. महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीमधील उखाण्याने टिझरची सुरुवात झालेल्या ‘कढीपत्ता’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागवले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने त्यात अधिक भर घातली आहे. पती-पत्नीच्या तू तू मैं मैं पासून ‘कढीपत्ता’चा ट्रेलर सुरू (Entertainment News) होतो. नायक आणि नायिका एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असतात. ते पाहून समोर बसलेल्या न्यायाधीशांना त्यांची अक्षरश: कीव येते आणि ‘अरे लव्ह मॅरेज आहे रे ना तुमचं…’ असं म्हणत त्यांना त्यांच्या प्रेमाची आठवण करून (Marathi Movie) देतात. इथेच ट्रेलरमध्ये नायक-नायिकेच्या आयुष्याचा फ्लॅशबॅक सुरु होतो.
…नंतर टोकाचे पाऊल
टशन, एकमेकांना धडा शिकवण्याची भाषा, समज-गैरसमज आणि नंतर टोकाचे पाऊल म्हणजे घटस्फोटापर्यंत प्रकरण पोहोचते. नायिकेचा बेशिस्तपणा आणि नायकाचा निष्काळजीपणा न्यायालयात सिद्ध होतो का, दोघे एकमेकांपासून वेगळे होतात की एखादा हळवा क्षण त्यांना पुन्हा एकत्र आणतो आणि अशा बऱ्याच उत्सुकता वाढविणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ‘कढीपत्ता’ चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेत. शीर्षकाप्रमाणे कढीपत्त्याची तडकेबाज फोडणी असलेल्या कथानकाला ‘स्वप्नातूनी अजूनी अशा, तुझ्या पाऊलांच्या खुणा…’ या सुमधूर आणि अर्थपूर्ण गाण्याची साथ लाभली आहे. ‘अ बीटरस्वीट लव्हस्टोरी’ हे शीर्षकासोबत दिलेले सब-टायटल अगदी अचूक असल्याचे ‘कढीपत्ता’चा ट्रेलर पाहिल्यावर जाणवते.
अस्सल मसालेदार फोडणी
‘कढीपत्ता’च्या ट्रेलरबाबत दिग्दर्शक विश्वा म्हणाले की, दैनंदिन जीवनातील अस्सल मसालेदार फोडणी असलेले कथानक हे ‘कढीपत्ता’ चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. चित्रपटातील कथा जरी घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या जोडप्याची असली तरी थोड्याफार फरकाने प्रत्येक घरातील पती-पत्नीमध्ये घडणारे खुमासदार नाट्य चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याला सुमधूर गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. केवळ मनोरंजन करणे हा चित्रपटाचा उद्देश नसून, करमणुकीद्वारे काहीतरी सांगण्याचा हा प्रयत्न आहे. केवळ आजच्या पिढीलाच नव्हे, तर सर्व वयोगटातील प्रेक्षकांना काही सांगायचं आहे. ते सांगणं काय आहे ते जाणून घेण्यासाठी सिनेमागृहांमध्ये जाऊन ‘कढीपत्ता’ चित्रपट अवश्य पाहावा, असे आवाहनही दिग्दर्शक विश्वा यांनी केले आहे.
चित्रपटात कोणते कलाकार?
‘कढीपत्ता’मधील भूषण पाटील आणि रिद्धी कुमार या नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधणार आहे. त्यांच्यासोबत संजय मोने, शुभांगी गोखले, अक्षय टंकसाळे, गार्गी फुले, गौरी सुखटणकर, सानिका काशीकर, निशा माने आदी कलाकार आहेत. आनंद इंगळे, आनंदा कारेकर आणि चेतना भट पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमिया यांच्या हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबल अंतर्गत या चित्रपटातील गीते प्रस्तुत करण्यात आली आहेत. गीतकार मंदार चोळकर, मुकुंद भालेराव, वीनू सांगवान यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी संगीतसाज चढवला आहे. सिनेपोलीस वितरक असलेल्या या चित्रपटाचे छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केले आहे. तन्मय भिडे यांनी पार्श्वसंगीत दिले असून, ऋषीराज जोशी यांनी संकलन केले आहे. रंगभूषा किरण सावंत यांनी, तर वेशभूषा पल्लवी पाटील आणि गार्गी पाटील यांनी केली आहे. संयुक्ता सुभाष प्रोजेक्ट हेड, तर विशाल चव्हाण या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.