चाबहार बंदराजवळच अमेरिकेचे विध्वंस करणारे हवाई हल्ले ! भारतासाठी हे बंदर गेमचेंजर काय आहे ?
Chabahar-Chabahar-इराणच्या चाबहार मुक्त व्यापार क्षेत्राजवळील डोंगरातील लष्करी सुविधांवर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी हल्ले केल्याचे वृत्त
US-Israel-Iran War: इस्रायल-अमेरिका व इराण युद्ध थांबण्याचे (US-Israel-Iran War) नाव घेत नाही. युद्धाने तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. इराणच्या अनेक भागावर अमेरिका व इस्रायलने हवाई हल्ले केले आहे. आता इराणच्या चाबहार मुक्त व्यापार (Chabahar Free Trade Zone) क्षेत्राजवळील डोंगरातील लष्करी सुविधांवर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी हल्ले केल्याचे वृत्त आहे. अल जझीराने व्हॉइस ऑफ अमेरिकाच्या पर्शियन भाषेतील सेवेने हे वृत्त दिले आहे.
चाबहार मुक्त व्यापार क्षेत्र इराणच्या आग्नेय सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. येथे व्यावसायिक सुविधा आणि महत्त्वपूर्ण लष्करी पायाभूत सुविधा आहे. चाबहारच्या सभोवतालच्या लष्करी सुविधांवर हल्ले करण्यात आले आहे. भारताने निधी दिलेल्या शाहिद बेहेश्ती मालवाहतूक टर्मिनलला कोणताही फटका बसलेला नाही.
भारत दोन बंदरे चालविते
भारत या प्रदेशात दोन बंदरे चालवते. इराणमधील चाबहार बंदर हे इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (IPGL) संचलित केले जाते. तर इस्रायलमधील हैफा बंदर, जे अदानी समूहाद्वारे चालविले जाते.
अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षाचा तिसरा आठवडा
28 फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील अनेक शहरांवर अचानक हवाई हल्ले केले आहेत. ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि इतर अनेक इराणी अधिकारी ठार झाले आहेत. इराणने इस्रायल, अमेरिकेचे तळ आणि या प्रदेशातील अमेरिकेशी संबंधित देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करून प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिका-इस्रायली सैन्याने युद्ध सुरू केल्यापासून प्रचंड बॉम्बहल्ले केले आहेत.
कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या
इराणच्या हल्ल्यांमुळे आणि धमक्यांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कंटेनर वाहतूक जवळजवळ थांबली आहे. ज्यामुळे पेट्रोलियमच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसू लागला आहे. आता क्रूड ऑइल थेट 104 डॉलरवर गेले आहे.
भारतासाठी चाबहार बंदर कसे महत्त्वाचे आहे?
भारतासाठी चाबहार हे बंदर व्यापारीदृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. पाकिस्तान-नियंत्रित भूमार्गाचा भारताला वापर करावा लागत होता. पाकिस्तान भारताचे शत्रू राष्ट्र असल्याने खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर पर्याय म्हणून इराणमध्ये भारताने चाबहार बंदर उभारले आहे.
चाबहार हे भारतासाठी अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई, युरोप प्रवेश करण्यासाठी एक धोरणात्मक प्रवेशद्वार म्हणून काम करते. जे पाकिस्तानमधून जाणाऱ्या पारंपारिक मार्गांच्या तुलनेत पर्यायी आणि अधिक थेट व्यापार मार्ग आहे.
अफगाणिस्तानलाही त्याच्या आयात आणि निर्यातीच्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या कराची बंदरावर अवलंबून राहावे लागत होते. आता चाबहाराचा वापर अफगाणिस्तानही करत आहे. त्यामुळे त्यांचे पाकिस्तानवरील अवलंबित्व कमी करते.
भारताची 370 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
बंदर क्षेत्र व्यापारी भागीदारांना 20 वर्षांसाठी कर सवलती, चलन विनिमय स्वातंत्र्य आणि परदेशी गुंतवणुकीच्या संधी देते.
भारताने इराणसोबत 10 वर्षांचा करार केला आहे. सरकारी मालकीची कंपनी इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (IPGL) ने चाबहारमध्ये 370 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा करार केलेला आहे. भारताला आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी परदेशी गुंतवणूक आणि स्थिर व्यापार मार्गांची आवश्यकता आहे. म्हणूनच, चाबहार भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे.चाबहार बंदर भारताच्या भू-राजकीय आणि आर्थिक धोरणाचा आधारस्तंभ म्हणून काम करत आहे.
