भाजपने दुकाने जबरदस्तीने बंद केली’; रामलीला मैदानातील महामोर्चाआधी राहुल गांधींचा आरोप

India Alliance Rally : मतदार यादीच्या मुद्द्यावर विरोधकांनी दिल्लीत मोर्चा काढला आहे. दरम्यान, राहुल गांधींनी भाजपवर गंभीर आरोप केलाय.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 01T155305.439

India Alliance Rally : दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महामोर्चाचे आयोजन केले आहे. मतदार यादीतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेविरोधात विरोधकांनी या रॅलीच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक मैदानावर दाखल झाले असून, 23 पक्षांचे नेते सहभागी होत आहेत. या रॅलीला 10 लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.

रॅलीकडे जात असताना राहुल गांधी यांनी भाजपवर दुकाने बंद करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला. रॅलीला येणाऱ्या नागरिकांनी स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करावी, जेणेकरून त्यांच्या व्यवसायाला फायदा होईल, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, कनॉट प्लेस परिसरातून जाताना भाजपने दुकाने जबरदस्तीने बंद करायला लावल्याचे समजल्याचे राहुल गांधी म्हणाले. भाजपच्या या कृतीमुळे दुकानदारांचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे रॅलीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.

तुमची सत्ता सत्त्याच्या बळावर उलथवून टाकू, रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजप अन् RSS वर घाव

महामोर्चापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील अनेक वरिष्ठ नेते एकत्र आले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, केरळचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि प्रियंका गांधी यांच्यासह विविध नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. येथून सर्व नेते एकत्रितपणे रामलीला मैदानाकडे रवाना झाले. उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीतील 23 पक्षांचे प्रतिनिधी या शक्तिप्रदर्शनात सहभागी होत आहेत.

रॅलीत निवडणूक आयोगाच्या कामकाजासह मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राहुल गांधी यांनी विद्यार्थी, नागरिक संघटना आणि विविध सामाजिक गटांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे रामलीला मैदान आणि परिसरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून वाहतुकीसंदर्भातही विशेष सूचना जारी केल्या आहेत. रविवारी सकाळपासूनच विविध राज्यांतून कार्यकर्ते दिल्लीमध्ये दाखल होत आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर डाव्या पक्षांचे समर्थक झेंडे आणि बॅनर घेऊन जमले होते.

follow us