तुमची सत्ता सत्त्याच्या बळावर उलथवून टाकू, रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजप अन् RSS’वर घाव
हा देश सत्याचा आहे. देशातील जनतेला सत्य समजते आणि त्यासाठी लढते. पण संघासाठी सत्य नव्हे, सत्ता महत्त्वाची आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर आज ‘मत चोरी’च्या मुद्द्यावर (Delhi) आयोजित महारॅलीत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. देशात सध्या सत्य आणि सत्ता यांच्यात संघर्ष सुरू असल्याचा आरोप करत, सत्याच्या ताकदीवर मोदी-शाह आणि RSS ला सत्तेवरून खाली खेचू, असा दावा राहुल गांधींनी केला.
जगातील प्रत्येक धर्माची शिकवण सांगते की, सत्य सर्वात महत्त्वाचे आहे. गांधीजींनीही सत्यालाच सर्वोच्च स्थान दिलं. पण RSS ची विचारधारा वेगळी आहे. त्यांच्यासाठी सत्य नाही, सत्ता महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी अंडमान-निकोबारमध्ये RSS प्रमुख मोहन भागवत यांनी दिलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला.
अंदमान-निकोबारमध्ये मोहन भागवत म्हणाले की, जग सत्य पाहत नाही, शक्ती पाहते, ज्याच्याकडे शक्ती आहे, त्यालाच मान दिला जातो. हीच RSS ची विचारधारा आहे. त्यांच्या मते सत्याला काहीच किंमत नाही, फक्त सत्ता महत्त्वाची आहे. भारताची संस्कृती आणि सर्व धर्मांची मुळे सत्यावर आधारित आहेत. “सत्यम् शिवम् सुंदरम्” हीच आपल्या देशाची ओळख आहे, असं राहुल म्हणाले.
देशाच्या स्यायत्त संस्थांनावर पूर्ण कब्जा, लोकसभेत राहुल गांधींचा भाजप आरएसएसवर वार
हा देश सत्याचा आहे. देशातील जनतेला सत्य समजते आणि त्यासाठी लढते. पण संघासाठी सत्य नव्हे, सत्ता महत्त्वाची आहे. तरीही मी खात्रीने सांगतो की, सत्याच्या बाजूने उभे राहून आम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह आणि RSS ची सत्ता उलथवून टाकू. गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत ते म्हणाले, सभागृहात माझ्या प्रश्नांवर अमित शाह यांचे हात थरथरत होते. सत्तेत असतानाच ते धाडसी असतात; सत्ता गेली की त्यांची धाडसही संपेल.
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे. माझ्या प्रश्नांना आयोगाने उत्तर दिले नाही. आयोग असत्याच्या बाजूने उभा आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कायदा बदलला आणि निवडणूक आयुक्त काहीही करतील, तरी त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही, अशी तरतूद करण्यात आली. आम्ही सत्तेत आल्यावर हा कायदा बदलू आणि तुमच्यावर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनीही भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, संसदेत राष्ट्रगीतावर चर्चा होते, पण बेरोजगारी, महागाई, पेपर लीक यावर बोलण्याची हिंमत नाही. मी भाजपला आव्हान देते की, एकदा बॅलेट पेपरवर निष्पक्ष निवडणूक लढवून दाखवा; तुम्ही जिंकू शकणार नाही, हे भाजपलाही माहीत आहे. इतिहासात प्रथमच संपूर्ण विरोधक एकत्र येऊन निवडणूक आयोगावर विश्वास उरलेला नसल्याचे सांगत आहेत. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा संशयास्पद बनवण्यात आला आहे. आज देशातील प्रत्येक संस्था मोदी सरकारसमोर झुकवली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
