क्रूरतेचा कळस ! कीर्तनकाराचा मुलीला चटके देत अमानुष अत्याचार; गुंजाळला बेड्या ढोकल्या

Ahilyanagar-Ahilyanagar- यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय.

  • Written By: Published:
Ahilyanagar Crime

Ahilyanagar Crime: वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आलीय. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) (Yashwant Eknath Thorat alias Annasaheb Gunjal) याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय. गुंजाळ हा गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करत होता. पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटलंय.

पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021 पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

​पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन, अशी भीती तो घालत होता. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने हा छळ मुकाट्याने सहन केला.

घरी बोलवून लोखंडी पक्कड गरम करून चटके दिले

काही दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता, त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता, आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

​मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते. 14 मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने आपल्यावर झालेला पाच वर्षांचा अन्याय कथन केला. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.


आरोपीला पारनेर पोलिसांकडून अटक

पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून, आरोपी यशवंत महाराज थोरात यांना पारनेर पोलिसांनी अटक केली आहे या अशा ‘भोंदू’ महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास पारनेर येथील पोलीस अधिकारी करत आहेत.


बलात्कारी भोंदू महाराजाला तात्काळ अटक; 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

यशवंत महाराज थोरात याला रविवार दिनांक 15 मार्च रोजी पहाटे चार वाजता ढवळपुरी येथून राहत्या घरातून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत मारग हे करत आहेत.

follow us