Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: ‘कलर्स मराठी’ (Colors Marathi) वरील ‘बिग बॉस मराठी’च्या सर्वात (Bigg Boss Marathi Season 5 ) जास्त गाजलेल्या या सीझनचा भव्यदिव्य बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले (Grand Finale) येत्या 6 ऑक्टोबरला दिमाखात पार पडणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनप्रमाणेच रितेश भाऊंनाही (Ritesh Deshmukh) महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. पाहता पाहता हा महाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो ठरला.
रितेश भाऊंची लयभारी स्टाईल, तरुणांमध्ये त्यांची असलेली क्रेझ , त्यांची धमालमस्ती, कल्ला आणि सदस्यांमध्ये त्यांचा असलेला आदरयुक्त दरारा या सर्वच गोष्टींमुळे हा सीझन गाजला. रितेश यांच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने टीआरपीचे उच्चांक गाठले. प्रत्येक वीकेंडला सदस्यांची शाळा घेण्यासोबत त्यांची पाठ थोपटण्याचं कामदेखील रितेश भाऊंनी त्यांच्या स्टाईलने केलं. लाडक्या भाऊंनी ‘बिग बॉस’प्रेमींवर आपली छाप पाडली. आपल्या स्टाईलने त्यांनी ‘बिग बॉस मराठी’ला एक वेगळंच ग्लॅमर आणलं. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजी-आजोबांपर्यंत सर्वांनाच या सीझनने अक्षरशः वेड लावलं.
‘बिग बॉस मराठी’ दररोज न चुकता पाहणं हा महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या दिनचर्येचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आज घरात काय घडणार? कोण कसा खेळ खेळतोय? कोण काय रणनीती आखतोय? कोणाचा प्रवास कधी संपणार? अशा अनेक चर्चा नेटकरी करताना दिसून येत आहेत. प्रेक्षकांच्या या कार्यक्रमाला आणि रितेश भाऊंच्या होस्टिंगला मिळत असलेल्या उत्स्फू्र्त प्रतिसादामुळे टीआरपीतही या कार्यक्रमाने घवघवीत यश मिळवले. पण टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करणारा हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ग्रँड फिनालेला सर्व सदस्य आता परस्परांमधली भांडणे विसरून बहारदार गाण्यांवर एकापेक्षा एक परफॉर्मन्स देणार आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाले की ,”बिग बॉस मराठी’चा हा सीझन अनेक सरप्राईजेस आणि ट्विस्टने भरलेला होता. प्रत्येक आठवड्यातील भाऊच्या धक्क्याने टीआरपीचे उच्चांक गाठले. छोट्या पडद्यावरचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गाजला. गेले दोन आठवडे व्यस्त चित्रिकरणामुळे मला भाऊच्या धक्क्यावर येता आलं नाही. तुम्ही सर्वांनी माझी आठवण काढलीत, याचा मला अंदाज आहे. पण आता ग्रँड फिनालेला मी या दोन आठवड्याची कसर भरून प्रेक्षकांना मनोरंजनाची तुफान मेजवानी देणार आहे. खूप सरप्रायजेसनी , उत्सुकतेने भरलेला हा ग्रँड फिनाले असेल”.
‘बिग बॉस मराठी’बद्दल प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) – केदार शिंदे म्हणाले,”बिग बॉस मराठी’च्या या पर्वाला संपूर्ण महाराष्ट्राचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचा लाडका सुपुत्र आणि बॅालीवूडचे सुपरस्टार रितेश भाऊंनी या सिझनला चार चॅांद लावले. या पर्वातील सदस्यांनी, त्यांच्या भिन्न स्वभावाने या कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली. हा सीझन उत्तरोत्तर रंगत गेला. या कार्यक्रमातील सर्व सदस्यांची आज घराघरांत चर्चा आहे. आता आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राची नजर दिमाखदार ग्रँड फिनालेवर खिळली आहे. आणि गेले दोन आठवडे परदेशातील चित्रीकरणामुळे रितेश भाऊ ‘भाऊच्या धक्क्या’ वर येऊ शकले नव्हते. त्यामुळे ग्रॅंड फिनालेला भाऊंच्या उपस्थितीत होणाऱ्या या फिनालेसाठी घरातील सदस्य आणि अवघा महाराष्ट्र आतूर आहे.”
Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घराला मिळणार TOP 5 सदस्य!
6 ऑक्टोबरला रविवारी, संध्याकाळी 6 वाजता, ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडणार आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 6 ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि ‘बिग बॉस मराठी’च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ची सांगता होताच ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या सीझनचा धमाका सुरू होणार आहे.