Raj Kundra Shilpa Shetty FIR : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा (Raj Kundra) अडचणीत आले आहेत. यावेळी त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप झाला आहे. मुंबईतील एका उद्योजकाने या दोघांवर तब्बल 60.4 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे. बंद पडलेल्या एका खासगी कंपनीशी संबंधित हे प्रकरण आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि एक अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार देणारे दीपक कोठारी मुंबईतील व्यावसायिक असून लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आधी ही तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दाखल केली होती. परंतु, दहा कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याने ईओडब्ल्यूकडे प्रकरण सोपवण्यात आले.
दीपक कोठारी जुहू येथील रहिवासी आहेत. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक आहेत. एका व्यक्तीने त्यांची शिल्पा आणि राज यांच्याशी भेट घडवून आणली होती. त्यावेळी शिल्पा आणि राज दोघेही बेस्ट डील टिव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक होते. होम शॉपिंग आणि ऑनलाइन रिटेल क्षेत्रात कार्यरत होती. या कंपनीत दोघांची 87.6 टक्के इतकी हिस्सेदारी होती.
कोठारी यांचं म्हणणं आहे की शिल्पा आणि राजने त्यांच्याकडे 75 कोटींच्या कर्जाची मागणी केली होती. या कर्जावर 12 टक्के दराने व्याज देऊ असे त्यांनी सांगितले होते. नंतर त्यांनी कर्जाचे पैसे गुंतवणुकीच्या रुपात घेण्याचा सल्ला दिला जेणकरून जास्त टॅक्स द्यावा लागणार नाही. यासोबतच प्रत्येक महिन्याला नफा आणि मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते.
कोठारी यांनी एप्रिल 2015 मध्ये 31.9 कोटी आणि सप्टेंबर 2015 मध्ये 28.53 कोटी रुपये कंपनीला ट्रान्सफर केले होते. ही रक्कम शेअर सब्स्क्रिप्शन आणि सप्लीमेंटरी अॅग्रीमेंटअंतर्गत देण्यात आली होती. एप्रिल 2016 मध्ये शिल्पा शेट्टीने वैयक्तिक हमी दिली होती परंतु, सप्टेंबर 2016 मध्ये तिने कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला.
यानंतर 2017 मध्ये कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे कोठारी यांना समजले. एका कराराच्या अटींचे पालन कंपनीने केले नाही त्यामुळे कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे सांगण्यात आले. माझ्या पैशांचा गैरवापर करण्यात आला त्या दोघांनी वैयक्तिक खर्चासाठी पैशांचा वापर केला असा आरोप कोठारी यांनी केला. आता आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा बारकाईने तपास केला जात आहे. सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची मुंबई उच्च न्यायालयात धाव; काय आहे प्रकरण?