Brad Pitt : हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट (Movies) आणि दिग्दर्शक डेव्हिड अयेर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यांच्या आगामी सर्व्हायव्हल थ्रिलर ‘Heart of the Beast’मध्ये पिटनं स्पेशल फोर्सेस अधिकारी जेम्स बेलमाँटची भूमिका साकारली आहे. विमान दुर्घटनेनंतर अलास्काच्या निर्जन आणि प्रतिकूल वातावरणात अडकलेल्या जेम्सला त्याचा लढाऊ कुत्रा ओडिनसोबत जीव वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हा चित्रपट 25 सप्टेंबर 2026 रोजी भारतातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
डेव्हिड अयेर आणि ब्रॅड पिट यांची याआधी ‘Fury’ या चित्रपटासाठी जोडी जमली होती. ‘Heart of the Beast’ची पटकथा समोर आल्यानंतर जेम्स बेलमाँटच्या भूमिकेसाठी पिटशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार केला नसल्याचं अयेर यांनी सांगितलं. संवादांपेक्षा शारीरिक अभिनयाला अधिक महत्त्व असलेल्या या भूमिकेसाठी पिट योग्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अतिशय थंड आणि कठीण वातावरण होतं. मात्र, पिटनं स्वतःच्या आरामाचा विचार न करता व्यक्तिरेखेत पूर्णपणे शिरण्यासाठी मेहनत घेतली, असं अयेर यांनी सांगितलं. या चित्रपटात अभिनेत्याला व्यक्तिरेखेपासून लपण्याची संधी नसल्याने पिटसारखा शारीरिक अभिनयातून कथा प्रभावीपणे मांडणारा अभिनेता आवश्यक होता. पिटची ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीपैकी एक असल्याचं अयेर यांनी म्हटलं आहे.
‘Heart of the Beast’ हा अयेर यांचा प्राण्यांसोबत मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा पहिलाच अनुभव आहे. सुरुवातीला कुत्र्यांसोबतच्या चित्रीकरणाबाबत ते काहीसे चिंतेत होते. मात्र, पिटनं परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याचं त्यांनी सांगितलं. चित्रीकरण संपेपर्यंत प्राण्यांसोबत काम करण्याचा आत्मविश्वास वाढला असून, या चित्रपटातील कुत्र्याचा अभिनय आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक असल्याचं ऐकायला मिळाल्याचंही अयेर यांनी नमूद केलं.
डेव्हिड अयेर यांनी 2005 मध्ये दिग्दर्शनाला सुरुवात केली. ‘End of Watch’, ‘Fury’ आणि ‘The Beekeeper’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी व्यक्तिरेखांवर आधारित थ्रिलर आणि क्राईम ड्रामा सादर केले आहेत. त्यांनी ‘U-571’ आणि ‘Training Day’ यांसारख्या ऑस्कर नामांकन मिळालेल्या चित्रपटांच्या पटकथांवरही काम केलं आहे. ‘Heart of the Beast’मधून पुन्हा एकदा पिटसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचं अयेर यांनी सांगितलं.
‘Heart of the Beast’मध्ये ब्रॅड पिटसोबत जे.के. सिमन्स आणि अॅना लॅम्बे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कॅमेरॉन अलेक्झांडर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून, ऑलिव्हिया हॅमिल्टन, मार्टी बोवेन, डेव्हिड अयेर आणि ब्रॅड पिट यांनी निर्मिती केली आहे. Paramount Pictures, Domain Entertainment आणि Gulfstream Pictures यांच्या सहकार्याने तयार झालेला हा सर्व्हायव्हल अॅडव्हेंचर थ्रिलर 25 सप्टेंबर 2026 रोजी भारतात केवळ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
