Diptii Ketkar On mother day : सन मराठी वाहिनीवरील ‘मी संसार माझा रेखिते’( Mee Sansar Majha Rekhite) या मालिकेतील अनुप्रिया म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर (Dipti Ketkar) मातृदिनानिमित्त तिच्या आईबद्दलच्या आठवणी सांगितल्या. दीप्ती केतकर म्हणाले, मी मनोरंजन क्षेत्रात आले ते आईमुळेच. लहानपणापासून मी छोटी छोटी कामं करत होते आणि प्रत्येक शूटिंगवेळी माझी आई माझ्यासोबत असायची. त्या काळात ती आई म्हणून तिची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत होती. स्वभावाने थोडी कठोर, पण तितकीच काळजी घेणारी आणि माझ्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारी होती.
लग्नानंतर मात्र आमचं नातं आणखी खास झालं. ती फक्त आई न राहता माझी अतिशय जवळची मैत्रीण बनली. तिच्याकडून माझ्यात जिद्द आणि चिकाटी हे गुण आले आहेत. माझ्या आईला स्वतःच्या हाताने स्वादिष्ट पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालायला खूप आवडतं आणि अगदी तोच गुण माझ्यातही आला आहे, असे दीप्ती केतकर म्हणाली.
माझ्या प्रत्येक भूमिकेला आईचा कायम पाठिंबा मिळाला आहे. आजही ‘मी संसार माझा रेखिते’ ही मालिका पाहताना ती माझ्या छोट्या छोट्या चुका आवर्जून सांगते आणि प्रत्येक वेळी त्या चुका सुधारून तिला माझं अधिक उत्तम काम दाखवण्याचा मी प्रयत्न करते. असा आमचा खूप क्युट बॉण्ड आहे.
मला आईसोबत एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जायचं आहे. विशेषतः हिमाचलसारख्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची माझी खूप इच्छा आहे आणि लवकरच आमची ‘माय-लेकींची ट्रिप’ नक्कीच सक्सेसफुल होईल, असे दीप्ती केतकर म्हणाली.
