Download App

Subhedar Review: गनिमा कावा करणाऱ्यांकडून आत्मविश्वास शिकवणारा ‘सुभेदार’

या सिनेमाला 4 स्टार….
सिनेमाचं नाव – ‘सुभेदार’
प्रदर्शनाची तारीख – 25-08-2023
सिनेमाचे दिग्दर्शक – दिग्पाल लांजेकर
सिनेमाचे स्टार – 4

Subhedar Review: शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असा ‘सुभेदार तानाजीराव मालुसरे’ यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा (Subhedar) ‘सुभेदार… गड आला पण सिंह गेला …’ हा सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्राभर प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर (Director Digpal Lanjekar) यांनी परत एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे सांभाळले आहे. (Subhedar Marathi Movie) सध्या सर्वत्र या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, (Subhedar Review) प्रेक्षकही या सिनेमाला प्रचंड उत्साहात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत ‘सुभेदार…’गड आला पण सिंह गेला…’ पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ‘सुभेदार’ हा सिनेमा ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तान्हाजीराव मालुसरे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाशझोत टाकणारा आहे.


या सिनेमाचा विषय फक्त किल्ले कोंढाण्यापुरताचं नव्हे तर, सुभेदार मालुसरेंच्या भावनिक रूपाचं साक्षात दर्शन घडविणारा आहे. सुभेदारांचे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आऊसाहेब, पत्नी, मुलगा, भाऊ, मामा यांच्याशी असलेलं नातं अधोरेखित करणारा आहे. या संदर्भात अत्यंत भावनिक करणारे प्रसंग या सिनेमात एकदम प्रभावीपणे मांडण्यात यश आले आहे. मोघल काळातील सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारे अनेक प्रसंग ‘सुभेदार’मध्ये बघायला मिळाले आहेत. जसे लहानपणी आपण इतिहास जसा वाचला आहे, तसेच या सिनेमात इतिहास रेखाटले आहे, जना गराडीणचा प्रसंग… अलका कुबल यांनी ती भूमिका अत्यंत सुरेखरीत्या साकारली आहे. एका भाबड्या स्त्रीच्या बोलण्यातून छत्रपती शिवाजी महाराज कसे त्यांच्या गड-किल्ल्यांबद्दलची महत्त्वाची भूमिका घेतात हे दाखवण्यात आलं आहे. छत्रपती महाराज आग्य्राहून परतल्यावर आऊसाहेब आणि त्यांची अत्यंत भावनिक व हृद्य भेट दर्शवणारा प्रसंग अक्षरशः डोळ्यांच्या कडा ओलावणारा आहे.

सिंहगडाची प्रत्यक्ष भौगोलिक माहिती आणि सिंहगड का जिंकायला हवा याची अनेक कारणं या सिनेमात सविस्तरपणे मांडण्यात आल्या आहेत. या सिनेमाची माहिती संपूर्णपणे ऐतिहासिक आणि भौगोलिक तथ्यांवर आधारलेली असल्याचे बघायला मिळाले आहे. यामुळे हा सिनेमा शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान असलेल्या एका महत्त्वपूर्ण अध्यायाची अधिकृत माहिती देत आहे. आजपर्यंत प्रदर्शित करण्यात आलेल्या शिवराज अष्टकातील चारही सिनेमांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

इतिहासाची मोडतोड न करता दिग्पाल लांजेकर यांनी ‘सुभेदार’ रेखाटले आहेत. ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे केलेले अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शन रसिकांना शिवकाळात नेणारे आहे.तसेच अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची शीर्षक भूमिका सशक्तपणे साकारली आहे. आऊसाहेबांच्या भूमिकेतील मृणाल कुलकर्णी यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील चिन्मय मांडलेकर यांनी आणि तान्हाजीरावांच्या व्यक्तिरेखेतील अजय पूरकर यांनी आपापल्या व्यक्तिरेखेच्या वयातील अनेक टप्पे उत्तमरीत्या मांडण्यात यश मिळाले आहे. या सर्वच कलाकारांच्या कसदार अभिनयाची छाप या सिनेमावर उमटल्याचे बघायला मिळतं.

उदयभान राठोडच्या भूमिकेमध्ये दिग्विजय रोहिदास हा नवीन कलाकार लक्ष वेधून घेत आहे. दिग्विजय जरी नवोदित असला तरी उदयभानच्या व्यक्तिरेखेत कोणतेही नवखेपणा जाणवला नाही, अशा पद्धतीने ही व्यक्तिरेखा साकारण्यात आली. उदयभान या व्यक्तिरेखेचा देखील विविध बाजू या सिनेमात आहे. हे सर्व काही असले तरी प्रियांका मयेकरचं छायाचित्रण हे उत्तम केले आहे. याअगोदर शिवराज अष्टकमधील प्रदर्शित झालेल्या ४ सिनेमाच्या तोलामोलाची किंवा त्याहीहून उत्तम सिनेमॅटोग्राफी यामध्ये दिसत आहे. या सिनेमातील सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

69th National Film Awards : सलील कुलकर्णींचा ‘एकदा काय झालं’ सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट

प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत ही या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू आहे. शेवटच्या युद्धाचं डिझाईन एकदम हटके झालेलं असून, अंगावर शहारे आणणारा आहे. सिंहगडावर तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे प्राणपणाने लढत असताना ते कधी विजयी होतात याची छत्रपती शिवराय राजगडावर आतुरतेनं वाट बघत असलेल्या प्रसंगाची भावनिक किनार देखील यामध्ये बघायला मिळाले. राजांच्या बाहुंमध्ये सुभेदार प्राण सोडतात तो रोमांचक क्षण अगदी मन हेलावून टाकणारा आहे. तसेच अन्य तांत्रिक बाजूही लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. एकूणच सुभेदार तानाजीराव मालुसरे या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण धांडोळा घेणारा हा सिनेमा आहे. यामध्ये तान्हाजीरावांच्या प्रशासकीय आणि कुटुंबवत्सल रुपासोबत त्यांच्यातील योद्धाही मनात खोलवर खोलवर रुतून बसणार आहे आणि कायमचा स्मरणात राहणारा ठरणार आहे.

Tags

follow us