Divas Tujhe He Phulayche : मराठी संगीतप्रेमींना नेहमीच जुन्या, अजरामर गीतांची भुरळ पडलेली असते. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, मात्र काही गाणी मात्र आपल्या भावनांशी कायमची नाळ जोडून ठेवतात. अशाच अजरामर गीतांना आजच्या काळात, आधुनिक मांडणीत तरीही मूळ आत्मा जपून, नव्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा एक वेगळाच प्रयोग ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. या चित्रपटात चार गाजलेली, जुन्या काळातील लोकप्रिय गाणी नव्या रूपात पाहायला मिळणार असून, त्यातील पहिले गाणे ‘दिवस तुझे हे फुलायचे’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कोणत्याही गाण्याच्या मूळ सौंदर्याला किंवा भावनेला धक्का न लावता, त्याच भावनेचा सन्मान राखत हे गाणं पडद्यावर आले आहे. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी हा अनुभव खास आणि वेगळा ठरणार आहे.
‘दिवस तुझे हे फुलायचे’ या गाण्याचे मूळ संगीत हे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे आहे. हे गाणे आधीच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेले एक अजरामर गीत असून, त्याच्या मूळ सौंदर्याला आणि भावनांना कुठेही धक्का न लावता, आजच्या काळात आणि चित्रपटाच्या कथानकानुसार अतिशय संवेदनशीलतेने सादर करण्यात आले आहे. या गाण्याला बॅालिवूडचे सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांचा परिपक्व आवाज लाभला असून या गाण्याच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर कुणाल गांजावाला यांनी मराठीत पुनरागमन केलं असून त्यांचा आवाज या गीताला वेगळीच भावनिक छटा देतो. सूरज धीरज यांच्या संगीतामुळे हे गाणं अधिकच भावपूर्ण झालं असून गीताचे शब्द मंगेश पाडगावकर यांचे आहेत.
आई होण्याच्या प्रवासातील आनंद, उत्सुकता आणि हळवे भाव या गाण्यात अतिशय सुंदरपणे मांडण्यात आले आहेत. सुनेच्या गरोदरपणात तिची काळजी घेणे, लाड करणे आणि तिच्यासाठी खास गोष्टी करणे या प्रसंगांतून सासू-सुनेचे नाते अधिक प्रेमळ आणि हळवे झालेले पाहायला मिळते. या आनंदाच्या बातमीमुळे कुटुंबात निर्माण होणारे गोड क्षण, हसू-आनंद आणि भावनांची गुंफण या गाण्यात प्रभावीपणे दिसून येते.
यात सासू-सुनेच्या नात्यातील आपुलकी, आधार आणि निखळ प्रेमाचे क्षण पाहायला मिळतात, जे प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी सहज जोडून घेतात. भावनांनी नटलेली दृश्यं, हळवे शब्द आणि सुरेल संगीत यामुळे हे गाणे चित्रपटातील एक महत्त्वाचा भावनिक टप्पा ठरते.
दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, ‘’मराठी सिनेसृष्टीत आपल्याकडे अफाट सुंदर, अजरामर गाण्यांचा ठेवा आहे. ही गाणी फक्त ऐकण्यापुरती मर्यादित न ठेवता, ती आजच्या प्रेक्षकांपर्यंत नव्या पद्धतीने पोहोचवावी, ही कल्पना मनात होती. जुन्या गाण्यांचा आत्मा, त्यांची भावना आणि ओळख जपणं आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यामुळे कोणताही बदल करताना ‘नवं’ करण्याच्या नादात ‘मूळ’ हरवू नये, याची आम्ही खास काळजी घेतली आहे. या गाण्याबद्दल बोलायचे तर सासू-सुनेच्या नात्यातील प्रेम, काळजी आणि आई होण्याच्या प्रवासातील हळवे क्षण दाखवण्यासाठी यापेक्षा सुंदर गाणं असूच शकत नव्हतं. म्हणूनच या प्रसंगासाठी हेच गाणं निवडलं.’’
तुमची राजकीय अपत्य वाढवा; फोडाफोडीच्या राजकारणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे व उमेश कुमार बन्सल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
