मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत आपलं सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री माधुरी दीक्षितने गेली अनेक वर्षा प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे . तिची अदा, नृत्य, निखळ हास्य, सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. मात्र तिच्या एका चाहत्याने माधुरीसाठी थेट नेटफ्लिक्सलाच नोटीस पाठवली आहे.माधुरीचा हा चाहता आहे. लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथून विजय कुमार.
ज्यांना माधुरीचा अपमान सहन न झाल्याने त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तर हे सगळं प्रकरण सुरु झालं नेटफ्लिक्स वरील बिग बँग थिअरी या सिरीजमुळे. नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या बिग बँग थिअरी या सिरीजमध्ये माधुरी दीक्षितचा अपमान करण्यात आलाय आणि यावर मिथून यांनी आक्षेप घेतलाय. बिग बँग थिअरीच्या दुसऱ्या सिझनमध्ये शेल्डन कूपरची भूमिका साकारणाऱ्या जिम पार्सन्सने ऐश्वर्या राय बच्चनची तुलना माधुरीशी केलीय.
ऐश्वर्या ही गरिबांची माधुरी असल्याचं यात म्हटलं गेलय. याशिवाय राज कूथरापल्लीची भूमिका साकारणाऱ्या कुणाल नय्यरने ऐश्वर्या रायला देवी तर माधुरी दीक्षितसाठी आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. म्हणूनच मिथून यांनी माधुरीचा अपमान झाल्याचं म्हणत नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात मिथुनने सोशल मिडीयावर ट्विट देखील केलंय.
त्यात लिहीलय की, ‘काही दिवसांपूर्वी मी नेटफ्लिक्सवर बिग बँग थिअरी या शोचा एक भाग पाहिला. यामधला एक अभिनेता दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित बाबत बोलताना आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरतो. मी लहानपणापासूनच माधुरी दीक्षित यांचा फॅन आहे. त्यामुळे बिग बँग थिअरीमधली ती कमेंट ऐकून मला वाईट वाटलं. भारतीय संस्कृती आणि स्त्रिया यांचा अपमान झाल्याची भावना माझ्या मनात आली.
Taapsee Pannu विरोधात तक्रार दाखल; सनातन धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप
त्यामुळेच मी माझ्या वकिलामार्फत नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यास सांगितलं. तसंच मी नेटफ्लिक्सला हा भाग काढून टाकण्याचीही विनंती केली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जाईल अशी अपेक्षा आहे.’ याबाबत माधुरी दीक्षित नेने कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तेव्हा कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर नेटफ्लिक्स याची दखल घेईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल.