Fans shower praise on Abhijeet Sawant : इंडियन आयडॉलचा पहिला विजेता आणि लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजित सावंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या गाण्यामुळे नव्हे, तर पत्नीवरील प्रेमामुळे. अभिजीतने पत्नी शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त तिला आयुष्यभर लक्षत राहील असं खास सरप्राईज दिलं आहे. अभिजित आणि शिल्पा यांचं नातं अनेक वर्षांपासून चाहत्यांसाठी प्रेरणादायी मानलं जातं. अभिजीतच्या संघर्षापासून यशापर्यंतच्या प्रत्येक टप्पयावर शिल्पा त्याच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली. या साथीसाठी कृतज्ञता व्यक्त करत अभिजीतने पत्नीला वाढदिवशी नवीन फ्लॅट भेट दिला आहे.
या आनंदाच्या क्षणाचे काही खास फोटो शिल्पाने तिच्या सामाजिक माध्यमावरील स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिजित, शिल्पा आणि त्यांच्या दोन्ही मुली नव्या घराच्या चाव्या हातात घेऊन आनंद साजरा करताना दिसत आहेत. संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतो. वाढदिवसाच्या दिवशी नवऱ्याकडून मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे शिल्पाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या फोटोंनंतर चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी या दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी अभिजीतच्या या कृतीच कौतुक करत त्याला परफेक्ट हजबंड अशी देखील उपाधी दिली आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपी चेतनच्या वर्गमित्राला पोलिसांनी घेतलं ताब्यात
अभिजीत आणि शिल्पा यांची प्रेमकहाणी नेहमीच चर्चेत राहिली आहे. प्रसिद्धी, यश आणि व्यस्त जीवनशैली असूनही दोघांनी आपल्या नात्यातील विश्वास आणि जिव्हाळा कायम जपला आहे. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण चाहत्यांसाठीही विशेष ठरत आहे. दरम्यान, अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या विविध संगीत प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे. नुकतंच त्याचं आणि गौतमी पाटीलचं ‘रुपेरी वाळूत’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील त्याच्या आवाजातील ‘जादू केलीस तू’ हे गाणंही रसिकांच्या पसंतीस उतरलं आहे.
याशिवाय सध्या सुरू असलेल्या ‘इंडियन आयडॉल रियुनियन’ कार्यक्रमामुळेही अभिजीत पुन्हा चर्चेत आहे. या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देताना आणि आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करताना तो दिसणार आहे. अनेक वर्षांनंतरही अभिजीतच्या आवाजाची जादू कायम असून त्याचं चाहतावर्गातील स्थान आजही तितकंच भक्कम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
