पुणे : गेल्या काही दिवसांपासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी नाटकं येत आहेत. अशातच आता ‘पाच फुटाचा बच्चन’ (Paach Futacha Bacchan) हे मराठी नाटक (Marathi Natak) रंगभूमीवर दाखल झालं आहे.
नुकताच या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला असून या प्रयोगाला नाट्यरसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच प्रयोगाने नाट्यरसिकांना भुरळ घातली.
कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी लिहिलेल्या आणि श्रुती मधुदीप यांनी दिग्दर्शित आणि सादर केलेले या नाटकाच्या ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या प्रयोगाला यशवंतराव चव्हाण नाट्य सभागृहात सर्वसामान्य रसिकांसह अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती.
सुनील सुकथनकर, शिल्पा बल्लाळ, अमोल देशमुख यासारख्या चित्रपट- नाटयक्षेत्रातील मंडळींसोबतच महावीर जोंधळे, इंदूमती जोंधळे, श्रुती तांबे, सुचेता घोरपडे, प्रमोद मुजूमदार, मोहन देस अशी साहित्यिक मंडळी आणि अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
“नाटकाचा आशय हा समकालीन वास्तव मांडणारा असून त्याची भाषा आणि सादरीकरण सर्वसामान्य रसिकाला आवडेल असे आहे. शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि शहरी भागातील जनतेपासून ग्रामीण भागापर्यंत सर्वांना मनापासून साद घालणारे हे नाटक असून ते या काळाचे वास्तव आपल्यासमोर मांडते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
“लेखन, अभिनय, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा या सर्वच बाबतीत हे नाटक दर्जेदार असून समाजभान जागृत आणि व्यापक करणारे, खरीखुरी संत परंपरा उलगडणारे हे नाटक केवळ पुण्या-मुंबईतील प्रेक्षकांपुरते मर्यादित न राहता राज्यातील अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,” असेही मत जाणकारांनी व्यक्त केले.
कौस्तुभ देशपांडे यांच्या संहितेचे आणि श्रुती मधुदीप यांच्या सर्वांगीण अभिनयाचे रसिकांनी या वेळी विशेष कौतुक केले. येणाऱ्या काळात हे नाटक पुणे मुंबई सह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात घेऊन जाण्याचा मनोदय रोमरोम रंगमंच आणि ऑर्फियस स्टुडिओ यांनी व्यक्त केला.