सुना परफेक्ट, पण सासरचं कुटुंब भन्नाट! ‘नई नवेली’चा मजेशीर ट्रेलर आऊट

एका नव्या, आदर्श सुनेची, विचित्र कुटुंबाची आणि घराची उंबरठा ओलांडून दूरवर पोहोचणाऱ्या एका रहस्याची ही कथा आहे.

Untitled Design   2026 09 30T194921.178

Untitled Design 2026 09 30T194921.178

Fun-filled trailer of ‘Nayi Naveli’ is out : अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि कलर यलो यांनी आज ‘नई नवेली’चा ट्रेलर प्रदर्शित केला. या चित्रपटात प्रेक्षकांना ‘भाभी डायन है’ या रहस्यामागील कथा पाहायला मिळणार आहे. हे रहस्य अपेक्षेपलीकडच्या धमाकेदार आणि मनोरंजक प्रवासात रूपांतरित होते. चित्रपटात मोहिनीची भूमिका साकारणारी यामी गौतम धर आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. एका नव्या, आदर्श सुनेची, विचित्र कुटुंबाची आणि घराची उंबरठा ओलांडून दूरवर पोहोचणाऱ्या एका रहस्याची ही कथा आहे.

बालाजी मोहन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे लेखन हिमांशू शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी केले आहे, तर आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मेरठच्या पार्श्वभूमीवर घडणारी ‘नई नवेली’ हा भारताचा खास कल्पनारम्य कौटुंबिक मनोरंजनपट आहे. जबरदस्त हास्यविनोद, कौटुंबिक गोंधळ, न उलगडलेली रहस्ये आणि धमाकेदार ॲक्शन यांचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर एक भव्य मनोरंजनाचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. जी. व्ही. प्रकाश कुमार यांच्या संगीताने सजलेला हा चित्रपट दसऱ्याच्या अगदी आधी, 16 ऑक्टोबर 2026 रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना अवस्थी कुटुंबाच्या जगात घेऊन जातो. कुटुंबात नवी सून मोहिनीचे आगमन झाल्यानंतर अनेक प्रश्न समोर येऊ लागतात, ज्यांची उत्तरे कुणाकडेच नाहीत. एका सर्वसामान्य भारतीय कुटुंबातील परिचित वातावरण, रंगीबेरंगी व्यक्तिरेखा, प्रत्येकाची वेगवेगळी मते आणि लग्नाच्या विविध परंपरांपासून सुरू होणारा हा प्रवास हळूहळू प्रेक्षकांना कल्पनेपलीकडच्या आणि आश्चर्यचकित करणाऱ्या जगाची दारे उघडून देतो. यामी गौतम धर ही या चित्रपटातील सर्वात महत्त्वाची कडी आहे. ‘नई नवेली’चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या मनात पुढे काय घडणार, याबद्दल उत्सुकता निर्माण करतो. दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथा अनोखी असून, ती प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे.

अशोक खरात प्रकरणात कोर्टाचा मोठा आदेश, आरोपींच्या वकिलांना व्हिडीओ पुरावे पाहण्याची परवानगी

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक बालाजी मोहन म्हणाले, “खरं सांगायचं तर ‘नई नवेली’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. कारण या चित्रपटाची सुरुवात अशा एका कुटुंबापासून होते, जे अगदी आपल्या घरासारखं वाटतं. त्या कुटुंबात होणारी नोकझोक, प्रत्येकाची वेगवेगळी मतं आणि प्रत्येक घरात पाहायला मिळणारं विचित्र वागणं, हे सगळं प्रेक्षकांना आपलंसं वाटेल. मात्र, त्यानंतर ही कथा असा अनपेक्षित वळण घेते, जे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणेल आणि त्यांना आश्चर्यचकितही करेल.

“या चित्रपटात एकापेक्षा एक उत्तम कलाकार आहेत. प्रत्येकाने आपल्या अनोख्या अभिनयातून व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतला आहे. मोहिनीच्या भूमिकेत यामीचा सहजसुंदर वावर, रहस्यमय अंदाज आणि खट्याळपणा प्रेक्षकांची मने जिंकून घेईल. घर आणि कुटुंबाशी संबंधित या परिचित गोष्टी आम्ही एका भव्य आणि अनोख्या स्वरूपात सादर केल्या आहेत. त्याचबरोबर सुरुवातीपासून शेवटपर्यंत विनोदाची रंगतही कायम ठेवली आहे.

“मला याचा खूप आनंद आहे आणि ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे, तो म्हणजे या दसऱ्याला प्रेक्षक माझ्या पहिल्या चित्रपटाचा आणि या अद्भुत, कल्पनारम्य जगाचा मोठ्या पडद्यावर आनंद घेतील तो क्षण!” मोहिनीची भूमिका साकारण्याबद्दल यामी गौतम धर म्हणाली, “मोहिनीची भूमिका मला आवडण्यामागचं कारण म्हणजे ती प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तिच्यात एक आपलेपणा आहे, ती ओळखीची वाटते; पण त्याच वेळी तिच्या मनात एक गूढ रहस्यही दडलेलं आहे, जे हळूहळू उलगडत जातं.

मोठी बातमी! MPSC’च्या सर्व परीक्षा पद्धतीत बदल; आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

“‘नई नवेली’ने मला अशी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी दिली, जी कुटुंब, हास्यविनोद, भावना, जादुई जग आणि धमाकेदार ॲक्शन अशा वेगवेगळ्या पैलूंमध्ये सहजपणे वावरते; तरीही ती आपल्या मुळांशी मनापासून जोडलेली आहे. बालाजी सर, आनंद सर, हिमांशू, कलर यलोची टीम आणि अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. या दसऱ्याला प्रेक्षकांना मोहिनीशी परिचित करून देण्यासाठी आणि त्यांना या अनोख्या प्रवासावर घेऊन जाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” ‘नई नवेली’चा चित्रपटगृहात होणार गृहप्रवेश! १६ ऑक्टोबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहांत नक्की पाहा!

Exit mobile version