Gauri’s fierce avatar to be seen in the song from ‘Dashmi’ : रावणाचा अंत झाला, महिषासुराचा संहार झाला… पण आजच्या युगातील अन्याय आणि अधर्माचं काय? या विरोधात आज कोण उभं राहणार? कोण याचा सर्वनाश करणार? या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर घेऊन ‘दशमी’ हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर दाखल होत आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.
या चित्रपटातील ‘चंडिका हो’ या गाण्यातला अभिनेत्री गौरी इंगवलेचा ‘दुर्गा अवतार’ चर्चेचा विषय ठरत आहे. अंगावर लाल वस्त्र, कपाळी कुंकवाचा मळवट, गळ्यात कवड्याची माळ, तीक्ष्ण नजर आणि हातात अधर्माविरुद्ध लढण्यासाठी निर्धाराने प्रज्वलेली ज्योत अशा प्रभावी रूपात गौरी दिसणार आहे. स्त्रीशक्ती, अन्यायाविरोधातील लढा आणि आदिशक्तीचा जागर यांचा थरारक मिलाफ या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. सुरेश पंडित यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला जसराज जोशी यांचा स्वरसाज लाभला आहे.
सीजेपीच्या आंदोलनात नेतृत्वबदल; अभिजीत दिपकेंनी अजिंक्य शिंदेंवर विश्वास का टाकला, कोण आहेत ते?
गौरी इंगवलेच्या या रूपातून ‘दुर्गा म्हणजे केवळ पूजनीय शक्ती नाही, तर अन्यायाच्या विरोधात उभी राहणारी ताकद आहे’, हा आशय अधोरेखित होतो. गाण्यातील तिचा रौद्र, गूढ आणि सामर्थ्यशाली अंदाज ‘दशमी’ च्या कथानकाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवणारा आहे.
23 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या‘दशमी’ चित्रपटात गौरी इंगवले, मकरंद अनासपुरे, विजय निकम, महेश मांजरेकर, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन यांच्यासोबत दाक्षिणात्य स्टार रवि प्रकाश महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, विजयादशमीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ या पारंपरिक विचाराला आजच्या सामाजिक वास्तवाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे ‘दशमी’ केवळ मनोरंजन करणारा थरारक चित्रपट न राहता, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि स्त्रीशक्तीला नवी ताकद देण्याचा संदेश देताना दिसणार आहे.
