Pooja Birari : ‘शिवानी चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही, जे पटत नाही ते स्पष्टपणे बोलते’

Pooja Birari : झी मराठीवरील 'येतेच आता मी नांदायला' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Pooja Birari

Pooja Birari : झी मराठीवरील ‘येतेच आता मी नांदायला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी ‘शिवानी कदम’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. हुशार, शिस्तप्रिय, आत्मविश्वासू आणि आयुष्याचा आनंदाने स्वीकार करणारी शिवानी ही एक महत्त्वाकांक्षी तरुणी आहे. शिवानीच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना पूजा बिरारी म्हणाली, “मी शिवानी कदम ही भूमिका साकारत आहे. खूप मजेशीर पात्र आहे. ती हुशार, शिस्तप्रिय आणि आत्मविश्वासू आहे. आयुष्याचा आनंदाने जगणारी शिवानी एक यशस्वी व्यावसायिक महिला होण्याचे स्वप्न पाहते आणि त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. तिच्यासाठी तिची आई, बहीण, एक मैत्रीण आणि शेजारच्या काकू हेच तिचे संपूर्ण विश्व आहे. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तिची धडपड सुरू असते, पण ती प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेते. चुकीच्या गोष्टी तिला सहन होत नाहीत. एखादी गोष्ट पटली नाही तर ती लगेच बोलून मोकळी होते. त्याचवेळी घरातील परिस्थितीचीही तिला जाणीव आहे. वडील घरात नाहीत, त्यामुळे आई आणि ताईसाठी तिच्या मनात एक वेगळाच हळवेपणा आहे. आयुष्यात सरळ मार्गाने जगणारी शिवानी जेव्हा बिनधास्त अभिजीत आणि ठकुबाई यांना भेटते, तेव्हा काय घडतं, हीच या मालिकेची गमतीशीर गोष्ट आहे.”

या भूमिकेसाठी झालेल्या निवडीच्या प्रक्रियेबद्दल पूजा सांगते , “इतर भूमिकांसाठी जशी निवड प्रक्रिया असते, तशीच यासाठीही झाली. प्रामाणिकपणे सांगायचं तर, जेव्हा मला ऑडिशनसाठी विचारण्यात आलं, तेव्हा उत्सुकता होती पण मनात काही विचारही सुरू होते. हे करावं की नको, असाही विचार आला. मात्र, आलेल्या कामाचा आदर करून निदान ऑडिशन तरी देऊया, असं ठरवलं. त्यानंतर साधारण दोन-तीन वेगवेगळ्या ऑडिशन्स, लूक टेस्ट आणि मॉक शूट अशी प्रक्रिया झाली. अखेर चॅनेलकडून निवड झाल्याचं कळलं, तेव्हा आनंद तर झालाच पण आता एक वेगळी जबाबदारी स्वीकारायची आहे, याचीही जाणीव झाली. माझ्या नेहमीच्या प्रवासापेक्षा हा प्रवास वेगळा आहे. व्यक्तिरेखेची भाषा आणि तिचे वेगवेगळे पैलू समजून घेणं ही माझ्यासाठी सध्याची आव्हानं आहेत. मात्र, टीम खूप छान असल्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रोज प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. माझी तयारी सर्वप्रथम भाषेपासून सुरू झाली. भाषा समजून घेणं, ती शिकणं आणि तिचा सराव करणं यावर मी लक्ष दिलं. आउटडोअर शूटिंगच्या वेळी तिथल्या लोकांची भाषा आणि बोलण्याची पद्धतही मी बारकाईने पाहिली. त्याचा आपल्या व्यक्तिरेखेत कसा समावेश करता येईल, याचा विचार केला. त्याचबरोबर याआधी साकारलेल्या व्यक्तिरेखा बाजूला ठेवून नव्याने एक वेगळी व्यक्तिरेखा घडवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. शिवानी कशी बोलेल, कशी वागेल आणि तिच्या स्वभावाचे पैलू कसे असतील, याचा अभ्यास मी करत आहे. शिवानीचं वर्णन जसं करण्यात आलं आहे, त्यानुसार तिला माझ्या पद्धतीने कसं घडवता येईल, यावर माझं काम सुरू आहे. ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे आणि संपूर्ण मालिकेच्या प्रवासात ती सुरूच राहणार आहे. माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी दिसावी, हे माझ्यासाठी एक आव्हान आहे. शिवानी थोडी फटकळ स्वभावाची आहे. एखादी गोष्ट पटली नाही, तर ती तिथल्या तिथे स्पष्टपणे बोलून मोकळी होते. चुकीची गोष्ट तिला स्वतःबाबतच नाही, तर इतरांबाबतही मान्य नसते. जे काही आहे त्याचा हिशेब ती तिथल्या तिथेच करते.

प्रेक्षकांना प्रोमो, व्यक्तिरेखा आणि मालिकेची गोष्ट आवडत असल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून समजतं. त्याचबरोबर जेव्हा लोकांशी प्रत्यक्ष बोलणं होतं, तेव्हाही प्रोमोची चर्चा असल्याचं जाणवतं. खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रोमो पाहून मालिकेबद्दलची उत्सुकताही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून दिसते. नेहमीच्या सासू-सुनेच्या गोष्टी पेक्षा या मालिकेचा पाया थोडा खोडकर आणि वेगळा असल्यामुळे प्रेक्षकांना त्याची गंमत वाटते आहे. मालिकेचे प्रोमो पाहून मालिका बघायला आवडेल, अशा प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत. आउटडोअर शूटिंगला गेल्यावरही प्रोमोमुळे लोक मला शिवानी या नावाने ओळखू लागले आहेत. मालिकेच्या प्रोमोची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे.”

आउटडोअर शूटिंगदरम्यानचा एक खास किस्सा सांगताना पूजा म्हणाली, “आम्ही वाई येथील नरसिंह सरस्वती मंदिर, धोम येथे आउटडोअर शूटिंग करत होतो. त्यावेळी आमची नाईट शिफ्ट सुरू होती आणि प्रचंड थंडी वाजत होती. मंदिर धोम धरणाच्या अगदी जवळ असल्यामुळे तिथे नदीही होती. त्या रात्रीचा अनुभव खूपच मजेशीर होता. आम्ही सगळे कलाकार शूटिंगच्या ठिकाणी शेकोटी पेटवून तिच्याभोवती बसायचो. सगळ्यांच्या सोबतीने नाईट शूट कधी पूर्ण झालं, हे कळलंच नाही. खूप मजेत आम्ही सीन शूट केले. सगळे एकत्र नसतो तर शूटिंगची एवढी मजा आली नसती. सगळ्यांची सोबत असल्यामुळे थंडी आणि नाईट शिफ्ट दोन्ही सहन करणं सोपं झालं. शेकोटीजवळ बसलेलो असताना प्रत्येक जण आपापलं शूट करून तिथे येत होता. कलाकारांना सीनच्या गरजेनुसार स्वेटर किंवा शाल घेता येत नव्हती. मात्र, पडद्यामागचे टीम जॅकेट, टोपी, मोजे असं सगळं घातलं होतं. आमचा सीन मंदिरात असल्यामुळे आम्हाला चप्पल न घालता शूट करावं लागत होतं. त्यामुळे थंडी आणखीच जाणवत होती. आमच्या दिग्दर्शन टीममधील एक असिस्टंट जेव्हा शेकोटीजवळ यायचा, तेव्हा आम्ही त्याला गंमतीने म्हणायचो, ‘जरा तरी काही वाटू दे! हातात ग्लोव्हज घालून शेकोटीजवळ येतोयस तू!’ असे छोटे छोटे प्रसंग त्या शूटिंगच्या आठवणी आणखी खास करून गेले.”

सहकलाकार हर्षद आणि उषा मॅम यांच्यासोबतच्या अनुभवाबद्दल पूजा म्हणाली, “हर्षदला मी पहिल्यांदा लूक टेस्टच्या वेळी भेटले. तोही आपल्या कामाबाबत खूप चोख आहे. तेव्हाच जाणवलं की त्याच्यासोबत काम करताना मजा येणार आहे. सीन, व्यक्तिरेखांचा विकास आणि संवादांमधील बारकावे यांबद्दल आमच्या छान चर्चा होतात. तो खूप सर्जनशील आणि निरीक्षणशील आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करायला मजा येते.उषा मॅमना मी पहिल्यांदा प्रोमोच्या वेळी भेटले. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून मी भारावून गेले. या वयातही त्या इतक्या गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे सांभाळतात आणि हाताळतात, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांच्या आवाजातील कणखरपणा, बोलण्यातील ठामपणा आणि आत्मविश्वासपूर्ण शैली पाहून मी खूप प्रभावित झाले आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे आणि या सगळ्यांसोबत काम करताना नक्कीच खूप मजा येणार आहे.”

बेलापूर येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ; 10 जणांवर गुन्हा दाखल-

शिवानीच्या आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित वळणांचा आणि तिच्या मजेशीर प्रवासाचा आनंद घेण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘येतेच आता मी नांदायला’, ३० नोव्हेंबरपासून सोम – शुक्र रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर !

follow us