‘तू आहेस ना’मधून सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके एकत्र; लव्ह फिल्म्सकडून फर्स्ट लूकचे अनावरण
गोव्यातील ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) गाला प्रीमियर विभागात जागतिक प्रीमियर होणारा एकमेव मराठी चित्रपट.
Tu Aahes Na Marathi Movie: लव्ह फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली असून, ‘तू आहेस ना’ या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरचे अनावरण करून निर्मात्यांनी ही घोषणा केली आहे. मानवी नातेसंबंधांवर भाष्य करणारी ही एक हृदयस्पर्शी कथा असून, एका अनपेक्षित नात्यामुळे दोन व्यक्तींचे आयुष्य एकत्र येते आणि त्यांच्या आयुष्याला अशा प्रकारे नवे वळण मिळते, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते.
‘प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहे, मग त्याचा धर्म कोणताही असो’; जावेद अख्तर यांचं वक्तव्य चर्चेत
‘तू आहेस ना’ या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी, टेलिव्हिजन तसेच रंगभूमीवर अनेक दशकांचा अनुभव असलेल्या सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची भावनिकदृष्ट्या प्रभावी कथा त्यांना विशेष भावली आणि त्यामुळेच हा प्रकल्प त्यांच्यासाठी खास ठरला. तर सिद्धार्थ बोडके यांच्यासाठी ‘तू आहेस ना’ हा लव्ह फिल्म्ससोबतचा दुसरा चित्रपट असून, यापूर्वी त्यांनी ‘देवमाणूस’च्या माध्यमातून या टीमसोबत काम केले आहे.
अवघा एक महिना शिल्लक! ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ची भारतात तुफान क्रेझ; अॅडव्हान्स बुकिंगसाठी झुंबड
View this post on Instagram
चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात एका महत्त्वपूर्ण टप्प्याने होत आहे. ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) २६ नोव्हेंबर रोजी गाला प्रीमियर विभागात होणार आहे. या महोत्सवातील या विभागात जागतिक प्रीमियर होणारा ‘तू आहेस ना’ हा एकमेव मराठी चित्रपट ठरणार आहे.
‘तू आहेस ना’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दीपक गावडे (Deepak Gawande) यांनी केले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या कामाची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये दखल घेण्यात आली आहे.
चित्रपटाविषयी बोलताना सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, “ ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचा विषय आणि आजच्या काळातील त्याचे महत्त्व मला एक अभिनेत्री म्हणून विशेष भावले. चित्रपटात ज्या विषयाची मांडणी करण्यात आली आहे, त्यासोबतच मला साकारायला मिळणारी व्यक्तिरेखाही मला या प्रकल्पाचा भाग होण्यासाठी प्रेरित करणारी ठरली. IFFI मध्ये प्रेक्षक हा चित्रपट पाहणार आहेत, याचा मला खूप आनंद आहे.”
Phulwa Khamkar : ’चित्रपताका’तील कार्यशाळेत फुलवा खामकर यांनी नृत्यदिग्दर्शनाचे मर्म उलगडले
आपला अनुभव सांगताना सिद्धार्थ बोडके म्हणाले, “ ‘तू आहेस ना’ या चित्रपटाने मला भावनांच्या विविध छटा असलेली व्यक्तिरेखा साकारण्याचे आव्हान दिले. एक अभिनेता म्हणून मला अशा प्रकारची भूमिका साकारण्याची खूप इच्छा होती. ‘देवमाणूस’नंतर लव्ह फिल्म्ससोबतचा हा माझा दुसरा चित्रपट आहे. एका वेगळ्या आणि आव्हानात्मक कथेसाठी पुन्हा एकदा या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप उत्सुक होतो. या चित्रपटामुळे मला स्वतःमधील एका नव्या पैलूचा शोध घेता आला.”
दिग्दर्शक दीपक गावडे म्हणाले, “दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक ठरला आहे. विशेषतः ‘तू आहेस ना’ ही कथा माझ्या मनाच्या खूप जवळची आहे. प्रतिष्ठित IFFI मध्ये या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार असल्याचा मला विशेष आनंद आहे. ही कथा मोठ्या पडद्यावर अनुभवताना प्रेक्षकांना नक्कीच आनंद मिळेल, अशी मला आशा आहे.”
Call Me Bae S2 ची रिलीज डेट ठरली; 17 डिसेंबरला प्राइम व्हिडिओवर होणार प्रीमियर
लव्ह फिल्म्स प्रस्तुत ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दीपक गावडे यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.