Download App

Film Festival: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गीतांजली कुलकर्णीच्या ‘या’ सिनेमाची बाजी

गीतांजली कुलकर्णीचे 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' या दोन चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणार आहे.

Gitanjali Kulkarni International Film Festival: उत्तम अभिनय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकरता ओळखल्या जाणाऱ्या गीतांजली कुलकर्णीचे (Gitanjali Kulkarni) ‘मिनिमम’ आणि ‘ऱ्हायनो चार्ज’ या दोन चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणार आहे. (International Film Festival) यूके आशियाई चित्रपट महोत्सवात ‘मिनिमम’ झळकत असून न्यूयॉर्क इंडिया फिल्म फेस्टिव्हलद्वारे ‘ऱ्हायनो चार्ज’ हा लघुपट जगभरातील ( Film Festival) सिनेरसिकांसमोर येत आहे. एकूणच आपल्या या दोन चित्रपटांद्वारे सिनेमॅटिक कलात्मकतेचा दुहेरी उत्सव साजरा करण्यासाठी गीतांजली सज्ज झाली आहे.

गीतांजली कुलकर्णीच्या गौरवशाली कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, ‘मिनिमम’ आपल्या मार्मिक कथेद्वारे आणि त्यात असलेल्या महत्त्वाच्या कलाकारांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालणार आहे. प्लॅटून फिल्म्स आणि एलानार फिल्म्स निर्मित, प्रतिभावंत रुमाना मुल्ला यांनी दिग्दर्शित केलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचे कथानक परदेशातील आव्हाने आणि व्यामिश्रतेतून वाट काढणाऱ्या स्थलांतरितांच्या जगण्याभोवती फिरते. गीतांजली कुलकर्णीसोबत, या चित्रपटात नमित दास, सबा आझाद आणि स्वत: रुमाना मुल्ला यांचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

2 मे रोजी यूके एशियन फिल्म फेस्टिव्हलद्वारे या चित्रपटाचा प्रीमियर होत असून जगभरातील प्रेक्षकांवर छाप उमटवण्याकरता ‘मिनिमम’ सज्ज झाला आहे. ही उत्कंठा अधिक वाढवत, अभिरूप बसू दिग्दर्शित ‘ऱ्हायनो चार्ज’ या लघुपटातही, गीतांजली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या पार्श्वभूमीवरील या लघुपटात एका अनिश्चित परिस्थितीत अडकलेल्या केअरटेकर व्यक्तीची चित्तवेधक कथा मांडली आहे. विनोद नागपाल यांनीही या लघुपटात उत्तम कामगिरी बजावली असून, जून महिन्यात आयोजित न्यूयॉर्क इंडिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये या लघुपटाचा प्रीमियर होणार आहे. आपल्या कलात्मकतेमुळे ‘ऱ्हायनो चार्ज’ नक्कीच प्रेक्षकांवर आपली अमीट छाप उमटवेल.

चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील उल्लेखनीय योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या गीतांजली कुलकर्णी आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे अनेकदा प्रेक्षक आणि समीक्षकांच्या प्रशंसेस आणि कौतुकास पात्र ठरल्या आहेत. ‘कोर्ट’, ‘मुक्तिभवन’ आणि ‘कारखानीसांची वारी’ यांसारख्या समीक्षकांनी गौरवलेल्या प्रशंसनीय चित्रपटांतील उत्तम कामगिरीमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या अष्टपैलू आणि प्रतिभावान कलाकारांपैकी एक अशी आपली ओळख निर्माण केली आहे. ‘गुल्लक’, ‘ताजमहल 1989’ आणि ‘अपॉझ्ड – नया सफर’ यांसारख्या लोकप्रिय वेब सीरिजमधील वेगवेगळी पात्रे सूक्ष्म बारकाव्यांसह सादर केलेल्या त्यांच्या भूमिकांना जगभरातील प्रेक्षकांची पसंती लाभली आहे.

Panchayat: पंचायत सीझन 3 ची आतुरतेनं वाट पाहणाऱ्यांसाठी मोठा ट्विस्ट, ‘या’ दिवशी होणार रिलीज

आपल्या या आगामी प्रकल्पांविषयी बोलताना गीतांजलीने वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्यासंदर्भात उत्साह व्यक्त केला. ती म्हणाली, “मला नेहमीच वाटते की, वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणे महत्त्वाचे असते आणि ‘मिनिमम’ व ‘ऱ्हायनो चार्ज’ अशा दोन चित्रपटांत अभिनय करता आला, याचा मला अतिशय आनंद वाटतो. ‘मिनिमम’ ही परदेशी जगतात स्थलांतरित झालेल्यांची कथा असून, त्यांच्यासमोरची आव्हाने, नातेसंबंधांची गुंतागुंत या चित्रपटात रेखाटण्यात आली आहेत. ‘ऱ्हायनो चार्ज’ या लघुपटात अल्पसंख्याक समुदायातील एक केअरटेकर व्यक्ती अनिश्चित परिस्थितीत सापडते, त्या कथेचे चित्रण करण्यात आले आहे.”

गीतांजलीने मनोरंजनाच्या जगतातील आपल्या प्रवासात प्रशंसा आणि यशाचे अनेक टप्पे अनुभवले आहेत. ‘कोर्ट’ मधील तिच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कामगिरीपासून ‘गुल्लक’ या लोकप्रिय मालिकेतील तिच्या वेधक भूमिकेपर्यंत, तिने साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा जणू उत्तमतेची व्याख्या परिभाषित करते. मराठी, हिंदी भाषेतील, चित्रपट आणि ओटीटी या दोन्ही श्रेणींत अनेक फिल्मफेअर पुरस्कारांसह, भारतीय चित्रपटसृष्टीला आकार देण्यात झोकून देऊन काम करणाऱ्या प्रतिभावान गीतांजलीने आपला खारीचा वाटा उचलला आहे.

न्यूयॉर्क मधील मायकेल जॅक्सनवर आधारित ‘एमजे: द म्युझिकल’ शोवरून अभिनेता बनवणार सिनेमा

गीतांजली तिच्या या नव्या प्रकल्पांद्वारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पदार्पण करीत असून जगभरातील प्रेक्षकांना तिच्या अतुलनीय प्रतिभेचे आणि लोभस कामगिरीचे साक्षीदार होण्याची संधी प्राप्त होणार आहे. प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांत ‘मिनिमम’ आणि ‘ऱ्हायनो चार्ज’ यांना केंद्रस्थान प्राप्त झाल्यामुळे, गीतांजलीची सिनेमॅटिक कामगिरी अधिक उजळून निघाली आहे. यामुळे गीतांजली एक जबरदस्त परफॉर्मर आणि भारतीय चित्रपटाच्या खऱ्याखुऱ्या आयकॉन असल्याचे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.

follow us