आधी मला स्क्रिप्ट द्या!” : लेक श्रियाच्या ‘त्या’ उत्तराने सचिन पिळगावकर झाले होते अवाक!

Shriya Pilgaonkar: सचिन पिळगावकर यांनी आपली लेक श्रिया पिळगावकर हिच्या अभिनयातील पदार्पणाची एक अत्यंत भावनिक आठवण शेअर केली.

Sachin Pilgaonkar

Sachin Pilgaonkar

Sachin Pilgaonkar: सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना केवळ ज्ञानच नाही, तर रंजक गप्पांचा देखील आनंद घेता येत आहे. या कार्यक्रमाची सूत्रसंचालक माधुरी दीक्षित दर आठवड्याला हॉट सीटवर येणाऱ्या पाहुण्यांशी दिलखुलास गप्पा मारत त्यांच्या आयुष्यातील अनेक न ऐकलेले किस्से प्रेक्षकांसमोर आणते आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी विशेष भागात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Shriya Pilgaonkar) आणि अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) हजेरी लावणार आहेत. या भागात सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकांच्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच, त्यांच्या कौटुंबिक जीवनातील गमतीशीर किस्सेही ऐकायला मिळणार आहेत. गप्पांची ही रंगत वाढवण्यासाठी माधुरीने सचिन पिळगावकरांना त्यांच्यावर बनलेले काही मजेदार ‘मीम्स’ (Memes) दाखवले, ज्याचा त्यांनी स्वतःही मनसोक्त आनंद घेतला.

या गप्पांच्या ओघात सचिन पिळगावकर यांनी आपली लेक श्रिया पिळगावकर हिच्या अभिनयातील पदार्पणाची एक अत्यंत भावनिक आठवण शेअर केली. श्रियाने तिचे आई-वडील म्हणजेच सचिन आणि सुप्रिया यांना तिचा केवळ 10 मिनिटांचा एक नाटक वजा प्रयोग पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. श्रियाने रंगमंचावर प्रवेश करताच तिच्या पहिल्याच सीनने सचिन यांचे लक्ष वेधून घेतले. तिची ती काही मिनिटांची कामगिरी पाहून तिच्यातील उपजत अभिनेत्रीची ओळख सचिन यांना पटली. नाटक संपवून घरी परतत असताना, त्यांनी श्रियाला ते स्वतः दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात काम करण्याची थेट ऑफर दिली. परंतु, श्रियाने अत्यंत व्यावसायिक आणि रोखठोक उत्तर देत म्हटले, आधी मला स्क्रिप्ट द्या. मी ती वाचीन आणि मग काय ते सांगेन.” श्रियाच्या या उत्तराने सचिन पिळगावकर काही क्षणांसाठी पूर्णपणे अवाक झाले होते.

या प्रसंगाची आठवण सांगताना सचिन म्हणाले, “मी जेव्हा तिला पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म करताना पाहिले, तेव्हा ते नाटक अवघ्या 10 मिनिटांचे होते. तिने मला आणि सुप्रियाला ते पाहण्यासाठी बोलावले होते. तिच्या पहिल्याच सीनमध्ये मला समजले की तिच्यात काहीतरी खास आहे. घरी जाताना मी तिला म्हणालो, ‘श्रिया, मला एक सिनेमा बनवावासा वाटतोय आणि तू त्यात काम करावे अशी माझी इच्छा आहे.’ तिचा अभिनय पाहिल्यानंतरच माझ्या मनात हा विचार आला, त्यापूर्वी असा कोणताही विचार माझ्या डोक्यात नव्हता.”

श्रियाच्या त्या वेळच्या उत्तराचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, “माझी ऑफर ऐकल्यावर ती लगेच म्हणाली, ‘मला आधी स्क्रिप्ट द्या. मी ती वाचीन आणि मग तुम्हाला कळवीन.’ तिचे ते शब्द ऐकून मी शांत झालो. पण नंतर मनात विचार आला, ‘शेवटी ती माझीच मुलगी आहे.’ तिने स्क्रिप्ट वाचली, तिला ती आवडली आणि तिने तो सिनेमा केला. पहिल्याच चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर तिने स्वतःचा मार्ग स्वतः निवडला आणि इंडस्ट्रीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले.”

पहात रहा, माधुरी दीक्षितच्या खुमासदार शैलीतील ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता, सोनी मराठी आणि सोनी लिववर.

Exit mobile version