IFFI 2026: इंडियन पॅनोरमात मराठी चित्रपटांचा ठसा! ‘आदी अनंत’, ‘बाप्या’, ‘देऊळ बंद 2’सह 6 चित्रपटांची निवड

IFFI 2026 Indian Panorama Marathi Films: इंडियन पॅनोरमात फिचर फिल्म, नॉन-फिचर फिल्म विभागांत 6 मराठी चित्रपटांना स्थान मिळालं आहे.

IFFI 2026 Indian Panorama Marathi Films

IFFI 2026 Indian Panorama Marathi Films

IFFI 2026 Indian Panorama Marathi Films: गोवा येथे होणाऱ्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) इंडियन पॅनोरमा विभागातून 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन-फिचर फिल्म्सची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या महोत्सवात मराठी चित्रपटांनीही आपली छाप उमटवली आहे. विशेष म्हणजे, फिचर फिल्म आणि नॉन-फिचर फिल्म अशा दोन्ही विभागांत मिळून 6 मराठी चित्रपटांना स्थान मिळालं आहे. हा चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणार आहे.

सनी देओल आणि अजय देवगणसोबत माधुरीनं एकत्र केला होता डान्स, फराह खान म्हणाली, ‘तुला तर अवॉर्ड मिळायला हवा’

भारतीय पॅनोरमाच्या फिचर फिल्म विभागात महेश लिमये दिग्दर्शित ‘आदी अनंत’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. तर मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या (Mainstream Cinema) विभागात समीर तेवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ आणि प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांनी स्थान मिळवलं आहे.

नॉन-फिचर फिल्म विभागातही मराठी चित्रपटांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. या विभागात अमिथ पाटकर दिग्दर्शित ‘शिक्षा’, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘चांदोबा’ आणि संतोष दावखर दिग्दर्शित ‘आभाळ-वृक्ष’ या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

‘रामायण’चा महाराष्ट्रातही जलवा, तळेगावच्या श्री शिवाजी टॉकीजमध्ये सलग 9 दिवस हाऊसफुल्ल शो

तसेच जिजीविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक (Best Debut Director) पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. या पुरस्कारासाठी देशभरातील पाच चित्रपटांची निवड करण्यात आली असून, त्यात ‘तिघी’चा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांची उपस्थिती अधिक ठळक होणार आहे. दरम्यान, यंदाच्या भारतीय पॅनोरमा विभागात फिचर फिल्मसाठी देशभरातून 404 चित्रपटांचे प्रवेश अर्ज आले होते. त्यातून 25 चित्रपटांची निवड करण्यात आली. यामध्ये 20 चित्रपट मुख्य फिचर फिल्म विभागात, तर 5 चित्रपट मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या विभागात आहेत. दुसरीकडे, 358 नॉन-फिचर चित्रपटांमधून 20 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

सस्पेन्स आणि क्राईमचा अनोखा खेळ मोठ्या पडद्यावर! ‘मिरांडा वॉर्निंग’चा ट्रेलर प्रदर्शित!

यंदाच्या महोत्सवासाठी ‘धुरंधर’ हा हिंदी फिचर चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट असणार आहे, तर ‘बिकमिंग’ या लडाखी नॉन-फिचर चित्रपटाने उद्घाटन होणार आहे. 1978 पासून भारतीय पॅनोरमा विभागाच्या माध्यमातून देशातील दर्जेदार चित्रपटांना व्यासपीठ दिलं जात आहे. त्यामुळे यंदाच्या महोत्सवातील मराठी चित्रपटांची निवड ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

Exit mobile version