Jai Bhim Panther Ek Sangharsh : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नवयान ड्रीम फिल्म प्रॉडक्शन निर्मित “जयभीम पँथर” एक संघर्ष (Jai Bhim Panther Ek Sangharsh) या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच संजय खंडागळे (मुंबई अध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य) (Sanjay Khandagle) यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. निशांत नाथाराम धापसे (Nishant Nathram) यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून एका संघटनेच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटातून मांडली आहे.
भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रॉडक्शनद्वारे निर्मिती होत असलेला “जयभीम पँथर” एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. लेखक दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे यांनी आतापर्यंत हलाल , भोंगा, भारत माझा देश आहे अशा अनेक चित्रपटांचे लेखक म्हणून, तर “अंकुश”, “रंगीले फंटर” हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या चित्रपटांना अनेक महोत्सवांमध्ये पुरस्कार, राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
“जयभीम पँथर” एक संघर्ष या चित्रपटात गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर,मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर,संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे, प्रियांका उबाळे अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. योगेश कोळी छायाचित्रण, संकलन निलेश गावंड, वेशभूषा कोमल शेळके तर प्रकाश सिनगारे यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.
मोठी बातमी! विधान परिषदेसाठी चंद्रकांत रघूवंशी शिवसेनेचे उमेदवार
चित्रपटला संगीत/ पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचे असून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, अजय देहाडे, शुभम म्हस्के यांचा सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. संतोष गाडे यांनी प्रोजेक्ट हेड तर बाबासाहेब पाटील हे कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे. बहुजन समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष हा या चित्रपटाचा आशय आहे. समाजातील अन्याय अत्याचाराविरुद्ध उभ्या राहणाऱ्या अनेक संघटनांसोबत काय होते, यांची रंजक गोष्ट या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, बहुजन संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना हा चित्रपट आपलासा वाटेल असे चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निशांत धापसे यांनी सांगितले.