Download App

Kiran Mane: जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी किरण मानेंची पोस्ट; म्हणाला, “मराठा समाजाला आरक्षण…”

Kiran Mane Post: मराठी अभिनेते किरण माने कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. ‘बिग बॉस’ सीझन ४ मध्ये सहभागी झाल्यापासून ते घराघरांत पोहोचले. ‘बिग बॉस’च्या घरात त्यांनी ‘सातारचा बच्चन’ अशी त्यांची स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Social media) अभिनयासोबतच ते अनेकवेळा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर बेधडक भाष्य करत असल्याचे बघायला मिळत असते. राज्यामध्ये गेल्या काही दिसवासापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ( Marathi Serial) याप्रकरणी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत किरण मानेंनी यावर भाष्य केलं आहे.


काय आहे नेमकं पोस्टमध्ये ?

माझ्या मराठा बांधवांनो… थेट बोलतो… आपल्याला धर्माच्या नांवावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की ‘एका जातीवर’ झाला असं समजलं जातं. आधी शेतकर्‍यांवर, मग वारकर्‍यांवर आनि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुनाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागनार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पायजे.

मनोज जरांगे पाटील…तुमच्याबद्दल काय बोलू? या भाकड काळात तुमी जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो ! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय… रक्त सळसळायला लागलंय… हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकार्‍यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !’

अशा पोस्टवरनं जे कायम मला ट्रोल करतात त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुनाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्‍या शेतकर्‍याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकर्‍यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असेपर्यन्त बोलत र्‍हानार.

आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे… न्याय मिळालाच पायजे. जय शिवराय. जय भीम. अशी पोस्ट त्यांनी यावेळी केली आहे.

Prajakta Gaikwad: जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावर प्राजक्ता गायकवाडची संतप्त पोस्ट; म्हणाली…’रक्त उसळलंय…’

दरम्यान, जालना येथे २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्याबरोबर आणखी १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते. दोन वेळा झालेल्या चर्चेमधून काही देखील साध्य झालं नाही. पुढे पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये वाद पेटला होता आणि त्यानंतर लाठीचार्जची धक्कादायक घटना घडली. या पार्श्वभूमीवर अभिनेते किरण मानेंनी ही पोस्ट शेअर करत स्वत:चं सडेतोड मत मांडलं आहे. तसेच सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या सिरीयलद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. या सीरियलमध्ये त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे.

Tags

follow us