Tumbbad 2 : ‘असॅसिन्स क्रीड’, ‘हिटमॅन’ आणि ‘बॉर्डरलँड्स’ यांसारख्या लोकप्रिय फ्रँचायझींसाठी संगीत तयार करणारे जेस्पर किड पुन्हा एकदा ‘’तुंबाड’च्या दुनियेत परतत आहेत. सोहम शाह फिल्म्स आणि डॉ. जयंतीलाल गडा यांच्या पेन स्टुडिओजच्या संयुक्त विद्यमाने या सीक्वलची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘’तुंबाड’ची अविस्मरणीय वातावरणनिर्मिती करण्यामागील सर्जनशील टीम पुन्हा एकदा या फ्रँचायझीच्या दुनियेत परतत आहे. अभिनेता-निर्माता सोहम शाह आणि डॉ. जयंतीलाल गडा यांच्या पेन स्टुडिओजसोबतच्या सहकार्याने ‘’तुंबाड’ 2’साठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले डॅनिश संगीतकार जेस्पर किड यांना पुन्हा संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे पहिल्या चित्रपटाचा अविभाज्य भाग ठरलेल्या खास संगीताचा अनुभव प्रेक्षकांना पुन्हा घेता येणार आहे.
‘असॅसिन्स क्रीड’, ‘हिटमॅन’ आणि ‘बॉर्डरलँड्स’ यांसारख्या आयकॉनिक फ्रँचायझींसाठी जगभरात ओळखले जाणारे जेस्पर किड यांनी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’’चे मूळ संगीत तयार केले होते. चित्रपटाच्या अनोख्या दुनियेप्रमाणेच त्यांनी त्याच्या संगीतालाही एक वेगळी ओळख दिली. चित्रपटातील लोककथेला रुपेरी पडद्यावर प्रभावीपणे साकारण्यात संगीताने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गूढता आणि पौराणिक कथांचा संगम त्यांच्या संगीतामुळे अधिक प्रभावी आणि संस्मरणीय ठरला. विशेष म्हणजे, त्यांच्या या संगीताने अनेक पुरस्कारही पटकावले असून, 2019 मधील क्रिटिक्स चॉइस फिल्म अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
या फ्रँचायझीमध्ये पुन्हा सहभागी होण्याबद्दलचा आनंद व्यक्त करताना जेस्पर किड म्हणाले, “’तुंबाड’ 2’साठी संगीत तयार करण्यासाठी आणि ”तुंबाड’च्या दुनियेतील आणखी एका अद्भुत प्रवासाचा भाग होण्यासाठी दिग्दर्शक आदेश प्रसाद आणि अभिनेता-निर्माता सोहम शाह यांच्यासोबत पुन्हा काम करण्यास मी खूप उत्सुक आहे.’तुंबाड ‘साठी सर्वप्रथम आदेश यांनीच माझ्याशी संपर्क साधला होता. मला आठवतंय, जेव्हा मी या चित्रपटाची सुरुवातीची आवृत्ती पाहिली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटविश्वांपैकी हे एक आहे. या दुनियेत पुन्हा परतून संगीताच्या माध्यमातून ती अधिक खोलवर अनुभवण्याची संधी मिळत असल्याने मी खूप रोमांचित आहे.”
‘तुंबाड’ फ्रँचायझीमध्ये जेस्पर यांच्या पुनरागमनाबद्दल सोहम शाह म्हणाले, ”तुंबाड ची ओळख निर्माण करण्यात त्याच्या संगीताचा जितका मोठा वाटा होता, तितकाच त्याच्या दृश्यात्मक दुनियेचाही होता. जेस्पर यांनी या चित्रपटाला एक वेगळ्याच प्रकारचे संगीत दिले, ज्यामुळे त्यातील वातावरण आणि कथा अधिक प्रभावी झाली’तुंबाड 2’साठी त्यांचे पुनरागमन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, कारण ही सर्जनशील भागीदारी कायम ठेवत आम्हाला चित्रपटाचे विश्व आणखी विस्तारायचे आहे. त्यांचे पुन्हा स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे आणि यावेळी आम्ही एकत्रितपणे जे काही साकारत आहोत, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
जेस्पर यांच्यासोबत पुन्हा काम करण्याबद्दल दिग्दर्शक आदेश प्रसाद म्हणाले, “’तुम्बाड’ची दुनिया उभी करण्यात जेस्पर यांच्या संगीताचा खूप मोठा वाटा होता. सुरुवातीपासूनच मला माहीत होते की चित्रपटाचे संगीत असे असायला हवे, जे त्यातील गूढता, भव्यता आणि भयावह वातावरण प्रेक्षकांना अनुभवायला लावेल. जेस्पर यांनी माझी ही कल्पना उत्तम प्रकारे समजून घेतली आणि चित्रपटाला एकदम वेगळे व अनोखे संगीत दिले. ‘तुम्बाड 2’साठी त्यांचे पुन्हा येणे ही आनंदाची बाब आहे, कारण मी आणि ते दोघेही या चित्रपटाच्या दुनियेशी चांगलेच परिचित आहोत. ही भागीदारी पुढे नेण्यासाठी आणि चित्रपटाच्या संगीतामध्ये काही नवीन प्रयोग करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
जेस्पर आणि आदेश यांच्या सहकार्यामुळे चित्रपटाच्या संगीतामध्ये विविध प्रकारच्या ध्वनींचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला होता. त्यांनी चित्रपटात गूढ सुरावटी, वेगवेगळी वाद्ये, ऑर्केस्ट्रा आणि सिंथेसायझरच्या आवाजांचा सुरेख मिलाफ साधला होता. या अनोख्या संगीतामुळे चित्रपटाच्या कथेला साजेसे जुन्या काळातील वातावरण निर्माण होण्यासोबतच एक रहस्यमय आणि वेगळाच अनुभव प्रेक्षकांना मिळाला. मूळ चित्रपटाच्या कथानकात संगीताने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका पाहता, त्यांची ही सर्जनशील भागीदारी आणखी खास ठरते.
आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत जेस्पर किड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. चित्रपट आणि व्हिडिओ गेम्ससाठी केलेल्या नाविन्यपूर्ण संगीत रचनांमुळे त्यांनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेमिंगपासून मनोरंजनविश्वापर्यंत लोकप्रिय संगीतकार म्हणून ओळखले जाणारे जेस्पर यांनी ‘असॅसिन्स क्रीड’, ‘हिटमॅन’ आणि ‘बॉर्डरलँड्स’ यांसारख्या जगप्रसिद्ध फ्रँचायझींसाठी संगीत दिले आहे. ‘तुम्बाड’साठी संगीत दिल्याबद्दल त्यांना 2019 मध्ये क्रिटिक्स चॉइस फिल्म अवॉर्ड्स, ज्ञान दरबार फिल्म अवॉर्ड्स आणि पॉवर ब्रँड्स बॉलिवूड फिल्म जर्नलिस्ट अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचे पुरस्कारही मिळाले होते. याशिवाय, 2019 मधील 64 व्या विमल फिल्मफेअर पुरस्कार, CNN-IBN न्यूज18 रील मूव्ही अवॉर्ड्स आणि FOI ऑनलाइन अवॉर्ड्स इंडिया येथेही त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत या श्रेणीत नामांकन मिळाले होते.
अभिनेता आणि निर्माता म्हणून सोहम शाह पुन्हा एकदा ‘’तुंबाड ’च्या दुनियेत परतत आहेत, तर आदेश प्रसाद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. नव्या चित्रपटासाठी पहिल्या भागातील सर्जनशील टीम पुन्हा एकत्र येणार असून, यावेळी कलाकारांच्या संचात काही नवीन चेहरेही पाहायला मिळणार आहेत. आलिया भट्ट आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचाही या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे ‘’तुंबाड 2’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘’तुंबाड 2’ची निर्मिती अभिनेता-निर्माता सोहम शाह हे अनुभवी निर्माते डॉ. जयंतीलाल गडा यांच्या पेन स्टुडिओजसोबत मिळून, त्यांच्या सोहम शाह फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली करत आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच या सीक्वलच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही आदेश प्रसाद यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, पेन स्टुडिओजने आतापर्यंत 3000 हून अधिक चित्रपटांशी संलग्न राहून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या बॅनरने ‘RRR’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही पाठिंबा दिला आहे. आता सोहम शाह यांच्यासोबत हातमिळवणी करून हा स्टुडिओ ‘’तुंबाड 2’ मोठ्या स्तरावर प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘’तुंबाड 2’ हा चित्रपट 3 डिसेंबर 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
