Tumbbad 2 च्या रेकीत मिळाला जुन्या ‘तुम्बाड’ चा ठेवा; वर्षांनंतर सापडले चित्रीकरणात वापरलेले मूळ साचे
Tumbbad 2 : ‘तुम्बाड 2’ साठी लोकेशन शोधताना टीमला नुकतंच असं काही सापडलं, ज्याची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती. पहिल्या ‘तुम्बाड’च्या
Tumbbad 2 : ‘तुम्बाड 2’ साठी लोकेशन शोधताना टीमला नुकतंच असं काही सापडलं, ज्याची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती. पहिल्या ‘तुम्बाड’च्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेल्या काही मूळ वस्तू, ज्या त्याच ठिकाणी वर्षानुवर्षे जतन करून ठेवण्यात आल्या होत्या, टीमच्या हाती लागल्या. वाड्याची रेकी करत असताना टीमला पहिल्या चित्रपटात वापरण्यात आलेले ‘आटे की गुडिया’चे मूळ साचे सापडले. पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगपासून हे साचे त्याच ठिकाणी तसेच पडून होते. इतकंच नव्हे, तर टीमला वाड्याचं मूळ कुलूप उघडण्यासाठी वापरले जाणारे साधन ही सापडलं, ज्याचा वापर पहिल्या ‘तुम्बाड’मध्ये करण्यात आला होता.
पहिल्या ‘तुम्बाड’च्या निर्मितीनंतर अनेक वर्षांनी त्याच विश्वात पुन्हा परतणाऱ्या टीमसाठी हा अनपेक्षित शोध अत्यंत भावुक आणि नॉस्टॅल्जिक ठरला. चित्रपटाचं वैशिष्ट्यपूर्ण विश्व उभं करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीची आठवण या वस्तूंमुळे पुन्हा ताजी झाली. वर्षानुवर्षे शांतपणे त्याच ठिकाणी जतन झालेल्या या वस्तू अचानक ‘तुम्बाड’ फ्रँचायझीच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग बनल्या.
एका क्रू मेंबरने आठवण सांगताना म्हटलं, “आम्ही केवळ रेकीसाठी वाड्यात गेलो होतो आणि पहिल्या चित्रपटाशी संबंधित काही सापडेल, अशी अजिबात अपेक्षा नव्हती. जेव्हा आम्हाला ‘आटे की गुडिया’चे साचे सापडले, तेव्हा क्षणात जुन्या आठवणी जाग्या झाल्या, कारण ‘तुम्बाड’ बनवताना आम्ही या वस्तू प्रत्यक्ष वापरल्या होत्या. त्यानंतर मूळ कुलूप उघडण्याचं साधनही सापडलं. इतक्या वर्षांनंतरही या वस्तू तिथेच पाहणं खूपच अविश्वसनीय होतं. जणू काही या लोकेशनने चित्रपटाचे छोटे-छोटे तुकडे जपून ठेवले होते आणि आम्ही परत आल्यानंतर ते आमच्यासमोर आणण्यासाठीच त्यांची वाट पाहत होते.”
‘तुम्बाड 2’ च्या तयारीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर हा शोध लागला आहे. पहिल्या भागाने निर्माण केलेल्या त्याच विश्वात परतत ही फ्रँचायझी आता आपली कथा पुढे घेऊन जाण्यास सज्ज आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सोहम शाह प्रमुख भूमिकेत होता. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दृश्यात्मक शैलीमुळे, लोककथांवर आधारित कथानकामुळे आणि वातावरणनिर्मितीसाठी ‘तुम्बाड’ने कालांतराने कल्ट चित्रपटाचा दर्जा मिळवला. 2024 मध्ये झालेल्या चित्रपटाच्या थिएटरमध्ये पुनर्प्रदर्शनामुळे तो नव्या पिढीतील प्रेक्षकांपर्यंतही पोहोचला आणि त्याला मोठे यश मिळाले.
‘तुम्बाड 2’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एंट्री झाल्यापासून या सिक्वेलबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यानंतर आलिया भट्टही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत या चित्रपटाचा भाग बनली. अभिनेता-निर्माता सोहम शाह यांनी जुलैमध्ये या कास्टिंगची घोषणा केली होती. या नव्या अध्यायात सोहम शाह, आलिया भट्ट आणि नवाजुद्दीन सिद्दीकी एकत्र दिसणार आहेत. ‘तुम्बाड 2’ची निर्मिती अभिनेता-निर्माता सोहम शाह त्यांच्या Sohum Shah Films या बॅनरअंतर्गत करत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी अनुभवी निर्माते डॉ. जयंतीलाल गडा यांच्या नेतृत्वाखालील Pen Studios सोबत हातमिळवणी केली आहे. ‘तुम्बाड’ विश्वातील या बहुप्रतीक्षित पुढील अध्यायाचं दिग्दर्शन आदेश प्रसाद करत आहेत.
‘लाईव्ह’ चित्रपटाद्वारे हितेन तेजवानी यांची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री…
‘RRR’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना पाठिंबा देणारे Pen Studios या सिनेमाला भव्य सिनेमॅटिक स्केलवर प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सहभागी झाले आहेत. तुम्बाड 2’ 3 डिसेंबर 2027 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.