Dhasal Movie : विद्रोही कविता, व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज आणि दलित पँथर चळवळीचा धगधगता इतिहास… पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ एका कवीचा जीवनप्रवास नाही, तर अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या विचारांची क्रांती! हेच वादळी व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर उलगडणाऱ्या ‘ढसाळ’ या बहुप्रतीक्षित चरित्रपटाचा टीझर नागपूर येथे आयोजिलेल्या धम्मा फेस्टिव्हलच्या भव्य व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमधून अभिनेता ललित प्रभाकर याने साकारलेल्या नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रभावी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
बंडखोर विचार, परखड लेखणी आणि सामाजिक वास्तवाला भिडणारी कविता यांच्या जोरावर मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या नामदेव ढसाळ यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर कसा उलगडणार, याची उत्सुकता या टीझरमुळे अधिकच वाढली आहे.
संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वरुणा मदनलाल राणा, संजय पांडे यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नामदेव ढसाळ यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांच्या विचारांमधील विद्रोह आणि समाजव्यवस्थेला प्रश्न विचारण्याची त्यांची निर्भीड वृत्ती यांचा वेध या चित्रपटातून घेतला जाणार आहे. ललित प्रभाकरने साकारलेल्या ढसाळांच्या भूमिकेची झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली. त्याने या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला दिलेले रूप आणि त्यामागील मेहनत यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
दिग्दर्शिका वरुणा मदनलाल राणा म्हणाल्या, “नामदेव ढसाळ यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे म्हणजे एका माणसाचा प्रवास जाणून घेणे एवढेच नाही, तर त्यांच्या विचारांमागची अस्वस्थता, त्यांचा विद्रोह आणि समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहाण्याची त्यांची ताकद समजून घेणे आहे. या चित्रपटासाठी आम्ही त्यांच्या आयुष्याचा आणि साहित्याचा अनेक वर्षे अभ्यास केला. त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या विचारांची धार पडद्यावर प्रामाणिकपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. धम्मा फेस्टिव्हलसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणे आमच्यासाठी विशेष आनंदाची बाब होती.’’
निर्माते संजय पांडेय म्हणाले, “पद्मश्री नामदेव ढसाळ हे केवळ कवी नव्हते, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे एक मोठे विद्रोही विचारवंत होते. त्यांच्या शब्दांमध्ये आगीची धग होती आणि त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्यांना दिशा दिली. अशा व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास चित्रपटातून मांडणे ही आमच्यासाठी अभिमानाची आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे. ‘ढसाळ’चा टीझर धम्मा फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करता आला, याचा विशेष आनंद झाला. नामदेव ढसाळ यांच्या विचारांशी नव्या पिढीचा संवाद घडावा, त्यांचा संघर्ष आणि त्यांचे योगदान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, हीच या चित्रपटामागची भावना आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली, याचा आम्हाला आनंद आहे.”
या चित्रपटाला ज्येष्ठ दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत लाभले असून, इर्शाद कामील आणि गुरु ठाकूर यांनी गीतलेखन केले आहे. तर या चित्रपटातील गाण्यांना आदर्श शिंदे, दिव्य कुमार, रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, उर्मिला धनगर आणि विभावरी आपटे यांचा आवाज लाभला आहे. अभय सोडये, प्रताप गंगावणे, अश्वजीत कांबळे यांच्या संवादलेखनाने चित्रपटाला प्रभावी धार मिळाली आहे, तर ललित प्रभाकरचा नामदेव ढसाळांच्या रूपातील लूक रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी साकारला आहे. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन एकनाथ कदम यांनी केले असून डीओपी मिलिंद जोग आहेत. नामदेव ढसाळ यांच्या शब्दांची ताकद, त्यांच्या संघर्षाची धग आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बंडखोरपणा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत.
