अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Film) वतीने आयोजित करण्यात आलेला नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा, मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेत्री स्वाती चिटणीस यांचा विशेष गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थिती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री मा.आशिष शेलार म्हणाले, “नाट्य परिषदेचे काम कलाकार शोधणे, त्यांना घडवणे आणि त्यांना रंगमंच उपलब्ध करून देणे यासाठी मराठी नाट्य परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रम ‘नाट्यकला अकादमी’ स सांस्कृतिक विभाग तन, मन आणि धनाने ठामपणे पाठिंबा देईल व सोबत काम करेल. बेस्टच्या काही आगारांमध्ये नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उभारण्याचा आमचा मानस आहे”. तसेच महानगरपालिकेच्या नाट्यगृहांच्या भाड्यात दरवर्षी ५ टक्के वाढ न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी पुरस्कारा नंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, रंगभूमीच्या सुंदर या प्रवासात रंगभूमीशी माझं नातं अनेक पदरांनी समृद्ध होत गेलं. रंगभूमी माझी गुरू आहे, माझी मैत्रीण आहे. या रंगमंचाने मला सुखाची उभारी दिली, अनेक आयुष्यं जगण्याची संधी दिली. दुःख खोलवर समजून घ्यायला आणि ते वाटून घ्यायला शिकवलं. नाटक मनाच्या जखमा भरून काढू शकतं. नाटक नटाला आरसा दाखवतं. रंगभूमीने मला बोलण्याची ताकद दिली, तर समोरच्याचं ऐकण्याची नम्रताही शिकवली.
हा पुरस्कार केवळ माझा नाही. मला पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच; पण त्याहून मोठा आनंद म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीत माझा जन्म झाला याचा अभिमान आहे. ज्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला त्या निर्मात्यांचा, दिग्दर्शकांचा, सहकलाकारांचा आणि माझ्या कुटुंबीयांच्या प्रोत्साहनाचा या यशात मोठा वाटा आहे. पडद्यामागे काम करणाऱ्या सर्व कलावंतांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः मराठी रंगभूमीवर बॅकस्टेज काम करणारे ज्या जिव्हाळ्याने आमची काळजी घेतात, त्याची नोंद घेतलीच पाहिजे.
रंगभूमी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रंगभूमीच्या सगळ्या माध्यमांची मुशाफिरी करता आली याचा आनंद आहे. माझी जडणघडण रंगभूमीमुळेच झाली; मी घडलो तो रंगभूमीमुळे या पुरस्कारात माझ्या सहकलाकारांचाही मोठा वाटा आहे. प्रत्येक भूमिका काहीतरी देऊन जाते, तसेच पुरस्कारही काहीतरी देऊन जातो. भूमिका माणसाला डोळस बनवते, तर पुरस्कार विनम्र बनवतो. अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर व्यक्त केली.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभाग, सचिव डॉ. किरण कुलकर्णी, नाट्य परिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. गिरीश गांधी, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, विजय गोखले यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित भुरे यांनी केले. अध्यक्ष, प्रशांत दामले यांनी नाट्य परिषदेची भूमिका याप्रसंगी व्यक्त करत सांगितले की, नाट्यपरिषद पुढील काळात रंगकर्मींसाठी विविध योजना घेऊन येणार आहे. रंगमंच कामगार, बुकिंग क्लार्क व्यवस्थापक व कलावंत यांचा अपघाती विमा नाट्य परिषद काढत आहे.
कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण ठरले ते “मर्म बंधातली ठेव ही” या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. स्वरगंधर्व मा. दीनानाथ मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या नाट्यगीतांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांना सुरेल आनंदाची अनुभूती देण्यात आली. तसेच स्वरस्वामिनी आशा भोसले यांना संगीतबद्ध आदरांजली वाहण्यात आली.
मराठी रंगभूमीच्या जतन – संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या उपक्रमाला नाट्यप्रेमी, कलावंत आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ कलावंतांचा गौरव आणि नाट्यसंगीताच्या सुवर्ण परंपरेचे दर्शन घडविणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला. या कार्यक्रमासाठी कोषाध्यक्ष सतीश लोटके, उपाध्यक्ष नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर , शिवाजी शिंदे, विजय सूर्यवंशी व परिषदेच्या इतर कार्यकर्त्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पुरस्कारप्राप्त विजेते
या सोहळ्यात व्यावसायिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक प्राजक्त देशमुख (नाटक : करुणाष्टके), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अमेय दक्षिणदास (नाटक : कुटुंब किर्रर्रतन), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार ऋतुजा बोठे (नाटक : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार किशोर इंगळे (नाटक : कुटुंब किर्रर्रतन), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार अजित परब (नाटक : बोलविता धनी), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार उल्लेश खंदारे (नाटक : भूमिका), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक कुटुंब किर्रर्रतन (संस्था : गौरी थिएटर्स), सर्वोत्कृष्ट अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (नाटक : कुटुंब किर्रर्रतन), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आनंद इंगळे (नाटक : एकदा पाहावं करुन), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता वैभव रंधवे (नाटक : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पर्ण पेठे (नाटक : करुणाष्टके), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री चेतना भट (नाटक : भ्रमाचा भोपळा), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री समिधा गुरु (नाटक : भूमिका), नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार अमेय धोपटकर, अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार समृद्धी कुलकर्णी (नाटक : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय) यांना प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक बोलविता धनी (संस्था : अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स), सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता ओंकार प्रभुघाटे (संगीत नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची), सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री संपदा माने (संगीत नाटक : एकच प्याला), तसेच नाट्यपरिषद- मुंबई कार्यकर्ता पुरस्कारासाठी विजय सूर्यवंशी, नाट्यपरिषद- शाखा कार्यकर्ता पुरस्कारासाठी विजय शिंगणे, नाशिक शाखा, सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी समीर चौघुले, सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कारासाठी शुभदा फडणवीस, गुणी रंगमंच कामगार मधुकर
बाड, नाट्यसमीक्षक पुरस्कारासाठी राजीव जोशी, बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. सुधा कांकरिया, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी संस्था कलापिनी, तळेगाव दाभाडे, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी दीपक गोडबोले, रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या विधायक कार्यासाठी सुनंदा शेंडगे, सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कारासाठी डॉ. अनिरुद्ध वनकर आणि शाहीर विलास सोनवणे, कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी चंद्रकांत चौधरी यांना पुरस्कार देण्यात आला.
प्रायोगिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक संगीत पद्माराणी (संस्था : भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक कर्ण (संस्था : नटराज नाट्य कलामंडळ, बारामती), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक आशुतोष वाघमारे (नाटक : दगडी भिंत), सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार इरफान मुजावर (नाटक : युटोपिया), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आश्विनी आंचवले (नाटक : अय), प्रायोगिक संगीत नाटक सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता अभिषेक काळे (नाटक : संगीत कट्यार काळजात घुसली), प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री अनुष्का आपटे (नाटक : संगीत शाकुंतल), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाट्य लेखक दत्ता पाटील (नाटक : इथेच टाका तंबू) हे पुरस्काराचे मानकरी ठरले.
