अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहिर; स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव
ज्येष्ठ अभिनेत्री मा.श्रीमती स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते मा.श्री. दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईच्या वतीने प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा व कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. ह्यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री मा.श्रीमती स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते मा.श्री. दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर ‘पुरस्कार वितरण समारंभ’ रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी दुपारी ०४.०० वाजता यशवंत नाटय मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई ४०००१६ येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात व्यावसायिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक प्राजक्त देशमुख (नाटक : करुणाष्टके), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अमेय दक्षिणदास (नाटक : कुटुंब किर्रर्रतन), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार ऋतुजा बोठे (नाटक : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार किशोर इंगळे (नाटक : कुटुंब किर्रर्रतन), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार अजित परब (नाटक : बोलविता धनी), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार उल्लेश खंदारे (नाटक : भूमिका), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक कुटुंब किर्रर्रतन (संस्था : गौरी थिएटर्स), सर्वोत्कृष्ट अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (नाटक : कुटुंब किर्रर्रतन), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आनंद इंगळे (नाटक : एकदा पाहावं करुन), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता वैभव रंधवे (नाटक : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पर्ण पेठे (नाटक : करुणाष्टके), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री चेतना भट (नाटक : भ्रमाचा भोपळा), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री समिधा गुरु (नाटक : भूमिका), नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार अमेय धोपटकर, अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार समृद्धी कुलकर्णी (नाटक : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय) यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक बोलविता धनी (संस्था : अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स), सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता ओंकार प्रभुघाटे (संगीत नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची), सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री संपदा माने (संगीत नाटक : एकच प्याला), तसेच नाट्यपरिषद- मुंबई कार्यकर्ता पुरस्कारासाठी विजय सूर्यवंशी, नाट्यपरिषद- शाखा कार्यकर्ता पुरस्कारासाठी विजय शिंगणे, नाशिक शाखा, सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी समीर चौघुले, सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कारासाठी शुभदा फडणवीस, गुणी रंगमंच कामगार मधुकर बाड, नाट्यसमीक्षक पुरस्कारासाठी राजीव जोशी, बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. सुधा कांकरिया, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी संस्था कलापिनी, तळेगाव दाभाडे, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी दीपक गोडबोले, रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या विधायक कार्यासाठी सुनंदा शेंडगे, सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कारासाठी डॉ. अनिरुद्ध वनकर आणि शाहीर विलास सोनवणे, कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी चंद्रकांत चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
प्रायोगिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक संगीत पद्माराणी (संस्था : भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक कर्ण (संस्था : नटराज नाट्य कलामंडळ, बारामती), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक आशुतोष वाघमारे (नाटक : दगडी भिंत), सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार इरफान मुजावर (नाटक : युटोपिया), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आश्विनी आंचवले (नाटक : अय), प्रायोगिक संगीत नाटक सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता अभिषेक काळे (नाटक : संगीत कट्यार काळजात घुसली), प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री अनुष्का आपटे (नाटक : संगीत शाकुंतल), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाट्य लेखक दत्ता पाटील (नाटक : इथेच टाका तंबू) यांची निवड करण्यात आली. सदर सोहळा नाटय परिषदेच्या सर्व सभासदांस आणि रसिकांना विनामूल्य असून काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.