आयर्न मॅननंतर आता डॉक्टर डूम! रॉबर्ट डाउनी ज्युनियरने सांगितला कमबॅकचा थरारक किस्सा
‘अॅव्हेंजर्स : डूम्सडे’ या आगामी चित्रपटातून होणाऱ्या पुनरागमनाबाबत अभिनेत्याने पहिल्यांदाच मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.
After Iron Man, now Doctor Doom : मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये (MCU) आयर्न मॅनची भूमिका साकारून जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर पुन्हा एकदा मार्व्हलच्या विश्वात परतत आहे. मात्र, यावेळी तो आयर्न मॅन नव्हे, तर व्हिक्टर व्हॉन डूम अर्थात डॉक्टर डूम या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘अॅव्हेंजर्स : डूम्सडे’ या आगामी चित्रपटातून होणाऱ्या पुनरागमनाबाबत अभिनेत्याने पहिल्यांदाच मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मार्व्हल स्टुडिओने नुकताच या चित्रपटाचा एक खास फीचर व्हिडीओ प्रदर्शित केला. यामध्ये रॉबर्ट डाउनी ज्युनियरने आपल्या MCU मधील पुनरागमनाचा अनुभव, डॉक्टर डूमची भूमिका स्वीकारण्यामागील विचार आणि या चित्रपटाबाबतच्या अपेक्षा यावर भाष्य केले.
‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’नंतर आयर्न मॅनच्या भूमिकेला पूर्णविराम मिळाल्याचे आपल्याला वाटत होते, असे डाउनी ज्युनियरने सांगितले. त्यामुळे पुन्हा मार्व्हल विश्वात परतण्याचा निर्णय घेणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. मार्व्हल स्टुडिओचे अध्यक्ष केविन फाइगी यांनी पुनरागमनाची शक्यता पहिल्यांदा मांडली, तेव्हा आपण या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार केला होता, असे त्याने सांगितले.
याबाबत बोलताना डाउनी ज्युनियर म्हणाला, “एंडगेम प्रदर्शित झाल्यानंतर हा प्रवास एका निश्चित टप्प्यावर संपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली होती. केविनने जेव्हा पहिल्यांदा मला विचारले की, तू पुन्हा कधी या विश्वात परतण्याचा विचार करशील का? तेव्हा मी खरोखरच विचारात पडलो. आता आणखी किती आश्चर्यकारक गोष्टी शिल्लक असतील, असा प्रश्नही मला पडला.”
हातात कॅमेरा-माईक असला म्हणजे पत्रकार होता येत नाही! रील स्टार्सना पत्रकारांचे संरक्षण देण्यास दिल्ली पोलिसांचा विरोध
आयर्न मॅननंतर डॉक्टर डूमसारखी वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याबाबतही अभिनेत्याने आपले मत व्यक्त केले. व्हिक्टर व्हॉन डूम हा अत्यंत चतुर, प्रभावशाली आणि इतरांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवणारा मास्टरमाइंड असल्याचे त्याने सांगितले. “अनेक चित्रपटांची ताकद त्यांच्या खलनायकांवर अवलंबून असते. व्हिक्टर हा एक मास्टर मॅनिप्युलेटर आहे. त्यामुळे या चित्रपटातील संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने वेगळ्याच पातळीवर जाणार आहेत,” असे डाउनी ज्युनियर म्हणाला.
‘अॅव्हेंजर्स : डूम्सडे’मध्ये अनेक दिग्गज कलाकार एकत्र काम करत आहेत. या कलाकारांच्या प्रतिभेचे आणि चित्रपटासाठी असलेल्या त्यांच्या समर्पणाचेही डाउनी ज्युनियरने कौतुक केले. “या चित्रपटात प्रतिभावान कलाकारांची मोठी फळी आहे. यातील प्रत्येक कलाकारासोबत मी आठवड्यातील आठही दिवस कोणताही चित्रपट करायला तयार आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या सहकलाकारांबद्दल आदर व्यक्त केला.
मार्व्हल फ्रँचायझीशी असलेले आपले भावनिक नाते व्यक्त करताना डाउनी ज्युनियर काहीसा भावूक झाला. चाहत्यांनी दिलेले प्रेम आणि अपेक्षा यांची जाणीव असल्याचे सांगत, प्रत्येक वेळी त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने स्पष्ट केले. “आम्ही प्रत्येक क्षणी या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करण्याचा प्रयत्न करत असतो. या फ्रँचायझीबद्दल माझ्या मनात किती प्रेम आहे, हे शब्दांत सांगणे खरोखरच कठीण आहे,” असे तो म्हणाला.
ऊन घेण्यासाठी गच्चीवर गेले, काही वेळातच मृतावस्थेत आढळले; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरलसोबत काय घडलं?
मार्व्हल स्टुडिओचा बहुप्रतीक्षित ‘अॅव्हेंजर्स : डूम्सडे’ हा चित्रपट भारतात 17 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेतील प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित होईल. तसेच Marvel Presented In Infinity Vision यासह अन्य प्रीमियम फॉरमॅटमध्येही चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
आयर्न मॅनच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा रॉबर्ट डाउनी ज्युनियर आता डॉक्टर डूमच्या रूपात किती प्रभाव पाडतो, याची उत्सुकता जगभरातील मार्व्हल चाहत्यांना लागली आहे.