Download App

यंदा कोण ठरणार ‘महाराष्ट्राचा फेवरेट’? पुरस्कारासाठी नामांकने जाहीर

Maharashtracha Favourite Kon Nomination: नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ (Maharashtracha Favourite Kon) या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात. (Nomination Award ) गेल्या वर्षभरात रिलीज झालेल्या मराठी सिनेमानं आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्याची यंदाची नामांकन यादी जाहीर झाली आहे. ‘झी टॉकीज’ (Zee Talkies) वाहिनीवर हा दिमाखदार पुरस्कार सोहळा लवकरच बघायला मिळणार आहे.

मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाचा आणि कलेचा कस लावून रसिक मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी कलाकारही वाट पाहत असतात .त्यांच्या कलेला दाद देणारा आणि रसिकमनाची पावती देणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ हा पुरस्कार रसिकांच्या पसंतीतून निवडला जातो. नुकतीच या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली. या जाहीर झालेल्या नावांमधून रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या मतानंतर ‘महाराष्ट्राचा फेवरेट’ ही मानाची ट्रॉफी कलाकारांना दिली जाणार आहे. यासाठी रसिक प्रेक्षक आपले मत नोंदवू शकतात, त्यासाठी झी 5 च्या mfkzee talkies.zee5.com वेबसाईटवर जाऊन आपल्या आवडत्या कलाकाराला वोट करू शकतात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत .यामध्ये महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट , फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट लोकप्रिय चेहरा, फेवरेट स्टाईल आयकॉन, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका आणि फेवरेट चित्रपट बाह्य गीत या विभागांसाठी नामांकने जाहीर झाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत यावर्षी वेड, बाईपण भारी देवा, सुभेदार ,महाराष्ट्र शाहीर ,वाळवी, नाळ २, झिम्मा २ , घर बंदूक बिरयानी या चित्रपटांनी नाव कोरली आहेत. त्यामुळे प्रेक्षक पसंतीचा कौल यंदा कोणत्या सिनेमाला मिळतो आणि महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट कोणता ठरतो, हे लवकरच समजणार आहे.

पुरस्कार सोहळ्याकडे रसिकांचेही लक्ष: झी टॉकीज या लोकप्रिय वाहिनीच्या पुढाकाराने दरवर्षी ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ हा पुरस्कार सोहळा रंगतो. प्रेक्षकच नव्हे तर सिनेमा क्षेत्रातील कलाकारही या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात.आपल्या लाडक्या कलाकारांना भरभरून पसंती देण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांनाही मिळत असते .सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ हा पुरस्कार प्रेक्षकांच्या पसंतीतूनच निवडला जात असल्यामुळे कलाकारांसाठी देखील या पुरस्काराचे विशेष महत्त्व आहे.

‘फेवरेट दिग्दर्शक’ या नामांकनामध्ये रितेश देशमुख, केदार शिंदे , दिग्पाल लांजेकर, परेश मोकाशी, सुधाकर रेड्डी सुधाकर रेड्डी यक्कंटी, हेमंत ढोमे , हेमंत अवताडे यांची वर्णी लागली आहे. ‘फेवरेट अभिनेता’ या विभागातील नामांकनासाठी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, रितेश देशमुख, सुबोध भावे, नागराज मंजुळे आणि अजय पुरकर यांची नावे असून ‘फेवरेट अभिनेत्री’ या विभागाअंतर्गत ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील अभिनेत्रींची टीम तसेच ‘वेड’ चित्रपटासाठी जिनिलीया देशमुख, ‘झिम्मा 2’ या चित्रपटातील अभिनेत्रींची टीम आणि ‘वाळवी’ साठी शिवानी सुर्वे यांच्या नावांचा समावेश आहेत.

आशियाई चित्रपट महोत्सवात एशियन कल्चर पुरस्काराने दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा गौरव!

अनेक उत्तम सिनेमे प्रेक्षकांपर्यंत घरबसल्या घेऊन येण्यासाठी झी टॉकीज नेहमीच पुढाकार घेत असते. त्याचबरोबर सिनेमा क्षेत्रातील चांगल्या कलाकृती तसेच चांगले कलाकार यांना प्रेक्षक पसंतीची दाद देण्याच्या हेतूने झी टॉकीजने ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ हा पुरस्कार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ या पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाल्यानंतर वोटिंग लाईन्स सुरू झाल्या असून प्रेक्षकांनी आपल्या आवडत्या कलाकारांना वोट द्यावे असे आवाहन झी टॉकीजच्या वतीने करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचा फेवरेट कोण हे ठरवण्यासाठी प्रेक्षक तीन पद्धतीने त्यांचं मत नोंदवू शकतात; यामध्ये 77 99947231 ते 37 या क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमचे मत देऊ शकता किंवा 99660 21 900 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास थेट व्हाट्सअप वर तुम्हाला वोटिंग डिटेल्स मिळतील यावरही रसिक प्रेक्षक त्यांचे वोट देऊ शकतात, तसेच mfkzee talkies.zee5.com या वेबसाईटवरही वोटिंग सुविधा उपलब्ध असणार आहे.

follow us

संबंधित बातम्या